पावसाळ्यात डास, मच्छर यांचा त्रास सहन करावा लागतो. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होऊ शकतात. घरातून डासांना पळवून लावण्यासाठी अगरबत्ती, धूप असे वेगवेगळे उपाय आपण करतो. पण अशीही काही झाडे आहेत ज्यामुळे घराच्या खिडकी आणि बाल्कनीची शोभा तर वाढतेच शिवाय डासांपासून कायमची मुक्ती देखील मिळू शकते. घरापासून डासांना दूर ठेवणाऱ्या ‘या’ झाडांबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. सायट्रोनेला गवत

सायट्रोनेला गवत डासांना दूर ठेवण्यास मदत करते. या गवतामधून निघणारे सायट्रोनेला तेल हे मेणबत्ती, परफ्युम बनवण्यासाठी वापरले जाते. सायट्रोनेला गवत बाल्कनीत लावल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचे डास दूर राहतात.

२. झेंडूचे झाड

झेंडूच्या फुलांमुळे बाल्कनीची शोभा वाढते. शिवाय झेंडूच्या फुलांना येणाऱ्या वासामुळे मच्छरही दूर राहतात. झेंडूच्या झाडाचे आफ्रिकन आणि फ्रेंच असे दोन प्रकार आहेत. या दोन्हीही प्रकारात डासांना प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत.

३. तुळस

तुळशीच्या रोपाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरात असलेली तुळस ही गुणकारी मानली जाते. रोज सकाळी उठून तुळशीची पूजा केली जाते. याच तुळशीच्या रोपट्यात डासांना दूर ठेवणारे गुणधर्म देखील आहेत.

४. लव्हेंडर

लव्हेंडरचे रोपटे हा डासांना दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. बाल्कनीत लव्हेंडरचे रोपटे लावल्यास डास दूर राहतात. डासांना दूर ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपासून त्वचा आणि आरोग्याला हानी पोहचू शकते. लव्हेंडर ऑइल पाण्यात मिसळून केमिकल फ्री मॉस्किटो सोल्युशन बनवून त्वचेवर लावता येते.

५. रोजमेरी

निळ्या रंगाची रोजमेरीची फुलं देखील डासांना दूर ठेवतात. झेंडू आणि लव्हेंडर प्रमाणेच रोजमेरीमध्ये देखील डासांना प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. रोजमेरीचे रोपटे बाल्कनीत लावल्यामुळे शोभा तर वाढतेच शिवाय डासांपासूनही मुक्ती मिळते.

बाल्कनीत ही झाडे लावून घराची शोभा तर वाढलेच पण त्यासोबतच तुम्हाला डासांच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासही मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mosquitoes repellent plants dengue malaria diseases kak