मध्य प्रदेशात कफ सिरप खाल्ल्यानंतर १४ मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला. या प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले आहे की, कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचे घातक रसायन जास्त प्रमाणात होते. हे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि त्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते. कोल्ड्रिफ कफ सिरपनंतर आता आणखी दोन सिरपमध्ये विषारी डायथिलीन ग्लायकोल घटक असल्याचे आढळून आले आहे.
राज्य औषध नियामकांनी केलेल्या तपासणीत असे आढळले की, गुजरातच्या रेडनेक्स फार्मास्युटिकल कंपनीच्या रेस्पिफ्रेश सिरपमध्ये १.३ टक्के डीईजी होते, तर कमाल मर्यादा ०.१ टक्के आहे. गुजरातमधील शेप फार्माच्या रिलाइफ सिरपमध्ये ०.६ टक्के डीईजी होते. शिवाय तामिळनाडूच्या स्रेसन फार्माच्या कोल्ड्रिफ सिरपमध्ये ४८.६ टक्के डीईजी होते, ते अत्यंत धोकादायक पातळीवर होते.
डायथिलीन ग्लायकॉल सर्वात धोकादायक रसायन
डायथिलीन ग्लायकॉल हे एक विषारी रसायन आहे, जे अँटीफ्रीझ, हिट ट्रान्सफर फ्लुइड आणि एमल्सीफायर सारख्या अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. औषध उद्योगात ते चुकून किंवा पॉलिथिलीन ग्लायकॉल नावाच्या सॉल्व्हेंटद्वारे भेसळ म्हणून सिरपमध्ये प्रवेश करू शकते.
औषध कंपन्यांसाठीच्या ग्रेड
औद्योगिक ग्रेड (औद्योगिक वापरासाठी) – यामध्ये डीईजीचे प्रमाण जास्त असते.
औषधी ग्रेड (औषध निर्मितीसाठी) – त्यात ०.१ टक्केपेक्षा कमी डीईजी असावे.
तापसणीत असे आढळले की, अनेक कंपन्यांनी एकतर चुकीचा पीईजी ग्रेड वापरला किंवा गुणवत्ता चाचणीत निष्काळजीपणा दाखवला.
डीईजी विषबाधेची लक्षणे
मध्य प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे आढळून आली. डॉक्टरांच्या मते, डीईजी विषबाधेची लक्षणे वेगाने विकसित होतात आणि मुलांमध्ये ती अधिक तीव्र असतात. यामध्ये तीव्र पोटदुखी, उलट्या आणि जुलाब, लघवी थांबणे, डोकेदुखी आणि चक्कर येणे, बेहोशी किंवा गोंधळ होणे इत्यादींचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, एकदा डीईजी शरीरात प्रवेश केला की ते मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेला कायमचे नुकसान करू शकते.
या आधीच्या घटना
डायथिलीन ग्लायकोलमुळे मुलांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२२मध्ये गॅम्बियामध्ये ७० आणि उझबेकिस्तानमध्ये १८ मुलांचा भारतीय सिरप प्यायल्याने मृत्यू झाला. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता. २०२० मध्ये जम्मू-काश्मीरमधील रामनगरमध्ये १७ मुलांचा मृत्यू झाला. चाचण्यांमध्ये सिरपमध्ये ३४.९७ टक्के डीईजी आढळले. १९९८ मध्ये गुरूग्राममध्ये एका स्थानिक कंपनीच्या सिरपमध्ये १७.५ टक्के डीईजी आढळून आल्याने ३३ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी दिल्लीतील कलावती सरन बाल रूग्णालयात सुमारे १५० मुलांना किडनी निकामी झाल्याने दाखल करण्यात आले होते.