Stale water in plastic bottles: अनेकदा ऑफिसच्या डेस्कवरील कोपऱ्यात अनेक दिवसांपासून पडून असलेली पाण्याची बाटली किंवा तुमच्या गाडीमध्ये प्रवासादरम्यान ठेवलेली बाटली किंवा मुलांच्या शाळा, कॉलेजच्या बॅगमधील अर्ध्या पाण्याची बाटली निरूपद्रवी असते. खरंतर पाणी कधीही शिळे किंवा खराब होत नाही असं म्हणतात. पण, ते पाणी तुम्ही कशात ठेवले आहे हे देखील महत्त्वाचे आहे. अनेक दिवसांपासून बाटलीत ठेवलेले पाणी विशेषतः प्लास्टिकच्या बाटल्या बॅक्टेरिया, बुरशी वाढवण्यात कारणीभूत असतात. बाटली गरम पाणी आणि साबणाने नियमित धुणे आणि बाटल्या पूर्णपणे सुकू देणे, तुमची “निरोगी सवय” तुम्हाला नेहमी निरोगी ठेवण्यास मदत करते.

पर्यावरणीय प्रदूषण (२०२४) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, बाटलीबंद पाण्याच्या नमुन्यांमध्ये बायोफिल्म तयार करणारे बॅक्टेरिया होते, ज्यापैकी काही अनेक औषधांना प्रतिरोधकदेखील होते. हे बायोफिल्म्स सूक्ष्मजंतूंचे चिकट थर आहेत, जे लवकर वाढतात आणि त्यामुळे पोटदुखी, अतिसार किंवा इतर संसर्ग होऊ शकतात. म्हणून आठवड्याभराच्या बाटलीतून एक घोट घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे हे मत नक्की जाणून घ्या.

तुमच्या बाटलीतील १-३ आठवडे राहिलेले पाणी पिण्यास सुरक्षित आहे का?

असे पाणी पिणे सुरक्षित नाही. साधे पाणी स्वतःहून बॅक्टेरियाच्या वाढीस समर्थन देत नसले तरी तुम्ही बाटलीतून पाणी पिताना तुमच्या तोंडातील सूक्ष्मजंतू आत प्रवेश करतात. उष्णता, स्वच्छतेचा अभाव आणि घट्ट झाक लावणे, यामुळे काही दिवसांतच तुमची बाटली प्रजनन भूमीत बदलू शकते. बाटलीतील पाणी एका आठवड्यात दूषित होण्याचा धोका जास्त असतो तर दोन ते तीन आठवड्यांपर्यंत बॅक्टेरिया जमा होणे आणि डिस्पोजेबल बाटल्यांमध्ये प्लास्टिक लीचिंग या दोन्हीमुळे पाणी पिण्यासाठी असुरक्षित होते.

बाटलीत अनेक दिवसांपासून साठलेले पाणी घातक का?

वॉटर रिसर्चच्या अभ्यासानुसार, सूक्ष्मजंतू बाटलीच्या झाकण लावण्याच्या भागाला चिकटून राहतात आणि बायोफिल्म्स तयार करतात; ज्यामुळे पचनास त्रास, पोटदुखी किंवा अतिसार होऊ शकतात. प्लास्टिकपासून रासायनिक लीचिंग डिस्पोजेबल पीईटी बाटल्या एकदा वापरण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

बाटलीत काही आठवडे पाणी राहिल्याने पाण्यात मायक्रोप्लास्टिक्स आणि अँटीमोनीसारखी रसायने जाण्याचा धोका वाढतो. संशोधन या रसायनांना हार्मोनल व्यत्यय आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांशी जोडते. जुन्या बाटलीतून येणारा घाणेरडा विचित्र वास बहुतेकदा बाटलीच्या आत किंवा झाकण लावण्याच्या भागावर बुरशी निर्माण करतो. बुरशीयुक्त पाणी प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना ॲलर्जी किंवा मळमळ होऊ शकते.

बाटलीबंद पाणी किती काळ पिण्यास सुरक्षित आहे?

  • थंड आणि स्वच्छ ठिकाणी ठेवल्यास २४ तासांपर्यंत हे पाणी पिणे योग्य आहे. तसेच दुकानातून बाटलीबंद पाणी त्यावरील एक्सपायरी डेट संपल्यानंतर पिऊ नये.
  • बाटलीतील पाणी सुरक्षित राहावे यासाठी टिप्स
  • दररोज तुम्ही बाटलीतील पाणी पित असाल तर या बाटल्या दररोज धुवा, त्यासाठी गरम पाणी, साबणाचा वापर करा. तसेच आठवड्यातून एकदा त्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घाला.
  • दररोज पाणी पिण्यासाठी तुम्ही काचेऐवजी स्टील किंवा काचेच्या बाटलीचा वापर करू शकतात.
  • बाटली कधीही सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेऊ नका.
  • प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करत असाल तर खराब, जुन्या झालेल्या बाटल्या बदला.