International Yoga Day 2025: देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतोच, त्याशिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे म्हणता येईल. बदलत्या लाईफस्टाईलमुळे हल्ली पीसीओडीचा त्रास असणाऱ्या मुलींची- महिलांची संख्या खूप आहे. नियमितपणे व्यायाम केला आणि आहारावर नियंत्रण ठेवले तर हा त्रास नक्कीच नियंत्रणात आणता येतो.
आधीच्या काळात फक्त जास्त वय असलेल्या महिलांनाच पीसीओडीची समस्या असायची. पण, आता १५ ते १६ वर्ष वयोगटातसुद्धा या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. यामध्ये चेहरा आणि शरीराचे केस खूप जास्त दाट उगवतात. मात्र, योगाच्या माध्यमातून पीसीओडीची समस्या कमी करता येऊ शकते; कारण योगा केल्याने शरीरातील मानसिक, शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असतो. मेंटल टॉक्सीन्स आणि फिजिकल टॉक्सिन्सना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. आज आम्ही तुम्हाला अशा योगासनांबद्दल सांगणार आहोत. ही योगासनं करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता
तितली आसन (Butterfly Posture) :
तितली आसन करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर चटई टाकून बसावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे गुडघे वाकवून पाय जवळ आणावे लागतील. आता तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांचे तळवे एकत्र ठेवावे लागतील. आता दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवा. शेवटी फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मांड्या वर करून खाली करा. या स्थितीत काही मिनिटे ही प्रक्रिया पुन्हा करत राहा.
भुजंगासन
पीसीओडीमध्ये बऱ्याचदा पोटाची चरबी वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही ते कमी करण्यासाठी भुजंगासन करू शकता. तुमच्या दिनचर्येत याचा नियमितपणे समावेश केल्याने ताण कमी होतो आणि पचनसंस्था निरोगी राहते. भुजंगासन केल्याने पोटावरील दाब कमी होतो आणि आम्लपित्त आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळतो.
धनुरासन
जर तुम्ही दररोज धनुरासन केले तर ते PCOD मध्ये हार्मोन्स संतुलित करण्यास उपयुक्त ठरू शकते. तसेच, हे आसन केल्याने प्रजनन अवयव मजबूत होतात आणि मासिक पाळी सुधारण्यास मदत होते. यासोबतच ते तुमचे संपूर्ण शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवते.
मालासन
मालासन केवळ एका नव्हे तर अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. विशेषतः ते पीसीओडीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. हे योगासन दररोज मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर करते. यासोबतच पचनसंस्था निरोगी राहते आणि चयापचय सुधारते.
बद्धकोनासन
जर महिलांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत बद्धकोनासनाचा समावेश केला तर स्नायूंना आराम मिळतो. यासोबतच मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या समस्याही कमी होतात. हे योगासन केल्याने प्रजनन आरोग्यदेखील सुधारते.