अनेक नॉनव्हेजप्रेमींना मासे खायला खूप आवडतात. पण, घरातील काही लोकांना माश्यांचा वास आवडत नसल्याने मनात असूनही काही जण घरात मासे शिजवू शकत नाहीत. परंतु, आता मासे शिजवल्यानंतर पसरणाऱ्या दुर्गंधीचे टेन्शन घेऊ नका. कारण- आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत; ज्याच्या मदतीने तुम्ही मासे शिजवल्यानंतर किचनमध्ये तासनतास येणारा वास काही मिनिटांत दूर करू शकता.

व्हेंटिलेशन

जेव्हाही तुम्ही मासे शिजवायला जाल तेव्हा किचनची खिडकी उघडी ठेवा. नाही तर तिथला एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा. असे केल्यास सुरुवातीपासूनच वास कमी येईल. दुसरा फायदा असा होईल की, काही वेळात संपूर्ण दुर्गंधी दूर होईल.

व्हिनेगर आणि पाणी

एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा आणि त्यात दोन ते तीन चमचे व्हिनेगर घाला. तळाला पाणी राहीपर्यंत ते उकळू द्या. हे पाणी आणि त्यातून निघणाऱ्या वाफेमुळे मच्छीचा येणारा वास कमी होईल.

व्हिनेगर आणि दालचिनी

जर तुम्हाला दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्याबरोबरच ती जागा सुवासिकही बनवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही व्हिनेगर असलेल्या उकळत्या पाण्यात दालचिनी टाकू शकता. त्यासह त्यात इसेन्शियल तेलाचे काही थेंबदेखील टाकू शकता. अशा रीतीने तुम्ही केवळ तुमचे किचनच नाही, तर संपूर्ण घर सुवासिक बनवू शकता.

एअर फ्रेशनर

अशावेळी तुम्ही घरात एअर फ्रेशनरदेखील वापरू शकता. पण, मासे शिजवल्यानंतर लगेच त्याचा वापर करू नका. थोडा वेळ पंखा चालू ठेवा आणि मग एअर फ्रेशनर स्प्रे करा. एअर फ्रेशनरचा सुगंध पंख्याच्या हवेत मिसळल्याने घरातील दुर्गंधी दूर होईल.

मेणबत्तीचा करा वापर

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सुगंधी मेणबत्तीचाही वापर करू शकता. अर्थात, या प्रक्रियेचा परिणाम साधण्यास थोडा वेळ लागेल. कारण- मेण वितळून सुगंध पसरण्यास वेळ लागतो.