Symptoms In Ear Before Heart Attack : हृदयाचे ठोके हे आपण जिवंत आहोत याचा पुरावा आहे. हृदयाचे ठोके थांबणे म्हणजे जीवन थांबले आहे. जेव्हा हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा अवरोधित होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हा अडथळा सामान्यतः हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांच्या साठ्यामुळे होतो. जेव्हा चिकट कोलेस्ट्रॉल शिरांमध्ये जमा होतो तेव्हा ते रक्तप्रवाह रोखते. रक्तप्रवाहाचा अभाव हृदयाच्या स्नायूचा काही भाग खराब करू शकतो किंवा नष्ट करू शकतो.

गेल्या दीड वर्षात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे, ज्यामध्ये तरुण लोक हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. हृदयविकाराच्या झटक्यांमुळे दररोज अंदाजे १.८ कोटी लोकांचा मृत्यू होतो आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर यापैकी बरेच मृत्यू टाळता आले असते. वेब एमडीच्या मते, हृदयविकाराची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. जर लक्षणे लवकर ओळखली गेली तर खबरदारी घेतल्यास या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. हृदयविकाराच्या आधी दिसणारी लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.

अनेकदा लोक हृदयविकाराचे संकेत शरीराच्या इतर अवयवांमधून दिसणाऱ्या लक्षणांवरून ओळखतात. पण, कानातून मिळणारे संकेत दुर्लक्षित राहतात. या संकेतांकडे वेळेत लक्ष दिलं तर हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो. संशोधकांनी ५०० हून अधिक लोकांवर हा अभ्यास केला. त्यात असे आढळले की, हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांपैकी १२ टक्के रुग्णांना कानात वेदना जाणवणे, जडपणा वाटणे किंवा कमी ऐकू येणे यांसारखे त्रास होतात. या संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. डेव्हिड मिलर यांच्या मते, कानात दुखणे किंवा जडपणा जाणवणे हे हार्ट अटॅकचे लक्षण तेव्हा असते, जेव्हा काहीही कारण नसताना अचानक हा त्रास सुरू होतो.

अशावेळी लगेच डॉक्टरांना भेटून उपचार घेणे गरजेचे आहे. संशोधकांच्या मते, कान दुखणे किंवा जड होणे हे हार्ट अटॅकचे एकच लक्षण नाही, तर कानात गंभीर संसर्ग होणे, सायनस किंवा मायग्रेन यांसारख्या इतर समस्यासुद्धा त्याचेच लक्षण असू शकतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, प्रत्येक वेळी छातीत दुखणे किंवा धाप लागणे यांसारखी हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे आढळत नाहीत. अशावेळी कानात कोणताही बदल जाणवत असेल तर त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. म्हाताऱ्या आणि डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये ही हार्ट अटॅकची लक्षणे दिसू शकतात.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी कानात दिसतात ‘ही’ भयंकर लक्षणं

  • कानात अचानक आवाज येणे
  • कानाची जळजळ होणे
  • कानाच्या मागे वेदना
  • कानाच्या संवेदनशीलतेत बदल
  • कानात रक्तदाब वाढल्यासारखं वाटणं

हृदयविकाराच्या आधी दिसणारी इतर लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.

छातीच्या मध्यभागी किंवा विरुद्ध बाजूला तीव्र वेदना

छातीच्या मध्यभागी ही तीव्र वेदना हृदयविकाराच्या आधी होऊ शकते. ही वेदना इतकी तीव्र असू शकते की कोणीतरी छातीला धरल्यासारखे वाटते. हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सतत पुरवठा आवश्यक असल्याने ही असह्य वेदना होते. जेव्हा हा पुरवठा कमी होतो किंवा अडथळा येतो तेव्हा छातीत दुखू शकते. या वेदनांमुळे तुम्हाला श्वास घेता येत नाही असे वाटू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डाव्या हातातील वेदना जी तोंडापर्यंत पोहोचते

हृदयविकाराच्या झटक्याचे एक सामान्य लक्षण म्हणजे डाव्या हातातील वेदना. ही वेदना इतकी तीव्र असू शकते की ती पाठ, मान, जबडा किंवा पोटापर्यंत पसरते. ती वेदना जडपणा किंवा दाबासारखी वाटू शकते. एका भागातून सुरू होणारी वेदना दुसऱ्या भागात जाणे यासारख्या असामान्य गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

श्वास घेण्यास त्रास

जर छातीत दुखण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मळमळ आणि चक्कर येणे

हृदयविकाराच्या रुग्णाला मळमळ आणि चक्कर येऊ शकते. मात्र, मळमळ आणि चक्कर येणे हे इतर अनेक परिस्थितींमुळे होऊ शकते. जर तुम्हाला मळमळ किंवा चक्कर येत असेल आणि हृदयविकाराची इतर लक्षणेदेखील जाणवत असतील, तर तुम्ही ताबडतोब हृदयरोगतज्ज्ञांना भेटले पाहिजे.

जास्त घाम येणे

हृदयविकाराच्या आधी, रुग्णाला छातीत दुखणे आणि भरपूर घाम येणे जाणवते. हा घाम व्यायाम किंवा उष्णतेमुळे येणाऱ्या घामापेक्षा वेगळा असतो. तो थंड आणि चिकट असू शकतो. जर जास्त घाम येणे आणि इतर लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.