Kajol’s protein shake recipe: प्रोटीन शेक हा बऱ्याच लोकांचा दैनंदिन आहाराचा एक भाग आहे. ते फक्त फिटनेस प्रेमी किंवा जिममध्ये जाणाऱ्यांसाठी नाही. विद्यार्थी, काम करणारे व्यावसायिक आणि अगदी व्यस्त पालकदेखील प्रोटीन शेक आवर्जून घेतात. केवळ तयार प्रोटीन पावडरवर अवलंबून राहण्याऐवजी आता बरेच जण घरच्या घरी हा शेक बनवतात. याच्या अनेक रेसिपीज युट्यूबवरही उपलब्ध आहेत.

काजोलच्या प्रोटीन शेकची खास रेसिपी

काजोल, ट्विंकल खन्ना, आमिर खान आणि सलमान खान हे एका ओटीटीवरील टॉक शोसाठी एकत्र आल्या होत्या. त्यावेळी प्रोटीन शेकच्या विषयावरून एक मजेदार वळण या शोमध्ये आलं. यावेळी बोलताना काजोलने खुलासा केला की तिची स्वत:ची अशी एक रेसिपी आहे, जी ती नेहमीच वापरते. काही अंडी, बदामाचे दूध आणि संत्र्यांचा रस अशी माझी एक प्रोटीन शेकची रेसिपी आहे असं काजोल म्हणाली.

हे पदार्थ ऐकून ट्विंकल खन्नानेही खूपच विनोदात्मक प्रतिक्रिया दिली. पण प्रत्यक्षात ती रेसिपी खूप सोपी असल्याचे काजोलने म्हटले.

सलमान काय म्हणाला…

काजोलने तिची ही रेसिपी फक्त सांगितलीच नाही, तर ती टेस्टही करायला दिली. तिने तिच्या सेलिब्रिटी पाहुण्यांना ती टेस्ट करायला सांगितली. आमिरने हा शेक टेस्ट केल्यावर वेगळाच चेहरा केला. तर सलमानने “हे १०० टक्के पोट खराब करेल”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काजोलचा हा शेक खरोखर प्रथिनयुक्त आहे का?

अंडी- अंडं हा एक ऊर्जा देणारा घटक आहे. यामध्ये सर्वोत्तम नैसर्गिक प्रथिन स्त्रोत आहे. तसंच यात शरीराला आवश्यक असलेले सर्व आवश्यक अमीनो आम्ल असते. एका मोठ्या अंड्यात सुमारे ६ ग्रॅम उच्च गुणवत्तेची प्रथिने असतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अंड्याच्या आकारानुसार थोडेसे बदलते.

बदामाचे दूध- बदामाच्या दूधात सामान्य गाईच्या दुधाइतकी प्रथिने नसली तरी हे हलके आहे. तसंच दुग्धजन्य पदार्थांना उत्तम पर्याय आहे. यात एक क्रिमी बेस असतो आणि तो पचण्यास सोपा असतो.

संत्र्यांचा रस- यामध्ये प्रथिने नाहीत, मात्र व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि एक ताजा पदार्थ आहे. संत्र्यांचा रस अंड्याचा जडपणा संतुलित करतो.