Navratri 2025: आज नवरात्रीचा तिसरा दिवस, आज देवी चंद्रघंटेच्या रूपात देवीची पूजा केली जाते. धार्मिक कथांनुसार, चंद्रघंटा राक्षसांचा वध करणारी म्हणून ओळखली जाते. चंद्रघंटेच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, त्यामुळे तिला चंद्रघंटा असं म्हटलं जातं. नवरात्रीच्या दिवसात देवीच्या नऊ रूपांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या आवडीचे नैवेद्य अर्पण केले जातात. चंद्रघंटा देवीला गुळाची खीर किंवा केशराची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे असे मानले जाते. या खीरची ही खास रेसिपी…

गुळाची खीर

गुळाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ पाण्यात स्वच्छ धुवून शिजवा. तांदूळ पूर्णपणे शिजला की, त्यात गूळ घाला. वेलची आणि सुकामेवा घाला आणि एकजीव होईपर्यंत शिजवून घ्या. गूळ आणि तांदूळ चांगले एकजीव झाल्यावर त्यात दूध घाला. दूध घातल्यानंतर सुमारे दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. मात्र थोड्या थोड्या वेळाने ढवळत रहा, नाहीतर गूळ असल्यामुळे दूध फाटू शकते.

केशराची खीर

केशराची खीर बनवणं अगदी सोपं आहे. त्यासाठी सर्वात आधी थोडेसे दूध आणि केशर एकत्रित करून बाजूला ठेवा. दुधात तांदूळ घाला आणि शिजवा. भात पूर्णपणे शिजल्यावर केशरयुक्त दूध त्यात घाला आणि साखर घालून ते चांगले शिजवून घ्या. ते तयार झाल्यावर सुकामेवा आणि वेलची घाला.