करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्वजण घरात बसून सहकार्य करत आहेत. घरी बरीच किरकोळ कामे करण्यासारखी असतात. अनेक कला शिकण्या-शिकविण्यासारख्या असतात. मात्र, दररोजच्या धावपळीच्या अगर वेगळ्या प्राधान्यक्रमाच्या आयुष्यात याकडे दुर्लक्ष झालेले असते. ‘करोना’साठी लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात घरातच बसायचे आहे. अशावेळी स्वत:ला वेळ द्यायची चांगली संधी आहे. नखांची देखभाल करण्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे. माझी नखं छान वाढत नाहीत, वाढली की मधेच तुटतात, त्यांना शाईनही नाही अशा तक्रारी मुलींकडून सर्रास केल्या जातात. मुलीच्या सौंदर्यातील महत्त्वाची गोष्ट समजल्या जाणाऱ्या नखांबाबत तरुणींना कायमच काळजी असते. आपली नखं सुंदर दिसावीत असे प्रत्येकीलाच वाटत असते. पण मग यासाठी नेमके काय करायचे हे माहित नसते. त्यामुळे नखे सुंदर दिसावीत यासाठी सेलिब्रिटी मेक-अप आर्टीस्ट आश्मीन मुंजाळ आणि त्वचारोगतज्ज्ञ रिधी आर्या यांनी दिलेल्या या काही खास टीप्स…
ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण – एक टी स्पून ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करून यांचे मिश्रण लखांना हलक्या हाताने चोळावे. हे मिश्रण नखांमध्ये मुरु द्यावे. सकाळी उठल्यावर तुमच्या नखांना वेगळीच चमक आलेली असेल.
मिठाचे उपचार – दोन टीस्पून सी सॉल्ट घेऊन त्यामध्ये दोन थेंब लिंबाचा रस किंवा तेल घालावे. हे मिश्रण कोमट पाण्यात घालावे आणि यामध्ये हात १० ते १५ मिनिटे ठेवावेत. हे आठवड्यातून दोन वेळा केल्यास नखांचा पोत सुधारतो.
बिअर थेरपी – अर्धा कप बिअरमध्ये कोमट केलेले अर्धा कप ऑलिव्ह ऑईल आणि अॅपल व्हीनेगर घालून मिश्रण बनवावे. या मिश्रणात १० मिनिटे हात ठेवून बसावे. त्यामुळे मिश्रण नखांमध्ये मुरते आणि नखे चांगली दिसतात.
अंड्यातील बलक आणि दूध – नखे चांगली राहण्यास ओलावा गरजेचा असतो. त्यासाठी अंड्याचे बलक आणि दूध यांचे मिश्रण करुन ते नखांना लावल्यास फायदेशीर ठरते. हे मिश्रण रात्रभर ठेवावे.
व्हॅसलिन – वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेच्या समस्यांसाठी पेट्रोलियम जेली उपयुक्त असते. त्याचप्रमाणे नखे चांगली होण्यासाठीही याचा उपयोग होतो. आरोग्यदायी नखांसाठी दिवसातून एकदा नखांना व्हॅसलिन लावल्यास फायद्याचे ठरते.
हर्बल मास्क – एक टी स्पून कॅमोमाईल आणि पेपरमिंट टी गरम पाण्यात अर्धा किंवा एक तास ठेवा. यातील औषधी वनस्पती काढून टाकून त्यात काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि दोन टी स्पून गव्हाचे पीठ घाला. हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्या आणि नखांना लावा. वाळल्यानंतर अर्धा ते एक तासाने काढून टाका.
नेलपॉलिश रिमूव्हरचा वापर टाळा – नेलपॉलिश रिमूव्हरमध्ये बऱ्याच रसायनांचा वापर केलेला असतो. ही रसायने त्वचेला घातक ठरु शकतात. त्यामुळे कमी दर्जाच्या नेलपॉलिश रिमूव्हरपेक्षा पर्फ्युम किंवा नैसर्गिक रिमूव्हरचा वापर करा.
खोबरेल तेलाचा मसाज – खोबरेल तेलाने नखांना हलके मालिश करा. यामुळे अगदी काही वेळात तुमची नखे स्वच्छ आणि तुकतुकीत झाल्याचे तुम्हाला दिसेल.