How To Make Banana Hair Mask : प्रत्येकाला आपले केस सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यामुळे केस सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करून बघत असतो. यामुळे केस तात्पुरते सुंदर दिसतात. पण, नंतर आपल्या केसांची स्थिती पुन्हा आहे तशीच होते. याचे मुख्य कारण चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण, शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव, रासायनिक उत्पादनांचा अतिवापर, हेअर स्टाइलिंग टूल्सचा जास्त वापर , केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होणे आणि तुटणे असते.

तर कोरडे केस मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी तुम्ही सतत पार्लरमध्ये जात असाल, तर थांबा. महागडे केसांचे उपचार करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपायदेखील अवलंबू शकता. अलीकडेच ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने तिच्या यूट्यूब चॅनेलवर याचसंबंधित एक टिप शेअर केली आहे. केस मऊ, चमकदार दिसण्यासाठी माधुरी दीक्षित केळ्यापासून हेअर मास्क बनवते. हा हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केला जातो. त्यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही.

तर तुमच्या घरात जास्त पिकलेली केळी असतील आणि तुम्ही ती फेकून देणार असाल, तर त्याऐवजी हा मास्क तयार करा.

केळ्याचा हेअर मास्क कसा बनवायचा?

केळ्याचे तुकडे करून, ते व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यात एक चमचा नारळाचे तेल, अर्धा चमचा मध घालून ते सर्व काही एकत्र मिसळून घ्या आणि ते केसांना लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी केस धुवा.

केळ्याच्या मास्कचे फायदे

केळ्याच्या हेअर मास्कने केसांना चमक येते, तुमचे केस मऊ, रेशमी, चमकदार व निरोगी राहण्यास मदत होते. केसांच्या उत्पादनांच्या वापरापासून होणारे दुष्परिणाम दूर करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही दर २० दिवसांनंतर हे अगदी आरामात लावू शकता.