Marigold Flower In Pots: सणासुदीचा काळ म्हणजे घराघरांत आनंद, पूजा-पाठ आणि सजावटीची लगबग असते. प्रत्येक सणात फुलांना वेगळंच महत्त्व असते. त्यातही दसरा असो, दुर्गा पूजा असो किंवा दिवाळी या सर्वच सणांमध्ये झेंडूच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पूजा मंडपापासून ते तोरणं, रांगोळ्या, आकाशकंदील आणि दिव्यांची सजावट या सगळ्यात झेंडुची फुलं रंग भरतात.

आजकाल बहुतांश लोकं ही फुलं थेट बाजारातून विकत आणतात. पण, हवं तर ही फुलं आपण घरच्या घरी कुंडीत लावू शकतो. यामुळे सजावटीसाठी ताजी फुलं नेहमी उपलब्ध राहतात आणि घराची, बाल्कनीची शोभादेखील वाढवतात. खरं म्हणजे तर झेंडूची लागवड घरच्या घरी करणे फारसे अवघड नाही. थोडं लक्ष दिलं तर तुमच्याही कुंडलीत झेंडूची फुले येतील.

झेंडूचं रोप कसं लावायचं आणि त्याची काळजी कशी घ्यायची?

१. कुंडीची निवड आणि मातीचे प्रमाण

झेंडूचे रोप लावण्यासाठी ८ ते १० इंच कुंडी योग्य ठरतो. कुंडीमध्ये हलकी आणि भुसभुशीत माती घालावी. माती अधिक सुपीक व्हावी म्हणून त्यात गोबरखत आणि थोडी वाळू मिसळावी. ही मिश्रणं रोपाला पोषण देतात आणि पाणी साठणार नाही याची खात्री करतात.

२. बियांपासून झेंडूचे रोप कसं लावावं?

झेंडू बिया किंवा थेट रोप या दोन्ही प्रकारांनी लावू शकतो. जर बियांपासून लावायचं असेल तर कुंडीतील मातीमध्ये १-२ सेंटीमीटर खोलीवर बी पेरावी. त्यावर हलका मातीचा थर टाकून वरून पाणी शिंपडावं. जर वेळ वाचवायचा असेल तर थेट नर्सरीतून रोप आणून कुंडीत लावता येतं. दोन्ही पद्धतींनी रोप सहज वाढतं.

३. झेंडूच्या रोपाची काळजी कशी करावी?

झेंडूचं रोप जरी सोपं असलं तरी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसे की सूर्यप्रकाश, झेंडू फुलायला रोज ५ ते ७ तास थेट उन्हं मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे कुंडीला गच्चीवर किंवा बाल्कनीत ठेवावे. रोपाला नियमित पाणी द्यावं. मात्र, कुंडीमध्ये पाणी साचणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं. जास्त पाणी रोपाला घातक ठरू शकतं.

४. खत आणि संरक्षण

झेंडूला वेळोवेळी सेंद्रिय खत किंवा गोबरखत द्यावं. यामुळे झाडं निरोगी वाढतात आणि फुलं लवकर उमलतात. फुलं उमलल्यानंतर ती वेळेवर तोडावी. असं केल्यास पुन्हा नवी फुलं लवकर येतात. कीड टाळण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा फवारा किंवा सौम्य कीटकनाशक वापरलं तर रोप सुरक्षित राहतं.

सणासुदीच्या दिवसांत बाजारात झेंडू मिळतो. पण स्वतः च्या कुंडीत उगवलेली फुलं वेगळाच आनंद देऊन जातात. रोजचं पाणी, थोडं ऊन आणि वेळोवेळी खत दिलं तर कुंडीतलं मस्त फुले येतील. दसरा, दिवाळी किंवा कुठलाही सण असो, आपल्या घरच्या घरी उगवलेल्या झेंडूने सजलेलं घर नक्कीच अधिक सुंदर दिसेल.