Liver Cancer Treatment: कॅन्सर हा एक असा आजार आहे की, ज्याला तो होतो त्याचे आयुष्यच बदलून जाते. कॅन्सर कोणालाही, कधीही होऊ शकतो. जगभरात कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि दरवर्षी लाखो लोकांचा जीव त्यामुळे धोक्यात येतो. लिव्हर कॅन्सर हा जगातील सर्वांत धोकादायक कॅन्सरपैकी एक आहे. त्याचा उपचार खूप महाग आणि मर्यादित आहे. पण आता लिव्हर कॅन्सरशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे. संशोधनानुसार, एका नवीन पद्धतीने लिव्हर कॅन्सरचा उपचार फक्त स्वस्तच होणार नाही, तर अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवता येणार आहे.

खरं तर, लिव्हर हा शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आणि महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी शरीरासाठी लिव्हर नीट काम करणे खूप गरजेचे आहे. तो फक्त शरीर शुद्ध (डिटॉक्स) करीत नाही, तर मेटाबॉलिझम नियंत्रित ठेवणे आणि हार्मोन्सचे संतुलन राखणे यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रोसेस्ड फूड, दारूचे सेवन, चुकीची जीवनशैली आणि सतत बसून राहण्याची सवय लिव्हरवर जास्त ताण आणते. त्यामुळे लिव्हरशी संबंधित गंभीर आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे.

लिव्हरचा कॅन्सरसाठी सर्वांत स्वस्त उपचार कोणता आहे?

अमेरिकेच्या डेलावेअर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पेरूतून मिळालेल्या विशेष अणूं (मॉलिक्यूल्स) च्या मदतीने नवी आशा निर्माण केली आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांनी ‘नॅचरल प्रॉडक्ट टोटल सिंथेसिस’ नावाची पद्धत वापरून हे मॉलिक्यूल्स लॅबमध्ये पुन्हा तयार करण्याची कमी खर्चीक आणि मोठ्या प्रमाणावर करण्याची पद्धत विकसित केली आहे. या शोधामुळे भविष्यात लिव्हर कॅन्सरचा उपचार फक्त स्वस्त होणार नाही, तर अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवणेसुद्धा सोपे होणार आहे.

लिव्हर कॅन्सरवर निसर्गातून बनणारे औषध कसे तयार होईल?

नैसर्गिक स्रोतांपासून औषध तयार करणं काही नवीन नाही. इतिहासात अनेक औषधे झाडांपासून मिळालेली आहेत, जसे विलो बार्कपासून बनलेली अॅस्पिरिन किंवा इतर हर्बल औषधे. डेलावेअर विद्यापीठाच्या टीमने पेरूतील मॉलिक्यूल्स लॅबमध्ये तयार करण्याचा मार्ग शोधला आहे. त्यामुळे संशोधक फक्त पुरेशी मात्रा तयार करू शकतील असे नाही, तर भविष्यात या औषधांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणेही शक्य होईल.

पेरूतील मॉलिक्यूल्स आणि लिव्हर कॅन्सरचा उपचार

संशोधनात मिळालेल्या पेरू आधारित मॉलिक्यूल्स विशेषतः लिव्हर आणि पित्त नलिकेच्या (बाइल डक्ट) कॅन्सरवर प्रभावी ठरू शकतात. या दोन्ही कॅन्सरला उपचार करणे खूप कठीण मानले जाते आणि त्याच्या शेवटच्या टप्प्यात (लास्ट स्टेज) रुग्णाच्या पाच वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता १५% पेक्षा कमी असते.

आता या अणूंना लॅबमध्ये सोप्या पद्धतीने तयार करता येईल. शास्त्रज्ञ सध्याच्या औषधांबरोबर त्यांचे संयोजन शोधू शकतात आणि प्री-क्लिनिकल चाचण्या लवकर पूर्ण करू शकतात. त्यामुळे लवकरच असे लक्ष्यित (टार्गेटेड) आणि अधिक प्रभावी उपचार तयार होऊ शकतात, ज्यासाठी नैसर्गिक झाडांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

संशोधनानुसार, याची प्रक्रिया स्वस्त आणि पुन्हा करता येण्याजोगी आहे. शास्त्रज्ञांनी एक प्रकारची ‘रेसिपी’ तयार केली आहे, ज्याचे अनुसरण करून जगभरातील रसायनशास्त्रज्ञ पेरूच्या अणूंना स्वतः तयार करू शकतात. प्रोफेसर विल्यम चेन यांच्या मते, जास्तीची क्लिनिकली मान्यताप्राप्त औषधे बहुधा नैसर्गिक उत्पादनांपासून बनलेली असतात किंवा त्यावर आधारित असतात; पण नैसर्गिक स्रोत मर्यादित असतात. आता आमच्या पद्धतीने कोणतीही लॅब हे अनुसरण करून औषध तयार करू शकते.