Oral bacteria and heart disease: वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे हृदयरोगासाठी एक महत्त्वाचा धोक्याचे घटक मानले जातात. जेव्हा रक्तात वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) जमा होते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये साचू शकते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस (रक्तवाहिन्यांचे कडक होणे) होऊ शकते. यामुळे रक्तप्रवाह मर्यादित होतो आणि शरीराच्या अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचण्यापासून रोखली जातात, ज्यामुळे हृदयावर दबाव येतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फक्त रक्तातील चरबी म्हणजेच कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड नियंत्रित करणे पुरेसे नाही, तर तोंड आणि दातांचे आरोग्यदेखील महत्त्वाची भूमिका बजावते. एका संशोधनातून एक धक्कादायक तथ्य समोर आले आहे की, तोंडाचे आरोग्य खराब असणे जसे की तोंडाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे किंवा दातांना होणारे नुकसान यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. संशोधनानुसार स्वच्छ तोंडी आरोग्य असलेल्या लोकांपेक्षा खराब तोंडी आरोग्य असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो.
तोंडाच्या जीवाणू आणि हृदयाच्या आरोग्यामधील संबंधांबद्दल संशोधकांकडून जाणून घ्या.
फिनलंड आणि यूकेमधील संशोधकांनी केलेल्या जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी लोकांच्या दोन गटांमधील हृदयाच्या धमन्यांचे विश्लेषण केले. तपासणीत असे आढळून आले की, जवळजवळ अर्ध्या प्रकरणांमध्ये तोंडी बॅक्टेरियाचे डीएनए होते, जे ४२% हृदयाच्या प्लेकमध्ये आणि ४३% शस्त्रक्रियेच्या नमुन्यांमध्ये आढळले. या संशोधनानुसार तोंडाचे आरोग्य केवळ दात आणि हिरड्यांपुरते मर्यादित नाही तर ते हृदयरोगाच्या जोखमीशी थेट जोडलेले आहे. यावरून असे सूचित होते की, तोंडाच्या जीवाणूंमुळे धमन्यांमध्ये जळजळ आणि प्लेक जमा होणे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. संशोधनातून असेही दिसून आले आहे की नियमित दंत तपासणी, ब्रशिंग, फ्लॉसिंग आणि तोंडाची स्वच्छतादेखील हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हृदय कमकुवत होत असताना अनेक वेळा त्याची सुरुवात आपल्या शरीरात इतर ठिकाणी लक्षणं देऊन होते, विशेषतः आपल्या तोंडात. हो, आपल्या तोंडाचे आरोग्य हृदयाच्या स्थितीशी अतिशय जवळून जोडलेलं असतं. काही वेगळी लक्षणं जी आपण किरकोळ समजून दुर्लक्षित करतो, ती कधी कधी मोठ्या हृदयविकाराची सुरुवात ठरू शकतात. चला तर पाहूया, अशी कोणती तोंडाशी संबंधित लक्षणं आहेत, जी हृदयाच्या आजाराचा इशारा देतात.
ही ६ लक्षणे देतात हृदयविकाराच्या धोक्याचा इशारा
- हिरड्यांमधून वारंवार रक्त येणे
- दात हळूहळू हलणे किंवा अचानक गळून जाणे
- जबड्यांमध्ये अचानक होणारी तीव्र वेदना
- तोंडात वारंवार छाले येणे व बरे न होणे
- तोंड सुकणं
- तोंडातून दुर्गंधी, वास येणं
आजच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीचा केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही तर तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जंक फूड किंवा काहीही कधीही खाल्ल्याने लहान वयातही पिवळे दात, कमकुवत हिरड्या आणि तोंडाची दुर्गंधी यांसारख्या अनेक समस्या उद्भवत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तोंडाची आणि दातांची अयोग्य स्वच्छता.