भारतात भाताशिवाय जेवणाचं ताट अपूर्ण मानलं जातं. भारतीय जेवणात भात हा मुख्य आहाराचा एक भाग आहे. जेवणात गरम भात किंवा भाज्या नसल्यास पोट भरलेले वाटत नाही. पण, आजच्या काळात मधुमेह आणि रक्तदाबाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहून, अनेक लोकांना प्रश्न पडतो की, दररोज भात खाल्ल्याने खरोखरच मधुमेह होतो का? कारण- एखाद्याला मधुमेह किंवा रक्तातील साखरेची तक्रार येताच, पहिला सल्ला दिला जातो तो म्हणजे आहारातून भात काढून टाकणे. ज्यामुळे लोकांना असे वाटू लागते की भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढेल. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे पूर्णपणे खरे नाही, उलट भात कसा आणि कशासह खाल्ला जात आहे याने जास्त फरक पडतो.

आशिया मोरिंगो हॉस्पिटलमधील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. पारस अग्रवाल यांनी साखरेच्या रुग्णांनी भात खावा की नाही हे सांगितले आहे. भात खाल्ल्याने शरीरातील साखरेच्या पातळीवर काय परिणाम होतो. डॉ. पारस अग्रवाल यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांना भात खाणे टाळण्यास सांगितले जाते. कारण- भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. अशा परिस्थितीत, भात रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढवतो. विशेषतः पॉलिश केलेल्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे त्याचे खूप लवकर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून मधुमेह असलेल्या लोकांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो.

तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स

पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खूप जास्त असतो, म्हणजेच तो शरीरात लवकर साखरेत रूपांतरित होतो. त्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढते. साखरेच्या पातळीत वारंवार होणारे चढ-उतार शरीराची इन्सुलिनला मिळणारी प्रतिक्रिया कमी करू शकतात, ज्यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणून भात खाण्याच्या पद्धती आणि प्रमाणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

भात रोज खावा की नाही?

तांदूळ हा एक नैसर्गिक अन्नपदार्थ आहे, जो निरोगी आणि नियमित सेवन केल्यास शरीराला पोषण प्रदान करतो. भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. म्हणून भात पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही, परंतु, जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा वजन वाढत असेल, तर भाताचे प्रमाण मर्यादित करणे गरजेचे आहे.

फायबरयुक्त तांदूळ निवडा

पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ, लाल तांदूळ किंवा इतर कमी प्रक्रिया केलेले तांदूळ खाल्ल्याने जास्त फायबर मिळते. फायबर अन्न हळूहळू पचण्यास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढत नाही. म्हणून भात टाळण्याऐवजी भाताच्या योग्य प्रमाणाचा पर्याय निवडणे अधिक फायदेशीर आहे.