Tips for Perfect Gol Roti : गोलाकार आणि मऊ पोळ्या बनवणे हे काही सोपे काम नाही. अनेकदा पोळ्या गोल होत नसतील, तर तुमची चेष्टा, मस्करी केली जाते. विशेषत: नव्याने सासरी गेलेल्या मुलींच्या बाबतीत असे घडते. कारण- प्रत्येकाच्या घरात पोळ्या करण्याची पद्धत वेगळी असते. अशा वेळी गोलाकार, टुम्म फुगलेली पोळ्या बनवण्याचा प्रयत्न करूनही पोळ्या देशाच्या नकाशासारख्या दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोटात गेल्यावर पोळ्यांचा आकार दिसत नसला तरी ताटात गोलाकार पोळ्याच छान दिसतात. त्यामुळे काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही घरात गोलाकार पोळ्या बनवू शकता.

१) कणीक मळताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी…

पोळ्या मऊ, फुगीर बनवण्यासाठी तुम्ही कणीक (पीठ) मळताना खूप काळजी घ्या. यावेळी पीठ जास्त पातळ किंवा खूप कडक नसावे; जेणेकरून पोळ्या लाटताना तुम्हाला अडचण येणार नाही.

२) पीठ मळताना वापरा ‘या’ गोष्टी

पीठ नीट मळून घेण्यासाठी तुम्ही गरम पाणी, दूध किंवा तूप वापरू शकता. कारण- त्यामुळे पीठ मऊ होते. त्यानंतर मळलेले पीठ ओल्या सुती कापडात गुंडाळून किंवा हलके पाणी शिंपडून काही वेळ प्लेटमध्ये झाकून ठेवा.

3) पोळ्या गोल लाटण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक

पोळी गोल लाटण्यसाठी आधी पिठाचा गोळा नीट सपाट करून त्यावर कोरडे पीठ लावून घ्या. त्यानंतर पिठाचा गोळा पोळपाटावर ठेवून लाटणे हळुवारपणे अँटीक्लॉकवाइज फिरवा. तुम्हाला दिसेल की, पोळ्या चक्राकार गतीने पोळपाटावर फिरत आहे. त्यानंतर पोळी उलटी करा आणि पुन्हा नीट लाटा.

4) अशा बनवा फुगीर पोळ्या

फुगीर आणि मऊ पोळी बनवायची असेल, तर लाटताना ती जास्त पातळ लाटू नका. तसेच त्यावर जास्त कोरडे पीठ वापरू नका. यावेळी पोळी तव्यावर टाकताना प्रथम एका बाजूने कमी भाजत दुसऱ्या बाजूने परता. आता दुसऱ्या बाजूने पोळी पूर्ण भाजली की, मग कमी भाजलेल्या बाजूने ती परता. आता पोळीच्या कडा स्वच्छ कापडाने दाबा. त्यामुळे पोळी चांगली फुगते. अशा प्रकारे तुम्ही गोलाकार, मऊ व टुम्म फुगलेली पोळ्या बनवू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Step by step guide to make round chapati or gol roti how to make perfect soft round gol roti poli sjr