रक्तदाब वाढला म्हणजे लगेच औषधं घ्यायची वेळ आली असं नाही. योग्य जीवनशैली आणि काही साध्या सवयी बदलल्यास रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करता येतो. क्वोरावर एका युजरने “औषधांशिवाय रक्तदाब पटकन कमी करण्याचा मार्ग काय?” असा प्रश्न विचारला होता. याच विषयावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. अमित सराफ यांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

त्यांच्या मते, “रक्तदाब कमी करण्यासाठी तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम सर्वात जलद दिसतो — मीठाचे प्रमाण कमी करणे, नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आणि पुरेशी झोप व तणाव नियंत्रण ठेवणे. या तीन सवयी बदलल्यास काही आठवड्यांतच रक्तदाबात सुधारणा जाणवू शकते.”

आहारातले झटपट बदल (Dietary changes to reduce BP)

डॉ. सराफ यांच्या मते, आहारात खालील गोष्टींचा त्वरित परिणाम दिसतो –

  • मीठ कमी करा: चिप्स, लोणची, पापड, ब्रेड, रेस्टॉरंटमधील ग्रेव्ही, सॉस यांसारख्या पदार्थांमध्ये सर्वाधिक मीठ असतं. यांचे सेवन कमी केल्याने शरीरात पाणी कमी टिकून राहते आणि धमनीवरील दाब कमी होतो.
  • वनस्पतीजन्य अन्न वाढवा: भाज्या, फळं, डाळी, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दूध यात भरपूर पोटॅशियम असतं, जे सोडियमचा परिणाम कमी करतं.
  • साखर आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन कमी करा: हे घटक वजन वाढवतात आणि शरीरात सूज निर्माण करतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.
  • सोपा उपाय : जेवणात मीठ वाढवू नका आणि शक्य तितके घरगुती जेवण घ्या.

औषधांशिवाय परिणाम देणाऱ्या सवयी (Non-diet habits that show fast results)

  • दररोज हालचाल करा: दिवसातून किमान ३० मिनिटे वेगाने चालल्याने हृदयाचं कार्य सुधारतं आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात.
  • वजन नियंत्रणात ठेवा: अगदी थोडं वजन कमी झालं तरी हृदयावरील ताण कमी होतो.
  • झोप आणि तणावावर नियंत्रण: अनियमित झोप, सततचा ताण हे रक्तदाब वाढवतात. खोल श्वास घेणे, शांत वेळ घेणे आणि नियमित झोपेचं वेळापत्रक पाळणं फायदेशीर ठरतं.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा: हे दोन्ही घटक रक्तदाब सतत वाढवतात आणि हृदयाचे वय लवकर वाढवतात.

बदल मोजा आणि सातत्य ठेवा (Track progress and stay consistent)

  • घरच्या घरी ब्लड प्रेशर तपासा. सुधारणा दिसल्यास प्रोत्साहन मिळतं.
  • सातत्य ठेवा. जीवनशैलीतील बदल तात्पुरते नव्हे, दीर्घकाळासाठीच परिणाम देतात.
  • डॉ. सराफ सांगतात “ज्यांना गंभीर उच्च रक्तादाब, मधुमेह किंवा किडनीचे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जीवनशैलीतील सुधारणा महत्त्वाच्या असल्या तरी त्या उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत.”

लक्षात ठेवा

मीठ कमी करा, चालण्याची सवय लावा आणि झोपेची काळजी घ्या! हे तीन सोपे पण प्रभावी स्तंभ तुमचा रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी करून दीर्घकाळासाठी हृदय निरोगी ठेवतात.