Natural Cholesterol Control Herbs: दैनंदिन स्वयंपाकात आपण ज्या हिरव्या पानांकडे केवळ गार्निशिंग म्हणून पाहतो. तीच एक गोष्ट तुमचं लिव्हर, किडनी व पचनसंस्था स्वच्छ करू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? हा पदार्थ प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरात उपलब्ध असतोच. भाजी, चटणी, स्नॅक्स हे पदार्थ ही गोष्ट घातल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत. आयुर्वेदात तिचा वापर औषध म्हणून केला जातो आणि आधुनिक तज्ज्ञही आता तिच्या फायद्यांवर शिक्कामोर्तब करीत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, एखादी गोष्ट योग्य पद्धतीनं वापरली तर अमृतसमान; पण अतिरेक झाला तर ती ठरू शकते घातक. चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टीनं तुमचं लिव्हर, किडनी व पचनसंस्था स्वच्छ होण्यास मदत होऊ शकेल..

आपल्या स्वयंपाकघरात असलेली हिरवीगार कोथिंबीर केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर अनेक आजारांवर गुणकारी औषध म्हणूनही वापरली जाते. आयुर्वेदात कोथिंबिरीला औषधी गुणधर्म असलेली वनस्पती मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ही लहानशी वाटणारी पानं तुमचं लिव्हर, किडनी आणि पचनसंस्थेपासून ते कोलेस्ट्रॉलपर्यंत सर्व काही स्वच्छ आणि संतुलित ठेवू शकतात? कोथिंबीरमधील पौष्टिक घटकांमुळे शरीरातील गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कोथिंबिरीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. कोथिंबीर हा आयुर्वेदातील असा मसाला आहे की, ज्यामुळे पचन सुधारते, भूक वाढते आणि संसर्गाशी लढा देण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो.

आहारतज्ज्ञ डॉ. चारू अरोरा यांच्या मते, कोथिंबीर हे एक कार्यक्षम अन्न आहे. त्यात आढळणारे ‘लिनालूल’ नावाचे संयुग हे त्याच्या गंधासह औषधीय गुणांसाठी ओळखले जाते. कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाविरोधी, सूज कमी करणारे आणि डिटॉक्स गुणधर्म शरीराला आतून स्वच्छ करतात.

कोथिंबीरचा काढा किंवा पाणी रोज सकाळी घेतल्यास लिव्हर आणि किडनीतील विषारी घटक बाहेर टाकले जातात. विशेषतः गर्भवती महिलांसाठी त्यातील ‘फोलेट’ अत्यंत उपयुक्त आहे. त्याशिवाय व्हिटॅमिन A, C व K यांमुळे त्वचा चमकदार होते आणि हाडांनाही बळकटी मिळते.

पचनसंस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम यांसारखे महत्त्वाचे खनिज घटक भरपूर असतात. त्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन, कब्ज अशा त्रासांपासून दिलासा मिळतो.

कोथिंबिरीचे अतिसेवन ठरू शकते घातक

कोथिंबिरीचे अतिसेवन केल्यास शरीरावर काही प्रमाणात त्वचाविकार, श्वास घेण्यास अडचण, पोटात दुखणे यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच रोज डिटॉक्स म्हणून घेतल्यास त्यामुळे शरीरातील आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात, ज्यामुळे किडनीवर ताण निर्माण होऊ शकतो.

तर मग काय कराल?

कोथिंबिरीचा वापर करताना योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनेच करा; अन्यथा आरोग्यदायी फायदे देणारी ही छोटीशी पाने तुमच्यासाठी मोठे आरोग्य संकटही ठरू शकतात.