-डॉ. प्रशांत मखीजा
करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक घरीच आहे. मात्र अनेक जण घरी राहून वर्क फ्रॉम होम करत आहेत. सतत घरात असल्यामुळे प्रत्येकाचा दिनक्रम बदलेला आहे. दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक बदलल्यामुळे अनेकांच्या झोपेवर त्याचा परिणाम झाला आहे. सहाजिकचं त्यामुळे अनेक जणांना निद्रानाशाची समस्या निर्माण झाली आहे. रात्री उशीरा झोपणे, झोपेच्या वेळेत मोबाईल फोन, टिव्ही अथवा लॅपटॉप पाहणे, सकाळी उशीरा उठणे अशा सवयींमुळे झोपेच गणित जूळत नसल्याचे पहायला मिळते. त्यामुळे काही सहजसोपे उपाय आहेत, ज्यामुळे या समस्येवर तोडगा निघू शकतो.
यामुळे होतो झोपेच्या वेळेवर परिणाम
१. झोप न येण्यामागची कारणे कोणती?
२. शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होणे.
३.वर्क फ्रॉम होममुळे कामाच्या वेळेत झालेले बदल.
४. घरी राहिल्याने स्क्रीनटाइममध्ये वाढ होत आहे आणि मोबाइल फोन्सचा अतिवापर होत आहे.
५. नोकरीविषयक चिंता सतावणे
६. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नकारात्मक येणे.
झोप येण्यासाठी हे उपाय करा
१. झोपेचे वेळापत्रक तयार करा –
शांत झोप लागण्यापूर्वी झोपेचं वेळापत्रक तयार करा आणि बरोबर त्याच वेळेस झोपा. यामुळे तुमच्या झोपेची वेळ निश्चित केली जाईल आणि शरीराला आवश्यक असणारी झोप मिळेल.
२. स्क्रीन टाईमवर मर्यादा आणा –
आजकाल प्रत्येक जण झोपताना मोबाईल हाताशी बाळगत असतो. त्यामुळे सतत मोबाईलचा वापर केल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. याच कारणास्तव स्क्रीन टाइम निश्चित करा. तसंच झोपण्यापूर्वी २ तास मोबाईल पाहू नका.
३. सकस आहार घ्या –
सकस आहार हा शरीरासाठी कायम फायदेशीर, त्यामुळे कायम सकस आणि ताजे अन्नपदार्थ खा. तसंच चहा-कॉफी असे पदार्थ शक्यतो टाळा.
४. प्राणायाम करा –
मानसिक स्वास्थ उत्तम ठेवणारे व्यायाम करा. हे व्यायाम प्रकार झोपायला जाण्याआधी केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होईल. तसंच कोणताही व्यायाम करण्यापूर्वी शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
५. सतत एका ठिकाणी बसून काम करु नका –
दिवसभरातून किमान ३० मिनिटं शरीराची हालचाल करा. डान्स किंवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. सतत बैठी कामं करु नका. शरीराची हालचाल करत रहा.
६. छंद जोपासा –
मानसिक तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासणे उत्तम ठरेल. मोकळ्या वेळेत नकारात्मक विचार मनात न येऊ देता आपल्याला आवडणा-या गोष्टी करा.
(लेखक डॉ. प्रशांत मखीजा मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये कन्सलटंट न्युरोलॉजिस्ट आहेत.)