Kidney health for senior citezens: मूत्रपिंडाचे आजार हे कोणत्याही वयातील लोकांसाठी गंभीर ठरू शकतात. त्यातही वय वाढल्यानंतर म्हणजेच वृद्ध लोकांना मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाच्या काही आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, वय वाढल्यानंतर मूत्रपिंडाची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मूत्रपिंडाची जळजळ किंवा सूज

मूत्रपिंडाची जळजळ किंवा सूज येणे हा प्रकार ग्लोमेरूलोनेफ्रायटिस सारख्या परिस्थितीमुळे होऊ शकतो. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. वृद्धांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मधुमेह. मधुमेह नियंत्रित असला तरी रक्तवाहिन्या आणि नसांना नुकसान पोहोचू शकते.

मूत्रमार्गाचा संसर्ग असल्याने हा संसर्ग मूत्रपिंडात पसरू शकतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य, कारण उपचार न केल्यास कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. महिलांमध्ये आणि वाढत्या वयानुसार मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

मूत्राशयातून अनियंत्रित मूत्र गळतीदेखील संसर्ग होण्यास कारणीभूत ठरते. लघवीशी संबंधित समस्या असल्या वेळीच तपासून घ्या. कारण त्या अधिक गंभीर मूत्रपिंडाच्या समस्या किंवा पुरूषांमध्ये वाढलेली प्रोस्टेट पातळी यासारख्या स्थिती दर्शवू शकतात.

रेनोव्हॅस्कुलर रोग

चरबीचे साठे, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम आणि इतर पदार्थ रक्तवाहिन्यांच्या आतील थरात जमा होतात, त्यामुळे मूत्रपिंडाच्या धमनी अरूंद होतात किंवा अडथळा निर्माण होतो. यामुळे मूत्रपिंडांच्या फिल्टरवर परिणाम होतो आणि मूत्रपिंडांना रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी उच्च रक्तदाब होतो आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते. वृद्धांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे.

वेळीच उपचार न केल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि दृष्टी कमी होण्याचा धोका वाढू शकतो आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

मूत्रपिंडाच्या (kidney)च्या आजाराची लक्षणे काय?

  • उच्च रक्तदाब
  • लघवीच्या प्रमाणात आणि संख्येत बदल
  • लघवीच्या स्वरूपात बदल
  • मूत्रात रक्त येणे
  • पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणे
  • मूत्रपिंडाच्या भागात वेदना
  • थकवा
  • भूक न लागणे
  • झोपेचा त्रास
  • डोकेदुखी
  • एकाग्रतेचा अभाव
  • खाज सुटणे
  • श्वास लागणे
  • मळमळ आणि उलट्या
  • तोंडात दुर्गंधी आणि धातूची चव

वयानुसार मूत्रपिंडासंबंधी जोखमीचे घटक

वय वाढत असताना मूत्रपिंड आणि मूत्रमार्गावर परिणाम करणारे काही आजार अधिक सामान्य होतात. तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार होण्याचा धोका जास्त असतो जर तुम्हाला पुढील आजार आहेत,

  • ६० वर्षांपेक्षा जास्त वय
  • मधुमेह
  • लठ्ठपणा
  • उच्च रक्तदाब
  • हृदयरोग किंवा स्ट्रोक झाला असल्यास
  • धूम्रपान करणे
  • मूत्रपिंड निकामी झाल्याचा कौटुंबिक इतिहास
  • तीव्र मूत्रपिंडाच्या दुखापतीचा इतिहास

दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दोन ते तीन पट जास्त असते आणि डायलिसिसवर अशलेल्या तसंच प्रत्यारोपित मूत्रपिंड असलेल्या लोकांसाठी हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरू शकते.

मूत्रपिंड निरोगी कसे ठेवाल?

  • तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या रक्तातील साखरेचे नियंत्रण उत्तम आहे याची खात्री करा. इन्सुलिन इंजेक्शन, औषधे, आहार, शारीरिक हालचाली आणि तुमच्या रक्तातील साखरेचे निरीक्षण याबद्दल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
  • उच्च रक्तदाब नियंत्रित करा. तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासा. रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे मूत्रपिंडाच्या आजाराचा विकास मंदावू शकतात.
  • जर तुम्हाला मूत्रपिंडाच्या आजाराच्या जोखमीच्या घटकांपैकी एक असेल, तर किमान दर दोन वर्षांनी मूत्रपिंडाच्या आरोग्याची तपासणी करा.
  • मूत्रमार्गाच्या संसर्गावर त्वरित उपचार करा.
  • आवश्यक असल्यास आहार आणि औषधांनी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करा.
  • भरपूर पाणी प्या आणि साखर, चरबी आणि मीठ कमी असलेले पण फायबर जास्त असलेले पदार्थ निवडा.
  • धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे बंद करा.
  • तुमच्या उंची आणि वजनानुसार निरोगी वजन ठेवा
  • दिवसातून किमान ३० मिनिटे मध्यम व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.