Mouth Cancer Symptoms: तोंडाची स्वच्छता ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे की कॅन्सर. अनेक लोकांना वाटतं की, तोंडाची स्वच्छता म्हणजे फक्त दातांची काळजी घेणे; पण हे पूर्णपणे खरं नाही.

तोंडाची चुकीच्या पद्धतीनं काळजी घेणं हे हृदयाच्या आजारांचं कारण ठरू शकतं, हे आपल्याला माहीतच आहे; पण तुम्हाला हे माहीत आहे का की, तोंडाची नीट स्वच्छता न ठेवण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकतं? अलीकडील संशोधनात असं आढळलं आहे की, तोंडाची बिघडलेली आरोग्यस्थिती आणि तोंड, डोके, मान यांच्या कॅन्सरमध्ये थेट संबंध असतो.

रोज दोन वेळा दात न घासणं, तोंडातून दुर्गंध येणं आणि जिभेवरील पांढरा थर न काढणं, दातांवर प्लाक व टार्टर साचणे, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा सूज येणं आणि त्याकडे दुर्लक्ष करणं, दातांना कीड लागणं किंवा दात सडणं ही सगळी तोंडाच्या अस्वच्छतेमुळे तोंडाची स्थिती बिघडल्याची लक्षणं आहेत.

तोंडाची व्यवस्थित देखभाल न ठेवल्यास हळूहळू हिरड्यांचा पेरियोडोंटायटिस नावाचा आजार होऊ शकतो. ही एक अशी समस्या आहे की, ज्यात हिरड्यांना सतत संसर्ग होतो. त्यामुळे तोंडात कायम सूज राहते. ही सूज पेशी व ऊतींना हानी पोहोचवते आणि त्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढायला सुरुवात होते. संशोधनात असं दिसून आलं आहे की, ज्यांना हिरड्यांचे आजार असतात, त्यांना तोंड, पोट व अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. खराब झालेल्या तोंडात वाढणारे जंतू रक्तामध्ये पसरू शकतात आणि त्यामुळे संपूर्ण शरीराला सूज होऊ शकते. ही सूज कॅन्सरचा धोका वाढवते.

आकाश हेल्थकेअरचे डायरेक्टर व सर्जिकल ऑन्कोलॉजीतले डॉक्टर अरुण कुमार गिरी यांनी सांगितले की, जर आपण तोंडाची स्वच्छता नीट राखली नाही, तर दोन प्रकारचे कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते– एक म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर आणि दुसरा म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सर.

जर तोंड आणि दातांची स्वच्छता योग्य नसेल, तर तोंडातले जंतू कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. हे दोन्ही कॅन्सर जर पहिल्या टप्प्यात (स्टेज-1) समजले, तर त्यावर सहज उपचार करता येतात. पण, जर शरीरात लक्षणं दिसूनसुद्धा रुग्णानं सहा महिने त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, तर कॅन्सर पुढच्या टप्प्यात जातो आणि त्यावर उपचार करणं कठीण होतं. चला तर मग, तज्ज्ञांकडून ओरल हायजिनशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं जाणून घेऊ, जी कॅन्सर ओळखण्यासाठी, त्यापासून बचाव आणि उपचारासाठी उपयोगी ठरू शकतात.

हिरड्यांना सूज येणं किंवा वारंवार तोंडात फोड येणं हीसुद्धा धोक्याची चिन्हं का? (Mouth Cancer Signs)

डॉक्टरांनी सांगितलं की, हिरड्यांना सूज येणं किंवा वारंवार तोंडात फोड येणं हे कधी कधी धोक्याचं लक्षण असू शकतं; पण नेहमीच नाही. तज्ज्ञ म्हणाले की आपल्या देशात लोक तोंडाच्या स्वच्छतेबाबत फारसे जागरूक नाहीत. अनेक लोक पान, पानमसाला, गुटखा खातात आणि तोंड स्वच्छ ठेवत नाहीत. हिरड्यांमध्ये सूज येण्यामागे पायरिया आणि सामान्य संसर्ग कारणीभूत असतो. तोंडात फोड येण्यामागे शरीरात मल्टी व्हिटॅमिन्सची कमतरता कारणीभूत असते.

तोंडातले जंतू कॅन्सरचे कारण कसे बनतात? (Oral hygiene Increase Risk of Cancer)

तज्ज्ञ सांगतात की जर तुम्ही तोंडाची स्वच्छता नीट ठेवत नाही, जसं की जेवल्यानंतर तोंड धूत नाही किंवा दातांची योग्य प्रकारे काळजी घेत नाही, तर तोंडाला दुर्गंध (वास) येऊ लागतो. हे तोंडात साचलेले जंतू आणि सडण्यामुळे होतं. अर्थात, सगळे जंतू कॅन्सरचं कारण बनत नाहीत. पण, काही जंतू कॅन्सर वाढायला मदत करू शकतात. हे जंतू शरीरात सूज आणि संसर्ग वाढवतात, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींना वाढायला योग्य वातावरण मिळतं. म्हणून दररोज ब्रश करणं, जेवल्यानंतर तोंड धुणं आणि वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून तोंडातले जंतू आणि संसर्ग नियंत्रणात राहतील.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावीत? (Mouth Cancer Signs)

  • तोंडात फोड येणं
  • तोंड उघडताना त्रास होणं- हा त्रास गुटखा खाणाऱ्यांना होतो
  • जखम बराच वेळ भरत नाही.
  • तोंडातून वाईट वास येणं
  • जीभ वाकडी होणं – ही सगळी तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

कॅन्सरपासून वाचण्यासाठी तोंडाची स्वच्छता कशी ठेवावी? ( Bad Oral Health Avoiding Cancer Risk)

  • तोंडाची स्वच्छता राखा. जेवल्यानंतर तोंड धुवा.
  • दररोज ब्रश करा.
  • दही, आंबवलेले पदार्थ (फर्मेंटेड फूड्स) अशा प्रो-बायोटिक अन्नाचा वापर करा.
  • साखर कमी खा.
  • तंबाखू, गुटखा, सिगरेट आणि दारू टाळा.
  • प्रत्येकी सहा महिन्यांनी दातांची तपासणी करा.
  • तुमचा आहार सुधारा.

जर तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करायचा असेल, तर आहारात सुधारणा करा. आहारात हिरव्या भाज्या आणि फळं खा. रंगीत फळांचा वापर करा. हे सर्व अन्नपदार्थ शरीरातील व्हिटॅमिन आणि आयर्नची कमतरता भरून काढतात.

तुमच्या जीवनशैलीत हे बदल करा… (Oral Cancer Risk)

  • धूम्रपान आणि दारू पिणे टाळा.
  • तोंडात धारदार दात असतील जे गाल किंवा ओठांना जखमा करीत असतील, तर त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
  • जर डेंचर (कृत्रिम दात) घातले असेल आणि ते त्रास देत असेल, तर ते वापरणे बंद करा.
  • तंबाखू, सुपारी व चुना एकत्र खाणे खूपच धोकादायक आहे.
  • तोंडाची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे.