Mosquito Killer Home Remedy: उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, कोणताही ऋतू असो, मच्छरांची फौज घरात घुसली की जीवन त्रासदायक होतं. झोप तर दूरच, पण बसणं देखील अवघड होतं. विशेष म्हणजे दार-खिडक्या उघड्या राहिल्या की रात्रीची झोप उडते. कानाजवळ सततचा भिनभिनाट, अंगावर मच्छर चावणं, आणि त्यातून डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मच्छर फक्त त्रासदायक नाही, तर आरोग्यासाठीही गंभीर समस्या ठरते.

या सगळ्यामुळे लोक बाजारातून केमिकल स्प्रे, कॉईल्स, अगरबत्ती किंवा इतर मच्छर मारणाऱ्या वस्तू विकत आणतात. सुरुवातीला त्यांचा काहीसा फायदा होतो, खोलीतील मच्छर कमी होतात. पण हा परिणाम तात्पुरता असतो. धूर संपल्यानंतर पुन्हा मच्छर परत येतात. शिवाय या वस्तूंचा दीर्घकाळ वापर आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो. सतत धूर किंवा केमिकल्सचा श्वास घेतल्याने डोकेदुखी, डोळ्यात जळजळ किंवा श्वसनाचे त्रास निर्माण होऊ शकतात. मात्र, यावर एक अगदी सोपा, नैसर्गिक आणि आरोग्यदायी उपाय म्हणजे गवती चहा.

आपल्या अंगणात किंवा घरात लावलेली गवती चहाचे झाडं केवळ सजावटीसाठी नाहीत, तर ते मच्छर पळवण्यातही उपयुक्त ठरते. गवती चहाच्या पानांमध्ये नैसर्गिक सुगंधी तेल (सिट्रोनेला ऑइल) असते. हा वास मच्छरांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे मच्छर आपोआपच घराबाहेर पळतात. याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, गवती चहाचे झाडं एकदा लावली की त्यांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. थोडं पाणी दिलं तरी ती सहज वाढतात. त्यांच्या पानांचा उपयोग तुम्ही चहा, काढा, किंवा घरगुती औषधांमध्येही करू शकता. म्हणजेच मच्छरांपासून बचाव तर होतोच, शिवाय आरोग्यासाठीही ही झाडं उपयुक्त ठरतात. घरात गवती चहाचे झाड लावणं म्हणजे दोन फायदे , एकीकडे मच्छरांचा त्रास संपवतो आणि दुसरीकडे आरोग्यदायी वातावरण घरात टिकवतो.

गवती चहापासून डास हाकलणारं स्प्रे कसं तयार कराल?

मच्छरांना दूर ठेवण्यासाठी गवती चहाचा स्प्रे हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. यासाठी घरातल्या बागेत मिळणाऱ्या ताज्या गवती चहाच्या पानांचा वापर करा. सर्वप्रथम ही हिरवीगार पानं स्वच्छ धुऊन घ्या आणि बारीक तुकडे करून एका भांड्यात उकळत्या पाण्यात टाका. साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटे हे पाणी उकळू द्या, त्यामुळे गवती चहातील सुगंधी घटक पाण्यात मिसळतात. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यावर स्प्रे च्या बॉटलमध्ये भरून ठेवा. असा तयार केल्याने स्प्रे घरभर फवारता येतो आणि मच्छर घरात शिरत नाहीत. हा उपाय केमिकलशिवाय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.

गवती चहाच्या पानांचं उकळलेलं पाणी कसं वापरायचं?

गावती चहाची पानं उकळून तयार केलेलं पाणी थंड झाल्यावर नीट गाळून घ्या आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे पाणी म्हणजे नैसर्गिक मच्छर हाकलणारं उपाय आहे. जर घरात मच्छरांची संख्या खूप जास्त असेल तर यात थोडं कापूर बारीक करून मिसळा. संध्याकाळच्या वेळी दारं, खिडक्या, कोपरे आणि अंधाऱ्या जागांवर हे पाणी शिंपडावं. गवती चहाचा सुगंध मच्छरांना अजिबात सहन होत नाही आणि त्यामुळे ते घराबाहेर पळतात. हा उपाय सुरक्षित, नैसर्गिक आणि घरच्या घरी सहज करता येण्यासारखा आहे.

गवती चहाचे इतर फायदे

गवती चहाचा सुगंध घरात एक वेगळाच ताजेपणा आणतो. त्यामुळे वातावरणात गंध राहतो आणि मन प्रसन्न होतं. याच्या पानांचा काढा केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त असतो. तो पचन सुधारतो, थकवा कमी करतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. गवती चहामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म असल्याने सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. या पानांचं द्रावण मच्छरांना दूर ठेवण्यासाठीही प्रभावी ठरतं. सर्वात चांगली बाब म्हणजे गवती चहा एकदा लावला की तो कमी देखभालीत दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे हा उपाय केवळ नैसर्गिकच नाही, तर आरोग्यसाठी सुध्दा चांगला आहे.