Stomach Cancer Symptoms and Signs: कर्करोग नाव उच्चारलं तरी अंगावर काटा येतो. लोकांची असंतुलित जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यांमुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. त्यापैकीच एक म्हणजे पोटाचा कर्करोग, जो सुरुवातीला साध्या लक्षणांनी सुरू होतो; पण वेळीच लक्ष न दिल्यास तो जीव घेऊ शकतो. अलीकडच्या काळामध्ये लोकांमध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. पोटाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय असून, वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, कॅन्सर सर्जन डॉ. विनय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पोटदुखी, अपचन, थकवा ही आपण रोजच्या आयुष्यात दुर्लक्ष करीत असलेली लक्षणे कधी कधी गंभीर आजाराचे संकेत देत असतात. विशेष बाब म्हणजे अलीकडे जेन-एक्स आणि मिलेनियल्समध्ये अपेंडिक्स कर्करोगाच्या घटनांमध्ये तीन ते चार पट वाढ झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. चला तर पाहूया पोटाच्या कर्करोगाची ती पाच धोकादायक लक्षणं :
पोटाचा कॅन्सर झाल्यावर दिसतात ‘ही’ ५ भयंकर लक्षणं
१. वारंवार पोटफुगी आणि अॅसिडिटी
सुरुवातीला ही सामान्य वाटणारी लक्षणं काही आठवडे किंवा महिने सतत जाणवत असतील, तर त्यामागे कर्करोग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. छातीत जळजळ, उलट्या अशा त्रासांसोबत लक्षणं दिसतात. जर तुमचे पोट दररोज फुगल्यासारखे वाटत असेल, थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट भरलेले वाटत असेल किंवा वारंवार अपचन होत असेल, तर ती चिंतेची बाब असू शकते.
२. खाल्ल्यानंतर लगेच मळमळ व उलटी
प्रत्येक जेवणानंतर मळमळ वाटणं, सतत उलटी होणं, ही लक्षणं पचनाशी संबंधित नसून, ती लक्षणं पोटाच्या आत पेशींच्या असामान्य वाढीची असू शकतात.
३. डाएट न करताही वजन झपाट्यानं कमी होणं
वजन कमी करणं आपल्यासाठी काही वेळा उद्दिष्ट असतं. पण जर तुम्ही प्रयत्न न करता, डाएट किंवा वर्कआउट न करताही वजन एकदम झपाट्यानं कमी होऊ लागलं, तर ते कर्करोगाच्या वाढत्या पेशींचे संकेत असू शकतात.
४. सतत थकवा आणि कमजोरी
शरीरात कमी ऊर्जा असणं, स्नायूंची ताकद कमी होणं, दिवसभर कंटाळवाणं वाटणं, ही लक्षणं म्हणजे कधी कधी कर्करोगाचा सूचक इशारा असतो.
५. उलटीत रक्त दिसणं
हे लक्षण दिसताच वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
लक्षात ठेवा, शरीर वेळोवेळी संकेत देत असतं, प्रश्न फक्त आपण ते ओळखतो का याचा आहे. थोडंसं दुर्लक्ष…आणि परिणाम होऊ शकतो जीवघेणा. म्हणून वेळीच सावध व्हा…