विभागात लहान मुले पळवणारी टोळी आली आहे, ते कारमधून येतात, तुमच्या मुलांना सांभाळा…अशा आशयाचे मेसेज सध्या व्हॉट्स अॅपवर फिरत आहे. या मेसेजमध्ये किरकोळ बदल करुन सोबत पुरावा म्हणून अपहरणाच्या जुन्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज जोडून तसे मेसेज पसरवले जातात. काळजीपोटी कसलाही विचार न करता अनेक जण हे मेसेज फॉरवर्ड करत सुटतात.. पण हाच मेसेज देशभरात अनेक निष्पाप लोकांच्या जिवावर बेतू लागलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडिया म्हणजे लोकांना जोडणारे एक साधन. पण सोशल मीडियावरील एक पोस्ट दंगल घडवू शकते किंवा एखादा व्यवसाय बुडवू शकते किंवा एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव देखील घेऊ शकते. औरंगाबादमधील वैजापूर, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणापासून गुजरात ते अगदी त्रिपुरातील आगरतळा येथे मुले पळवणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याच्या संशयातून जमावाने निष्पापांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कोणाचा जीव गेला तर काही ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पीडितांची सुटका झाली.

लहान मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेची सुरुवात झाली ती दक्षिण भारतात. तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात गावात गावात व्हॉट्स अॅपवर मेसेज झपाट्याने फिरत होते. या मेसेजची गावात चर्चा देखील सुरु झाली. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.  याचे परिणाम म्हणजे गावात एखादा भिकारी किंवा फेरीवाला किंवा अनोळखी व्यक्ती आला की ग्रामस्थांना संशय यायचा आणि यातून मारहाण सुरु व्हायची.

आकडेवारीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात लहान मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयातून जमावाकडून मारहाण झाल्याच्या जवळपास २० घटना घडल्या आहेत. कर्नाटकमध्ये ३, तेलंगणात ५, आसाममध्ये १, गुजरातमध्ये १, ओडिशामध्ये ३, आंध्र प्रदेशमध्ये ३, तामिळनाडूमध्ये ४, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक घटना घडली आहे. यातूनच फेक मेसेज किती घातक ठरु शकतात, हे स्पष्ट होते. भारतातील या घटनांची दखल आता आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र देखील घेत आहेत. यावरुनच याची दाहकता लक्षात येते.

कर्नाटकमध्ये मे महिन्यात २६ वर्षांच्या तरुणाची जमावाने हत्या केली. चोरी पळवणारा गुंड असल्याचा संशय जमावाला आला. मात्र, तो राजस्थानचा रहिवासी होता आणि कर्नाटकात पान विकण्याचे काम तो करायचा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नव्हती. पण जमावाने त्याची हत्या केली. तर निजाबामादमध्ये मूकबधीर तरुणाला आणि भद्रादी कोठागुदेम जिल्ह्यातील सरापाका येथे मनोरुग्ण महिलेला याच संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. यातून या फेक मेसेजचा कोणत्या वर्गाला बसतो, हे देखील लक्षात येते.

असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी गोमांसबाबतही झाला होता. मास नेणाऱ्या ट्रकमध्ये गोमांस असल्याचा संशय आल्याने जमावाने ट्रकचालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनांमागेही व्हॉट्स अॅपवरील पोस्ट कारणीभूत ठरली होती.

मे महिन्यात केरळमधील हॉटेल मालकांच्या संघटनेने पोलिसांकडे तक्रार केली होती. केरळमधील हॉटेलमध्ये मटणासाठी कुत्र्याचे मास वापरल्याची पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाली. याचा फटका हॉटेल उद्योजकांना बसला आणि शेवटी त्यांनी या फेक पोस्ट विरोधात तक्रार केली. काही परदेशी हॉटेल उद्योजक हे फेक मेसेज पसरवून छोट्या हॉटेल उद्योजकांना संपवत असल्याचा संशय हॉटेल मालकांच्या संघटनेने व्यक्त केला होता. यात कितपत तथ्य होते, हे अद्याप समोर आलेले नाही. पण असे फेक मेसेज पसरवून  कोण कसा फायदा घेईल, हे सांगता येत नाही.

जुलै २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात जवळपास तीन दिवस तणाव पसरला होता. यासाठी कारणीभूत ठरली ती फेसबुकवरील भावना दुखावणारी पोस्ट. तर जून २०१४ मध्ये पुण्यात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाज महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्याने परिसरात हिंसाचार झाला. यात मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणाला नाहक जीव गमवावा लागला. त्या आक्षेपार्ह पोस्टशी अभियंत्याचा दुरान्वयेही संबंध नव्हता.

या सर्व घटनांतून आपण कधी बोध घेणार, हा आता मुख्य प्रश्न आहे. व्हॉट्स अॅपवर येणारा मेसेज किंवा फेसबुकवरील एखादी पोस्ट ही खरीच असेल असे समजून ते फॉरवर्ड किंवा शेअर करणे थांबवणे गरजेचे आहे. आला मेसेज की दिला पाठवून ही वृत्ती बंद झाली पाहिजे. एखाद्या मेसेजबद्दल खात्री करुन घ्यायची असेल तर गुगल किंवा अन्य माध्यमातून त्याची सत्यता पडताळता येईल. वेळप्रसंगी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून खातरजमा करता येईल.  स्मार्ट सिटीचे स्वप्न बघणाऱ्या या देशातील नागरिकांनी आधी जबाबदार नेटिझन होणे ही काळाची गरज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media day fake whats app messages and fb post claiming lives in india