Benefits of Daily Walk: महागडे जिम, प्रोटीन पावडर आणि फिटनेस गॅझेट्सवर लाखो रूपये खर्च करण्यापूर्वी तुमच्या आरोग्याला खरंच या सगळ्याची गरज आहे का याचा विचार करा. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश सिंह यांच्या मते, तुमच्या हृदयासाठी सर्वात मोठी गुंतवणूक कोणत्याही जिम मशीनमध्ये नाही, तर २० मिनिटांच्या दररोजच्या चालण्यात आहे. दररोज चालण्याची ही सवय शरीरावर आणि हृदयावर खोलवर परिणाम करते. आरोग्य राखणं ही एक सवय आहे आण सवयी पैशाने नाही, तर नियमिततेने तयार होतात असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
चालण्याने सुधारते आरोग्य
तज्ज्ञ सांगतात की, एक छोटासा वॉक निरर्थक वाटू शकतो, मात्र जर तुम्ही ते दररोज केलं तर त्याचे परिणाम वाढात. जेव्हा ही सवय वाढू लागते, तेव्हा समाधान आणि प्रेरणा मिळते, त्यामुळे एकदा सवय लागली की मन ती मोडू पाहत नाही.
तज्ज्ञांनी लोकांच्या आणखी एका सवयीवर टीका केली. आपण सोशल मीडियावर स्क्रोल करण्यात, ओटीटी शो पाहण्यात किंवा निरर्थक वाद घालण्यात तासनतास घालवतो. मात्र जेव्हा स्वत:साठी २० मिनिटे काढण्याची वेळ येते तेव्हा वेळ नाही असं म्हणतो. जर तुम्ही तुमच्या फोनमधून फक्त ३० मिनिटे काढली आणि चालण्यावर, निरोगी खाण्यावर किंवा झोपेवर लक्ष केंद्रित केले तर ते तुमच्या हृदयासाठी कितीही लाईक्स किवा व्ह्यूजपेक्षा जास्त मौल्यवान असेल असे तज्ज्ञ सांगतात.
चालण्याबाबतच्या टिप्स
तज्ज्ञांनी लोकांना नियमित राहण्यास मदत करू शकतील अशा चालण्याच्या टिप्सदेखील शेअर केल्या. मित्र किंवा जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करा. जेव्हा तुम्ही एखाद्याला कमिटमेंट देता तेव्हा ती मोडणं अवघड असतं. परिणामी तुम्ही ते वचन पाळता आणि वॉकला जाता. अशाचप्रकारे या लहान लहान सवयी कायमस्वरूपी होतात. लोकांनी त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जगात लाखो लोक आहेत ज्यांना इच्छा असूनही चालता येत नाही. म्हणून चालणे हे काम नाही तर एक उपाय आहे. याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा ते ओझे वाटणार नाही, तर स्वत:बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
हृदयाचे आरोग्य केवळ महागड्या औषधांवर किंवा जिम मशीनवर अवलंबून नाही तर तुम्ही दररोज घेत असलेल्या छोट्या छोट्या निर्णयांवर अवलंबून असते. सकाळी उठणे, काही पावलं चालणं, खोल श्वास घेणं आणि तुमच्या शरीराला थोडा वेळ देणे ही खरी गुंतवणूक आहे.
