Shikhar Dhawan Fitness Secrets : माजी क्रिकेटपटू शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने त्याच्या डाएट आणि फिटनेसविषयीची माहिती दिली. तो १५-१६ वर्षांचा असल्यापासून जिमद्वारे व्यायाम कसा करायचा याविषयीसुद्धा त्याने सांगितले. शिखर सांगतो, “मी ११ वर्षांचा होतो तेव्हा मी सराव सुरू केला होता. तेव्हा आम्ही ५ ते १० फेऱ्या धावायचो आणि दिवसभर उभा राहायचो. मी हे अनेक वर्षं असं केलं. नंतर मी स्ट्रायडिंग आणि सर्व काही शिकलो. दिल्लीच्या प्रशिक्षकाकडून धावण्याविषयी बरंच काही शिकलो. मी १५-१६ व्या वर्षापासून जिम करायला सुरुवात केली. गेल्या २४ वर्षांपासून आणि सतत २१ वर्षांपासून मी जिम करत आहे”, असे शिखरने रणवीर अलाहाबादियालाच्या यूट्युब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

धवन सांगतो की, तो त्याच्या आहाराबाबत नेहमी शिस्तप्रिय होता. “मी शरीरातील कॅलरीज कमी केल्या आहेत. मी आहारावर खूप लक्ष केंद्रित करतो. मी गोड खाण्याचा प्रयत्न करत नाही. मी गोड खात नाही. जर मला त्याग करायचा असेल, तर मला ते करावेच लागेल. मला एक चांगले व्यक्तिमत्त्व जपायचे आहे. मला जर चांगले दिसायचे असेल, तर मला ते करावे लागेल. माझ्याकडे नेहमीच एक न्युट्रिशनिस्ट असते. मला वाटते की, जर तुम्हाला आहाराबद्दल काहीच माहिती नसेल, तर न्युट्रिशनिस्ट असणे महत्त्वाचे आहे,” शिखर पुढे सांगतो.

शिखर धवनच्या बोलण्यावरून तुम्हाला जाणवेल की, चांगले दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आहार आणि फिटनेस किती महत्त्वाचा आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांकडून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

जेव्हा सुंदर दिसण्याचा आणि फिट राहण्याचा विचार येतो तेव्हा आहार आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असते. “तुम्ही दररोज जे खाता, त्याचा फक्त तुमच्या पोटाच्या घेरावर परिणाम होत नाही, तर तुमची ऊर्जा, त्वचा, मूड आणि तुमचा आत्मविश्वास यांवरसुद्धा परिणाम होतो,” असे आहार तज्ज्ञ व सल्लागार कनिका मल्होत्रा ​​सांगतात.

आवश्यकता आणि वैयक्तिक गरज यांनुसार योग्य आहाराची पद्धत तुमच्या शरीराला स्नायू तयार करणे, फॅट्स कमी करणे आणि एकूण आरोग्य जपणे यांसाठी आवश्यक पौष्टिक घटक प्रदान करते. “नियमित व्यायामासह चांगला आहार घ्या. त्यामुळे तुमचा मूडसुद्धा सुधारतो. चांगली झोप घेता येते आणि एकूणच अधिक उत्साही वाटते”, असे मल्होत्रा सांगतात.

पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, एखादी गोष्ट सांगणे सोपी आहे; पण ती गोष्ट करणे कठीण आहे. काय खावे आणि ठरवलेल्या गोष्टी कशा प्रत्यक्षात कराव्यात, हे जाणून घेणे खूप कठीण आहे.

“त्यामुळे आपल्या आयुष्यात आहार तज्ज्ञ असणे खूप महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुमचा न्युट्रिशन मित्र म्हणून आहार तज्ज्ञांचा विचार करा. ते तुमची जीवनशैली, आवडी-निवडी आणि तुमच्या आरोग्याच्या समस्या समजून घेतात आणि तु्मच्यासाठी अनुकूल असा जेवणाचे वेळापत्रक तयार करतात, जे सर्वांसाठी सारखे नसते”, असे मल्होत्रा ​​सांगतात.

न्युट्रिशनिस्ट तुम्हाला चांगले; पण चविष्ट अन्नपदार्थ निवडण्यास मदत करतात. खाण्याच्या सवयींमध्ये चांगले बदल करण्यास मदत करतात. कठीण परिस्थितीतही ते प्रेरणा देतात. “न्युट्रिशनिस्ट तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात. तुमच्या डाएट प्लॅनमध्ये बदल करतात आणि तुमचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही चांगले दिसता; पण त्याबरोबरच तुम्हाला सकारात्मकतासुद्धा जाणवते. जेव्हा तुम्हाला योग्य सहकार्य मिळते आणि डाएट प्लॅनसह तुम्ही जेव्हा फिटनेस जपता, तेव्हा तुम्ही आणखी आनंदी आयुष्य जगता,” असे मल्होत्रा ​​सांगतात.