Side effects of sleeping less: आजकाल जर तुम्ही कोणाला विचारले की, त्यांना घरात काय करायला आवडते, तर ते कदाचित एकच उत्तर देतील झोपणे. सर्वांना झोप आवडते; परंतु आजकालचा कामाचा ताण, खाण्याच्या चुकीच्या सवयी व अस्वस्थ जीवनशैली या बाबी झोपेच्या शत्रू बनल्या आहेत. खरं तर, दिवसातील किमान सात ते आठ तास विश्रांतीसाठी राखून ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, कामाचा ताण, मोबाईल व लॅपटॉपचा वाढता वापर आणि ताणतणाव यांमुळे झोपेची गुणवत्ता बिघडत आहे.
आज काही लोक “जर मला झोपायला वेळ मिळाला, तर मी उशिरापर्यंत झोपेन” अशा वृत्तीने आपले जीवन जगतात; परंतु झोपेच्या बाबतीतील हलगर्जीपणाचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. झोप केवळ शरीराला विश्रांतीच देत नाही, तर उलट मेंदूच्या पेशींची दुरुस्ती, हार्मोन्स संतुलित करणे, स्नायूंचे पुनरुज्जीवन व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीदेखील ते आवश्यक आहे.
दिल्ली आणि फरीदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलचे न्यूरोलॉजी व न्यूरोव्हस्कुलर इंटरव्हेन्शनचे संचालक व प्रमुख डॉ. विनीत बंगा म्हणाले की, अपुऱ्या झोपेमुळे आपल्याला सतत थकवा, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी गोष्टी सहजपणे जाणवतात. पण यापलीकडे झोपेचा अभाव अनेक गंभीर आजारांचा धोका वाढवतो. झोपेचा अभाव आपल्या शरीराला कशी हानी पोहोचवतो ते जाणून घ्या.
मेंदूचे कार्य कमी होणे
झोपेचा अभाव थेट मेंदूवर परिणाम करतो. रात्री पुरेशी झोप न घेतल्याने स्मरणशक्ती कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो. परिणामी निर्णय घेण्यातही अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता कमी होते. प्रतिक्रियांचा वेगदेखील मंदावतो, ज्यामुळे काम करताना किंवा गाडी चालवताना चुका होण्याचा धोका वाढतो. जर ही स्थिती दीर्घकाळ टिकली, तर मेंदूचे जलद गतीने नुकसान होऊ शकते.
हार्मोनल असंतुलन
शरीरात भूक, ताण, आनंद व तृप्तता नियंत्रित करणारे अनेक हार्मोन्स असतात. जेव्हा आपल्याला झोपेची कमतरता जाणवते तेव्हा हे हार्मोन्स असंतुलित होतात. भुकेचे नियमन करणारे हार्मोन्स, विशेषतः घ्रेलिन व लेप्टिन प्रभावित होतात. आपल्याला जास्त अन्न ग्रहण करण्याची इच्छा होते आणि त्यामुळे वजन वाढते. ताणतणाव वाढणारे हार्मोन्सदेखील अनियंत्रित होतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होतो.
हृदयरोगाचा धोका
अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या प्रणालींमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे अनियमित ठोके आणि हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. संशोधनानुसार, जे लोक दिवसातून ५-६ तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणात असतो. झोप हृदयाच्या स्नायूंना आराम देते म्हणून झोपेशिवाय त्यांना सतत काम करत ठेवणे धोकादायक ठरू शकते.
कमकुवत रोगप्रतिकार शक्ती
झोपेदरम्यान शरीरातील रोगप्रतिकार पेशी सक्रिय होतात. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर या पेशींचे कार्य मंदावते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. परिणामत: सर्दी, खोकला व फ्लूसारखे आजार वारंवार होतात. मग त्यामुळे केवळ सामान्य आजारच नाहीत, तर दीर्घकालीन आजारदेखील होऊ शकतात.