Hibiscus flower Tips: आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.
जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातल्या दोन वस्तूंचा वापर करून खत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याचबरोबर जास्वंदच्या झाडाला कीड लागते तर त्यासाठी कोणती कीटकनाशके फवारायची, याचीदेखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
कुंडीमध्ये लावलेल्या जास्वंदाच्या झाडाला कळ्याफुले येण्यासाठी वेळोवेळी खत टाकणे आवश्यक असते; पण त्याचबरोबर झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आता हिवाळ्यामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी धुके पडते, म्हणून झाडाच्या पानांमध्ये ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळे झाडाच्या पानांवर कीड लागत राहते. त्यामुळे आपण आज ज्या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत, ते म्हणजे राखेपासून तयार केलेले पाणी.
केळीचे साल
आता झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत, त्यातली पहिली वस्तू म्हणजे सुकलेल्या केळीच्या सालीचे तुकडे. झाडांना फुले येण्यासाठी जी पोषक तत्त्वे आवश्यक आहेत ती सर्व केळीच्या सालीमध्ये असतात. म्हणजेच पॉटेशियम फॉस्फरस हे जास्त प्रमाणात केळीच्या सालीमध्या असतात.
चहापावडर
चहापावडर झाडांसाठी अतिशय उपयुक्त असते कारण यात नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे झाडे चांगली वाढतात तर कळ्या, फुलेही मोठ्या प्रमाणात येतात. फुलांचा रंग गडद होण्यासाठीदेखील मदत होते. पण जेव्हा ताजी चहापावडर वापरायची असते तेव्हा त्याचा वापरही प्रमाणशीर करणे गरजेचे असते.
कसे तयार कराल खत?
खत तयार करण्यासाठी एक लीटर पाण्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर आणि केळीच्या साली (१ ते दीड मूठ) मिक्स करून घ्या. हे पाणी दोन दिवस झाकून ठेवायचे. दोन दिवसांनी हे खत तयार झालेले दिसेल.
तयार झालेलं खत व्यवस्थित मिक्स करायचं.त्यानंतर ते एका गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. या गाळलेल्या पाण्यात एक ते दीड कप साधे पाणी मिक्स करून या खताचा वापर झाडाला करू शकतो.
१० ते १२ इंचाच्या कुंडीसाठी महिन्यातून एकदा एक ते दीड मग या प्रमाणात द्यायचे. जास्वंदाच्या झाडाला पाणी देताना ते कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतकं पाणी द्यावं. तसंच पाणी देण्याआधी माती हलवून मोकळी करून घ्यावी.
