Steel containers disadvantages: भारतीय स्वयंपाकघर म्हटले की, डोळ्यासमोर पहिलं चित्र उभं राहतं ते म्हणजे स्टीलचे डबे, ताटं आणि भांडी. आपल्या घरातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा म्हणजे अन्नसाठ्यासाठी स्टीलचा वापर. हे डबे टिकाऊ असतात, तुटत नाहीत, सहज स्वच्छ होतात आणि दिसायलाही आकर्षक वाटतात. डाळी, तांदूळ, गहू, मसाले, बिस्किटं, सुका मेवा यांपासून ते लंच बॉक्सपर्यंत स्टीलचे डबे वापरले जातात. पण, एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की, सगळेच पदार्थ स्टीलमध्ये ठेवणे आरोग्यासाठी योग्य नसते. यामुळे त्या पदार्थांचा स्वाद बदलतो, पौष्टिकता कमी होते आणि कधी कधी ते खाण्यास धोकादायकही ठरू शकतात.

१. लोणचं

भारतीय घरात लोणच्याला वेगळं स्थान आहे. जेवणात लोणचं नसेल तर अनेकांना जेवण अपूर्ण वाटतं. पण, लोणचं कधीही स्टीलच्या डब्यात ठेवू नये, कारण लोणच्यात मीठ, तेल, लिंबाचा रस यांसारख्या गोष्टी असतात. या सर्व घटकांमध्ये आम्लियता (acidity) असते आणि त्यांचा थेट परिणाम स्टीलवर होतो, त्यामुळे स्टीलच्या डब्यात ठेवलेले लोणचे लवकर खराब होते, त्याची चव बदलते आणि त्यात धातूचे सूक्ष्मकण मिसळण्याचा धोका असतो. लोणचं नेहमी काचेच्या बाटलीत किंवा मातीच्या बरणीत साठवावे.

२. दही

दही हे आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. पण, दह्यामध्ये नैसर्गिक आम्ल असते आणि ते स्टीलच्या डब्यात ठेवल्यास दही पटकन आंबते. यामुळे दह्याचा स्वाद बदलतो, कडवटपणा वाढतो आणि ते खाण्यास अयोग्य ठरते, म्हणून दही नेहमी मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या डब्यात ठेवले तर ते ताजे राहते.

३. फळं

सफरचंद, केळी, संत्री यांसारखी फळं आपण सहज डब्यात भरून ठेवतो. पण, फळं स्टीलच्या डब्यात ठेवणे टाळावे, कारण फळांमध्ये असलेली नैसर्गिक आम्लियता स्टीलशी रासायनिक संयोग करते, त्यामुळे त्यांचा स्वाद आणि पोषणमूल्य कमी होते. फळं ताजी ठेवण्यासाठी एअरटाईट काचेचे कंटेनर किंवा फूड-सेफ प्लास्टिकचे डबे यांचा वापर अधिक योग्य ठरतो.

४. टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनवलेले पदार्थ

भाजी, सांबार, रस्सा किंवा सूप यामध्ये टोमॅटोचा वापर हमखास होतो. पण, टोमॅटो नैसर्गिकरित्या आम्लिय (acidic) असतात. जर टोमॅटोयुक्त भाजी किंवा ग्रेव्ही स्टीलच्या डब्यात ठेवली तर त्यातील आम्ल स्टीलशी प्रतिक्रिया करते, त्यामुळे पदार्थाची चव बदलते आणि धातूचे सूक्ष्म अंश पदार्थात मिसळण्याचा धोका असतो, म्हणून टोमॅटो असलेले पदार्थ स्टीलमध्ये ठेवण्याऐवजी काचेच्या, मातीच्या किंवा मायक्रोवेव्ह-सेफ प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले बरे.