How prolonged sitting affects heart health: आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही सवयी अशा असतात ज्या अगदीच साधारण वाटत असतील. मात्र, या लहान सहान सवयी कालांतराने शरीरावर गंभीर परिणाम करू शकतात. जास्त वेळ बसणे ही साधारणपणे कामाच्या ठिकाणची रोजचीच सवय आहे. मात्र, या साध्या वाटणाऱ्या सवयीमुळेही ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक याचा धोका दुपटीने वाढू शकतो असे ह्रदयरोगतज्ज्ञ सांगतात. जास्त कामाचे तास, डिजिटल मनोरंजन आणि बैठी जीवनशैली यामुळे बराच वेळ एका जागी बसून राहणे ही अनेकांसाठी सामान्य बाब आहे. मात्र, नेमकी हीच सवय भविष्यात अनेक गंभीर परिणाम करू शकते.

संशोधनातून असे समोर आले आहे की, जास्त वेळ बसण्याची सवय असल्याने ह्रदयरोगाचा धोका वाढतो. टाइम स्पेंट सिटिंग अॅज अ इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज मध्ये प्रकाशित झालेल्या मेटा विश्लेषणात असे आढळून आले की, दररोज अतिरिक्त दोन तास बसल्याने ह्रदयासंबंधित आजार उद्भवण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. तेव्हा बराच काळ बसून राहिल्याने एकूण आरोग्यावर कसा परिणाम होतो तसंच ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कसा वाढू शकतो हे जाणून घेऊ…

नेमका परिणाम काय होतो?

जेव्हा तुम्ही जास्त वेळ बसता तेव्हा रक्ताभिसरण मंदावते. हे प्रामुख्याने पायांमध्ये मंदावते. या मंदावलेल्या रक्ताभिसरणामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची आणि धमन्यांच्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता वाढते. जास्त वेळ बसल्याने रक्तदाब वाढतो, रक्तातील साखरेचे नियंत्रण कमकुवत होते आणि कोलेस्टेरॉलमध्ये हानिकारक बदल होतात. एकूणच हे घटक ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर अतिरिक्त ताण देतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

व्यायाम हा धोका भरून काढू शकतो का?

दररोज एक तास व्यायाम केल्याने बैठ्या जीवनशैलीचे होणारे दुष्परिणाम टाळले जातात असा अनेकांचा समज आहे. मात्र, अभ्यास अगदी उलट दर्शवतो. शारीरिक हालचाली ह्रदयाला बळकटी देतात, मात्र ते रक्तवाहिन्या कडक होणे, ट्रायग्लिसराइडची पातळी वाढणे किंवा जास्त वेळ बसून राहिल्याने इन्सुलिनवर प्रभाव पडणे या समस्यांना उलट करू शकत नाही. योग्य पद्धतीने रक्ताभिसरण आणि चयापचय राखण्यासाठी शरीराला वारंवार हालचाल आवश्यक आहे.

यावर मार्ग काय?

ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याचे रक्षण करणे हे निष्क्रियता खंडित करण्यापासून सुरू होते. दर ३० मिनिटांनी उभे राहणे, फोन कॉल दरम्यान चालणे किंवा कामांमध्ये बॉडी स्ट्रेच करणे यासारखे साधे बदल फायदेशीर ठरू शकतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.

ह्रदयाच्या आरोग्यासाठी बसणे कमी करणे

बसून राहण्याचे प्रमाण कमी केल्याने तात्काळ आणि कायमस्वरूपी फायदे मिळतात. यामुळे रक्तदाबाचे नियमन सुधारते, कोलेस्टेरॉलचे संतुलन सुधारते आणि रक्तातीलसाखर नियंत्रित करण्यास मदत होते. नियमित हालचाल केल्याने रक्तवाहिन्यांमधील कडकपणा कमी होतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी होते आणि ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोकाही लक्षणीयरित्या कमी होतो.

ह्रदयरोगाचे एक न दिसणारे कारण म्हणून या सवयीकडे पाहिले जाते. ह्रदयरोगतज्ज्ञ याबाबत इशारा देतात की, ही सवय ह्रदयरोगाचे धोके दुपटीने वाढवू शकते. यावर दीर्घकाळ बसण्याची सवय कमी करणे हा सोपा उपाय आहे. अधिक वेळा हालचाल करून, दीर्घकाळ निष्क्रियता खंडित करून आणि दररोज कमीतकमी बसणे यामुळे तुमच्या ह्रदयाचे रक्षण तुम्ही करू शकता.