Navratri Makeup Tips: देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. शारदीय नवरात्र म्हणजे भक्ती, श्रद्धा, आनंद आणि रंगतदार उत्सवांचा संगम. नऊ दिवस देवीची आराधना करण्यासाठी लाखो भक्त मंदिरात आणि मंडपात गर्दी करतात. ढोल-ताशांचा गजर, देवीच्या आरत्या यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय होते. पण, याच काळात तरुणाईत आणि महिलांमध्ये गरबा, दांडिया तसेच दुर्गापूजा महोत्सवात सहभागी होण्याचा उत्साहही तितकाच दिसून येतो.
संध्याकाळी देवीच्या आरतीनंतर संपूर्ण शहरात रंगीबेरंगी दिव्यांची सजावट, मंडपातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषा घालून सजलेले लोक यामुळे वातावरण अधिकच आकर्षक होते. दुर्गापूजा मंडपामध्ये केवळ धार्मिक कार्यक्रम नाहीत तर नृत्य, संगीत, भेटीगाठी हे सगळंदेखील असतं. प्रत्येकाला या दिवसांत थोडं वेगळं आणि खास दिसायचं असतं, त्यामुळे या वातावरणात मेकअप आणि स्टाईलिंगलाही विशेष महत्त्व असतं.
महिलांचा कल या दिवसांत पारंपरिक पण आकर्षक अशा ड्रेसिंगकडे अधिक असतो. चमकदार रंगांचे लेहेंगा-चोळी, साड्या किंवा गाऊन या नवरात्रीत घालतात. मेकअपमध्ये तरुणींना फ्रेश लूक हवा असतो. गुलाबी गाल, डोळ्यांवर काजळ, चकाकणारे आयशॅडो आणि बोल्ड लिपस्टिक या गोष्टी चेहऱ्याला अधिक आकर्षक बनवतात. जर तुम्हीही या नवरात्रात गरबा किंवा दुर्गापूजेसाठी खास तयार होणार असाल, तर खालील काही मेकअप टिप्स तुमच्या लूकला नक्कीच खास बनवतील.
१. ओलसर-चमकदार मेकअप
संपूर्ण रात्री मंडपात ताजेतवाने दिसण्यासाठी ओलसर-चमकदार मेकअप बेस सर्वोत्तम ठरतो, यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक राहते आणि फोटो काढताना त्वचा उजळून येते.
२. लाल लिपस्टिक
लाल रंगाचे ठसठशीत लिपस्टिक या उत्सवासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. तो तुमचा लूक अधिक ग्लॅमरस बनवतो आणि पारंपरिक पोशाखांसोबत अप्रतिम खुलतो.
३. विंग्ड आयलाइनर आणि स्मोकी डोळे
डोळे आकर्षक दिसण्यासाठी विंग्ड आयलाइनर वापरा. प्रत्येक फोटोमध्ये डोळे उठून दिसतात. त्यासोबत हलका स्मोकी मेकअप केल्यास डोळ्यांना अधिक गडद आणि मोहक लूक मिळतो.
४. आयशॅडोन
डोळ्यांवर शिमरी किंवा ठळक आयशॅडो लावल्यास चेहऱ्याला उत्सवी झळाळी येते. काजळसोबत थोडा काळा आयशॅडो वापरून स्मोकी आय इफेक्ट तयार करता येतो.
५. कॉम्पॅक्ट पावडर आणि ब्लशचा वापर करा
संपूर्ण संध्याकाळ मेकअप टिकवण्यासाठी कॉम्पॅक्ट किंवा सेटिंग पावडर जवळ ठेवा. वेळोवेळी टचअप केल्याने चेहरा ताजा राहील. गालांवर हलका ब्लश आणि हायलायटर लावल्यास चेहरा अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतो.
नवरात्र, गरबा, दांडिया किंवा दुर्गापूजा प्रत्येक ठिकाणी लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. भक्तीबरोबरच सौंदर्याची झलक दाखवण्याची संधी महिलाही सोडत नाहीत. रंगीबेरंगी कपडे, डोळ्यांवर स्मोकी इफेक्ट, लाल लिपस्टिक आणि नैसर्गिक ओलसर मेकअप यामुळे तुमचा लूक इतरांपेक्षा वेगळा आणि उठावदार भासेल, त्यामुळे या नवरात्रात मेकअपचे हे छोटे टिप्स वापरून तुम्हीही देवीच्या आराधनेसोबतच सौंदर्याच्या तेजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घ्या.