Oral Sex Increases Throat Cancer Risk: मुखमैथुन म्हणजेच इंग्रजीत ज्याला ओरल सेक्स, असे म्हटले जाते. तो मैथुनामधील एक प्रकारे कामक्रीडेमध्ये अधिक आनंद मिळविण्याचा भाग मानला जातो. परंतु, आता तो मुखमैथुनाचा प्रकारच घशाच्या कर्करोगामागचंही सर्वांत मोठं कारण ठरत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. यूके आणि यूएसमध्ये केलेल्या ताज्या संशोधनात तसे धक्कादायक निष्कर्ष मांडले गेले आहेत. असं सांगण्यात आलं आहे की, पूर्वी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा सर्वाधिक प्रमाणात नोंदला जाणारा विकार होता. मात्र, गेल्या दोन दशकांत घशाच्या कर्करोगाचे (Throat Cancer) प्रमाण इतक्या वेगाने वाढले आहे की, तज्ज्ञांनी याला थेट ‘एपिडेमिक’ म्हणजेच साथीचा आजार, असंही संबोधलं आहे.
डॉ. हिशाम मेहन्ना यांचा स्पष्ट इशारा
युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमचे डॉ. हिशाम मेहन्ना यांनी The Conversation या जर्नलमध्ये लिहिताना सांगितलं, “घशाच्या कर्करोगाच्या वाढीमागे मुख्य कारण आहे एचपीव्ही (HPV – Human Papillomavirus). हाच व्हायरस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठीही जबाबदार आहे.” एचपीव्ही हा एक अतिशय सामान्य विषाणू असून, तो योनीमार्गे, गुदमार्गे व मुखमैथुनाद्वारे संक्रमित होतो.
कसा पसरतो धोका?
संशोधनात असं नमूद केलं गेलं आहे की, ओरल सेक्समुळे विशेषत: ओरोफॅरिंजियल कॅन्सर (Oropharyngeal Cancer) वेगाने वाढतो आहे. हा कर्करोग टॉन्सिल्स आणि घशाच्या मागील भागावर आघात करतो.
डॉ. मेहन्ना यांच्या मते
मागील दोन दशकांत या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण एवढं झपाट्यानं वाढलं आहे की, युरोप-अमेरिकेत त्याला ‘एपिडेमिक’ म्हटलं जातंय. पूर्वीच्या अभ्यासांनुसार, एचपीव्ही इन्फेक्शन हेच सर्वात मोठं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्यांनी आयुष्यात सहा किंवा त्याहून अधिक वेळा वेगवेगळ्या साथीदाराबरोबर मुखमैथुन केलं आहे, त्यांना या आजाराचा धोका ८.५ पट अधिक असतो.
भीषण आकडेवारी
यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या माहितीनुसार-
दरवर्षी सुमारे ८,३०० लोकांना घशाच्या कर्करोगाचं निदान होतं.
म्हणजे प्रत्येक ५० कर्करोग रुग्णांपैकी एकाला हा आजार असतो.
अशा रुग्णांच्या टॉन्सिल किंवा घशाच्या मागच्या भागात एचपीव्ही व्हायरसची लागण होते. अनेकदा हा संसर्ग आपोआप निघून जातो; पण काही वेळा तो टिकून राहून, हळूहळू कर्करोगात परिवर्तत होतो.
उपाय आणि बचाव
सध्या या विषाणूपासून वाचण्यासाठी एचपीव्ही लस (HPV Vaccine) उपलब्ध आहे. ही लस ८० टक्के प्रभावी असल्याचं तज्ज्ञ सांगतात. विकसित देशांमध्ये ती सहज उपलब्ध आहे.
पण मोठा प्रश्न असा आहे की, “आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी घेतलेला असा हा एक चुकीचा निर्णय भविष्यात जीवघेणा ठरू शकतो का?,” अशा स्वरूपाच्या अनेक शंकांनी या संशोधनामुळे अनेकांना भंडावून सोडलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता गरज आहे ती अधिक सजगतेची… कारण- घशाचा कर्करोग हळूहळू नव्हे, तर वेगानं आपले पाय पसरू लागलाय आणि त्याचं मुख्य कारण आता आपल्यासमोर स्पष्ट झालं आहे, मुख मैथुन.