गेल्या काही वर्षांत मूत्रपिंडातील खडे (Kidney Stones) ची समस्या लोकांमध्ये वाढत आहे. त्याचबरोबर पित्ताशयात खडे होणे (Gallbladder Stones) देखील वाढत आहेत. ही समस्या तितकीच वेदनादायी आणि गंभीर आहे. या दोन्ही आजारांमध्ये बहुतेक वेळा रुग्णाची जीवनशैली आणि सवयी जबाबदार असतात. पूर्वी ही समस्या प्रौढांमध्ये दिसत असे, पण आता मुलांमध्येही पित्ताशयात खडे आढळू लागले आहेत. त्यामुळे पालकांनी या आजाराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

देशातील पाच शहरांत अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात दाखल झालेल्या २०० मुलांपैकी एका मुलाच्या पित्ताशयात खडे आढळले. ही समस्या सामान्य आहे, त्यामुळे तिची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे.

हेल्थ तज्ज्ञांच्या मते, मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये पुढील दहा वर्षांत पुन्हा खडे होण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. खड्यांमुळे होणारा वेदनादायक अनुभव रुग्ण कधीही विसरत नाही. त्यामुळे जीवनशैली, आहार आणि पाण्याचे सेवन यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

सर्जन व यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन श्रीवास्तव यांनी सांगितले की, मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास असलेल्या रुग्णांनी कोणत्या पदार्थांपासून दूर राहावे आणि स्वतःला कसे बचावावे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कोणत्या पदार्थांपासून दूर रहावे?

ऑक्सलेटयुक्त पदार्थ – पालक, बीटरूट, शेंगदाणे, बदाम, काजू आणि चॉकलेट यांसारखे पदार्थ ऑक्सलेटमध्ये समृद्ध असतात. जेव्हा हे घटक शरीरात जातात तेव्हा ते कॅल्शियमसह एकत्रित होतात आणि मूत्रपिंड किंवा मूत्राशयात कठीण दगड तयार करतात.

मीठ आणि सोडियम जास्त असलेले पदार्थ – आजकाल प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज्ड फूड आणि फास्ट फूडचे सेवन लक्षणीयरीत्या वाढले आहे. या सर्वांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त आहे. सोडियमच्या अतिरेकामुळे शरीरात असलेले कॅल्शियम मूत्रमार्गे बाहेर टाकले जाते. हे कॅल्शियम मूत्रपिंडातील दगडांचे मुख्य कारण आहे.

गोड पेये – गोड थंड पेये, सोडा, पॅकेज्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक्समध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. फ्रुक्टोज मूत्रपिंडातील दगड तयार होण्यास प्रोत्साहन देते.

पित्ताशयात खडे कसे होतात? (How Do Gallstones Form?)

पित्ताशय म्हणजे आपल्या यकृताखाली असलेली छोटी थैली ज्यामध्ये हिरवट-पिवळट रंगाचा पित्तरस (Bile Juice) साठवला जातो. हा रस पचनक्रियेस मदत करतो. पित्ताशयात खडे तयार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल, बिलीरुबिन यांसारख्या कठीण रसायनांचे प्रमाण वाढणे. पित्त गाढ होऊन दीर्घकाळ साठत राहिल्यास खडे तयार होतात. हे खडे पित्तनलिकेत अडथळा निर्माण करून पचनाच्या अनेक समस्या निर्माण करतात.

हेही वाचा – वर्कआउटनंतर लगेच गरम पाण्याची अंघोळ करण्याची सवय ठरू शकते घातक; शरीरावर होऊ शकतात धोकादायक परिणाम

कोणती लक्षणे दिसतात? (Symptoms of Gallstones)

  • पोटाच्या उजव्या बाजूच्या वरच्या भागात किंवा मध्यभागी तीव्र वेदना
  • तुपकट, तळलेले किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर वेदना वाढणे
  • खाण्याची इच्छा कमी होणे
  • शरीराचा ताप वाढणे, थंडी वाजणे
  • डोळे व त्वचेवर पिवळसरपणा (Jaundice)
  • काही वेळा स्वादुपिंडाला (Pancreas) सूज येणे

उपचाराचे पर्याय (Treatment Options)

  • अल्ट्रासाऊंड तपासणी करून पित्ताशयातील खड्यांचे निदान करता येते.
  • लक्षणे नसल्यास काही लोक औषधोपचारांशिवाय सामान्य जीवन जगू शकतात.
  • खडे विरघळवण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत, परंतु ती महिनोन्‌महिने किंवा वर्षानुवर्षे घ्यावी लागतात. मध्येच थांबवली तर खडे पुन्हा होऊ शकतात.
  • कायमस्वरूपी उपाय म्हणजे पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (Cholecystectomy). यामुळे पचनावर फारसा परिणाम होत नाही.