सध्याच्या या आधुनिक जगात आपण तंत्रज्ञान, स्मार्टफोन्स व लॅपटॉपसारख्या यंत्रांशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच करीतच नाही. अशा गोष्टींचा सातत्याने वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण येत असतो. परंतु, आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही ठरावीक पदार्थ, सुपर फूड्स म्हणून काम करू शकतात. आपल्या आहारातील पोषक घटक डोळ्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यावर ताण येऊ नये, वाढत्या वयानुसार त्यांना जपण्यासाठी फार महत्त्वाची कामगिरी बजावत असतात, असे शार्प साईट हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर विजय माथूर म्हणाले, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुपर फूड्स डोळ्यांसाठी महत्त्वाचे का असतात?

ज्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात अशा पदार्थांना सुपर फूड्स, असे म्हटले जाते. दृष्टी वाढवण्यासाठी, तसेच डोळ्यांच्या आजारांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे गरजेची असतात. असे पदार्थ आपल्या आहारात असतील तर मोतीबिंदू, डोळ्यांना हानिकारक यूव्ही किरणांपासून वाचवणे, तसेच डोळ्यांमधील स्नायू व नसांना निरोगी ठेवण्याचे काम ते करीत असतात. त्यामुळे आहारात हे पाच सुपर फूड्स असणे खूपच उपयुक्त ठरू शकतात, असे डॉक्टर माथूर म्हणतात.

हेही वाचा : ‘हिवाळ्यात हे’ दोन पदार्थ ठेवतील सर्दी-खोकला दूर! पाहा, थंडीच्या दिवसांमध्ये ‘हा’ घरगुती उपाय करेल मदत…

१. गाजर

गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी उपयुक्त असते हे आपल्याला माहीत असेलच. गाजरामध्ये बीटा केरोटीन हे एक प्रकारचे अ जीवनसत्त्व असते; जे आपल्या डोळ्याच्या पडद्याची म्हणजेच रेटिना आणि इतर भागांची काळजी घेऊन, त्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करीत असते. त्यासोबत मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशनपासून बचाव करतात.

२. पालक

पालक हे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन या पोषक तत्वांनी समृद्ध असते. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे रेटिनामध्ये आढळणारे दोन आवश्यक अँटिऑक्सिडंट आहेत. हे पोषक घटक आपल्या डोळ्यांचे प्रकाशाच्या हानिकारक वेव्हलेन्थ आणि अन्य घटक गोष्टींपासून रक्षण करण्यासाठी एखाद्या गॉगलप्रमाणे काम करतात. त्यामुळे पालकाचे दररोज सेवन केल्याने मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी होतो.

३. मासे

बांगडा, रावस, कुपा [ट्युना] अशा माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात; जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. सध्या आपला डोळ्यांसमोर सतत स्क्रीन असते, त्याचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडत असतो. अशात हे ओमेगा-३ डोळ्यांची संरचना उत्तम ठेवण्यासाठी, तसेच डोळे कोरडे होण्यापासून त्यांची सुरक्षा करतात.

४. शेंगदाणे आणि सुका मेवा

बदाम, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या पदार्थांमध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते; जे डोळ्यांच्या पेशींचे रक्षण करते. त्यांचा नियमित आहारात समावेश केल्याने वयोमानानुसार डोळ्यांना होणाऱ्या त्रासांपासून बचाव होतो.

५. क जीवनसत्त्वे असणारी फळे

लिंबू, संत्री, मोसंबी यांमध्ये क जीवनसत्त्व हे अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील, तसेच डोळ्यांमधील उतींना उत्तम ठेवण्यासाठी ते सतत काम करीत असतात. इतकेच नव्हे, तर मोतीबिंदू आणि मॅक्युलर डीजनरेशन अशा आजारांपासूनही आपल्या डोळ्यांना वाचवत असतात.

हेही वाचा : दररोजच्या वापरातल्या गुळाची ‘शुद्धता’ कशी तपासावी? पाहा, तुमची मदत करतील ‘या’ सात टिप्स…

शेवटी आपले आपल्या जेवणात, आहारात आपण कोणत्या गोष्टींचा समावेश करतो हे डोळ्यांच्या, शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आपले डोळे अत्याधिक प्रमाणात काम करीत असतात, त्यांच्यावर सतत ताण येत असतो. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye health five essential superfoods for healthy eyesight from carrots to seeds and nuts check out list dha
First published on: 09-01-2024 at 14:08 IST