How to Cut Milk Packet Properly: दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. आजही गावाच्या ठिकाणी गाईचं ताजं दूध काढून पिणे अति लाभदायक मानले जाते. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्त्वे असतात. लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावतं. घराघरांत दुधाच्या पिशव्या येत असतात. या पिशव्यांतून दूध काढून दुधाच्या पिशव्या सर्रास कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकल्या जातात. पण, तुम्हाला कधी दुधाची पिशवी कशी फोडतात असा प्रश्न कुणी विचारला तर काय सांगणार…
दुधाची पिशवी कापण्याचीदेखील एक कला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? बरेचदा दुधाची पिशवी कापताना कॉर्नर कापतो आणि पिशवीचा तुकडा वेगळा करतो. पण, असं केल्याने नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. आयएएस अधिकारी असलेल्या एका महिलेने सांगितलेली ट्रिक येथे सर्वांसोबत शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट करत सांगितले की, दुधाची पिशवी जर सरळ कापली तर त्याचा फायदा पर्यावरणासाठी होतो, तर दुधाच्या पिशवीचा कापलेला त्रिकोणी छोटा तुकडा कधीही रिसायकल होत नाही, त्यामुळे ते केवळ कचरा वाढवण्याचे काम करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक मानले जाते. त्याचा पर्यावरणाला धोका निर्माण होतो, त्यामुळे तुम्ही दुधाची पिशवी कापण्याची पद्धत बदलली तर मोठा फायदा होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. दुधाची पिशवी कापण्याची योग्य पद्धत त्यांनी शेअर केली आहे.
बंगळुरूतील अदम्य चेतना संस्थेच्या अध्यक्षा तेजस्विनी अनंतकुमार यांनी दोन वर्षांपूर्वी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ही ट्रिक सांगितली आहे. जर आपण सर्वांनी प्लास्टिकचे तुकडे वेगळे न करता पिशवी फोडली, तर एकट्या बेंगळुरूमध्ये ५० लाख लहान प्लास्टिकचे तुकडे कचऱ्यात जाण्यापासून रोखता येतील, कारण या लहान तुकड्यांचा पुनर्वापर होत नाही असे त्यांनी सांगितले.
दुधाची पिशवी कशी कापावी?
प्लास्टिकच्या पिशवीतून दूध काढण्यासाठी पिशवी कापताना ती सरळ आडवी कापायला हवी. म्हणजे दुधाची पिशवी कोनातून तिरपी न कापता तिला कोनामध्ये आडवा छेद करावा, यामुळे तुमच्या पिशवीचा तिरपा तुकडा वेगळा होणार नाही व त्यामुळे दूधही सांडत नाही. याचा अर्थ पॅकेटमधून वेगळे होणारे प्लास्टिकही रिसायकल केले जाईल, त्यामुळे ही पद्धत वापरण्यात यावी, असं त्याचं म्हणणं आहे. फक्त दूधच नाही तर अशा प्रकारच्या पिशव्यांमधून मिळणारे ताक, लस्सी इत्यादींच्या पिशव्या अशा पद्धतीने कापून घेतल्यास फायदा होईल.