How to Reduce Stomach Gas Naturally: आधुनिक जीवनशैलीमुळे आज प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला पोटाशी संबंधित तक्रारी भेडसावत आहेत. गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, ढेकर येणे, अपचन… ही नावं ऐकताच डोक्यात येतं “दवाखाना की गोळी”! पण, खरं सांगायचं तर या सर्व समस्येवर उपाय आपल्या घरातच आहे आणि तो म्हणजे स्वयंपाकघरातील तीन साधे मसाले.
दररोजच्या चुकीच्या आहारामुळे आणि बिघडलेल्या दिनचर्येमुळे आपल्या पचनसंस्थेवर मोठा ताण येतो. आपण लगेच औषधांचा आधार घेतो; डायजिन, गॅसच्या गोळ्या, सिरप वगैरे. पण डॉक्टर सांगतात, औषधांवर अवलंबून राहणं ही सवय धोकादायक ठरू शकते, कारण शरीर त्या गोळ्यांवर अवलंबून राहतं.
या सगळ्याला तोड आहे आयुर्वेदात. एम्सचे माजी सल्लागार व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झांझेर म्हणतात, “जेवणानंतर स्वयंपाकघरात असलेले काही मसाले जसे की ओवा, बडीशेप आणि जिरे हे पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि अपचन दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. औषधांपेक्षा यांचा परिणाम अधिक नैसर्गिक आणि टिकाऊ असतो.”
गॅस, अॅसिडिटी आणि पोटफुगणे? फक्त ३ मसाल्यांनी करा कायमचा बंदोबस्त!
ओवा
जेवल्यानंतर लगेच गॅस, ढेकर किंवा जळजळ होत असेल तर ओवा हा सर्वात सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे. एका तव्यावर ओवा थोडासा भाजून घ्या आणि त्यात चिमूटभर मीठ मिसळा. हे मिश्रण जेवणानंतर चावून खा, काही मिनिटांत पोट हलकं झाल्यासारखं वाटेल.
याशिवाय ओव्याचं पाणी बनवून पिणंही फायदेशीर ठरतं. एक लिटर पाण्यात ३-४ चमचे ओवा घालून ते अर्ध होईपर्यंत उकळा. सकाळ-संध्याकाळ प्यायल्याने अॅसिडिटी, हार्टबर्न आणि पोटदुखीपासून मुक्ती मिळते.
बडीशेप
बडीशेप हा मसाला फक्त सुगंधासाठी नाही, तर पचनासाठी वरदान आहे. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास पोट साफ राहते, गॅस आणि ब्लोटिंग कमी होते. बडीशेपमधील फायबरमुळे आंतड्यांचे कार्य सुधारते आणि पोट हलके वाटते.
जिरे
दररोजच्या आहारात जिरे हे आवश्यकच असतं. पण, जेवणानंतर भाजलेले जिरे आणि काळं मीठ एकत्र घेतल्याने पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीवर नियंत्रण मिळतं. जिरेपाणीही पोटातील जळजळ कमी करतं आणि पचनक्रिया सुधारतं.
डॉ. झांझेर यांचा सल्ला:
“औषधांपेक्षा आहार बदलणं अधिक प्रभावी आहे. प्रत्येक जेवणानंतर फक्त एक चिमूट मसाला खा आणि बघा तुमचं पोट फुगणार नाही, गॅस होणार नाही आणि पचन होईल सुरळीत!”
लक्षात ठेवा, पोट हे शरीराचं ‘पॉवरहाऊस’ आहे. पचन बिघडलं की सर्व काही बिघडतं; त्यामुळे जेवणानंतर औषध नव्हे तर मसाला वापरा… आणि गॅसच्या त्रासाला कायमचा रामराम करा!