शरीर निरोगी ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक असते. पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते. त्यामुळे अनेकजण लठ्ठपणाचे शिकार होतात. वजन कमी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते पण काहीजणांना त्यात यश मिळत नाही. याउलट काही जण याला गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करतात. पण अशाने त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच लठ्ठपणामुळे काही आजारांना आमंत्रण मिळते. कोणते आहेत ते आजार जाणून घ्या.

मधुमेह
लठ्ठपणामुळे मधुमेह होऊ शकतो. तज्ञांच्या मते टाईप २ मधुमेहाच्या ८० टक्के रुग्णांना लठ्ठपणामुळे हा आजार होतो.

उच्च रक्तदाब
लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. यासह हायपरटेन्शनमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

किडनीशी संबंधित समस्या
लठ्ठपणामुळे किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, कारण वजन वाढल्यास त्याचा किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. लठ्ठपणा असल्यास किडनीला जास्त काम करावे लागते. त्यात जर किडनीला व्यवस्थित ब्लड प्युरिफाय करता आले नाही, तर किडनी फेल होण्याची शक्यता असते.

दमा
लठ्ठपणामुळे दम्याचा आजार होऊ शकतो. ‘अमेरिकन लंग असोसिएशन’च्या एका रिपोर्टनुसार पोटाजवळ आणि फुफ्फुसांजवळ जास्त चरबी जमा झाल्यास फुफ्फुस आकुंचन पावतात आणि त्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. या अतिरिक्त चरबीमुळे दम्याचा त्रास होऊ शकतो.