Thyroid Cancer Early Symptoms: प्रसिद्ध KGF व ओम या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते हरीश राय आता आपल्यासोबत नाहीत. वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी त्यांनी थायरॉईड कर्करोगाशी दीर्घ लढा देत अखेर प्राण गमावले. बेंगळुरूमधील किडवई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कर्करोगाने पोट आणि इतर अवयवांवरही आक्रमण केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.
हरीश राय यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा थायरॉईड कर्करोग या ‘निःशब्द मारेकऱ्या’कडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हा आजार अगदी सुरुवातीला कुठलेही वेदनादायक लक्षण न दाखवता, हळूहळू शरीरात मुळे रोवतो आणि वेळ गेल्यानंतरच त्याचा अंदाज येतो.
थायरॉईड म्हणजे नेमकं काय?
थायरॉईड ही आपल्या मानेच्या पुढच्या भागात असलेली फुलपाखरासारख्या आकाराची छोटी ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्स तयार करून चयापचय, रक्तदाब, तापमान आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवते. या ग्रंथीमध्ये निर्माण होणाऱ्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे थायरॉईड कर्करोग निर्माण होतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी हा आजार ओळखला गेला, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उशीर झाल्यास आणि कर्करोग इतर अवयवांपर्यंत पसरल्यास उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात.
सुरुवातीची लक्षणं जी अनेकदा दुर्लक्षित राहतात
डॉ. महेश डी. एम., एंडोक्रायनॉलॉजी तज्ज्ञ, अॅस्टर सीएमआय हॉस्पिटल, बेंगळुरू यांनी सांगितले,
”बहुधा मानेच्या पुढील भागात दिसणारी वेदनारहित गाठ किंवा सूज हा थायरॉईड कर्करोगाचा पहिला संकेत असू शकतो. काहींच्या आवाजात खरखर, गळ्यात घट्टपणा किंवा गिळताना त्रासही जाणवू शकतो. जर हा आजार पसरू लागला, तर अकारण वजन घटणे, थकवा, पोट किंवा हाडांमध्ये वेदना अशी लक्षणं दिसू शकतात.” त्यांचे म्हणणे आहे की, अशी कोणतीही गाठ किंवा बदल जाणवल्यास ती कधीही दुर्लक्षित करू नये.
थायरॉईडचा साधा त्रास की कर्करोग?
सामान्य थायरॉईड विकारांमध्ये (जसे की हायपोथायरॉईडिझम किंवा हायपरथायरॉईडिझम) वजन, मूड आणि ऊर्जा यात बदल जाणवतात; पण गाठ निर्माण होत नाही. डॉ. महेश म्हणतात, “थायरॉईड कर्करोगात मुख्य फरक म्हणजे गाठ, आवाजात कायम बदल किंवा न जाणारी सूज ही लक्षणे साध्या थायरॉईड विकारांमध्ये नसतात.”
लवकर ओळखण्यासाठी काय करावे?
- दरवर्षी एकदा थायरॉईड तपासणी करावी.
- मानेत बदल, गाठ किंवा आवाजात फरक जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- तपासणीसाठी अल्ट्रासाऊंड किंवा सूक्ष्म सुईद्वारे बायोप्सी केली जाते. रक्त तपासणीने फक्त थायरॉईडची कार्यक्षमता समजू शकते; कर्करोगाची पुष्टी मात्र होत नाही.
थायरॉईडची काळजी कशी घ्यावी?
डॉ. महेश यांच्या मते
- आहारात आयोडिनयुक्त मीठ आणि पौष्टिक अन्न घ्यावे.
- अनावश्यक रेडिएशनपासून बचाव करावा.
- आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाचा थायरॉईडचा इतिहास असल्यास रुग्णाची नियमित तपासणी करावी.
शेवटचा इशारा
हरीश राय यांच्या निधनाने एक प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. आपण स्वतःकडे वेळेत लक्ष देतो आहोत का?
थायरॉईड कर्करोग दिसायला ‘साधा’ असला तरी त्याची लक्षणं फसवी असतात. म्हणूनच मानेत दिसणारी कोणतीही गाठ छोटी असो वा मोठी ती दुर्लक्षित करू नका.
आजाराची लवकर ओळख, योग्य उपचार व जागरूकता हाच रुग्णाच जीव वाचवण्याचा खरा मंत्र आहे.
