Bowel cancer prevention tips: खराब आहार आणि अस्वस्थ जीवनशैली यांमुळे तरुण वयातच अनेक गंभीर आजार लोकांना प्रभावित करीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोलन कॅन्सर, जो आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित नाही तर तरुणांमध्येही वेगाने पसरत आहे. त्यापैकी एक म्हणजे आतड्याचा कर्करोग, ज्याला इंग्रजीत कोलन कॅन्सर किंवा कोलोरेक्टल कॅन्सर, असेही म्हणतात. हा विकार प्रामुख्याने आतड्याच्या पहिल्या आणि सर्वांत लांब भागामध्ये म्हणजेच मोठ्या आतड्यात (कोलनमध्ये) सुरू होणाऱ्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो.हा दुर्धर विकार आता केवळ वृद्धांपुरताच मर्यादित नाही, तर तो तरुणांनाही वेगाने आपल्या विळख्यात घेत आहे.
हा जगभरातील सर्वात सामान्य आणि प्राणघातक कर्करोगांपैकी एक आहे. तथापि, नियमित वेळेत आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो आणि या प्राणघातक आजाराला प्रतिबंध करता येतो. अनेक संशोधनांनुसार, जीवनशैली सुधारून या कर्करोगाच्या सुमारे ४५% प्रकरणांना रोखता येते.
कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी टिप्स
NCBI बुकशेल्फमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने तुम्हाला केवळ आतड्याच्या कर्करोगापासूनच नव्हे, तर इतर अनेक आजारांपासूनही संरक्षण मिळू शकते. संतुलित आणि उच्च फायबरयुक्त आहार, नियमित व्यायाम, निरोगी वजन राखणे, अल्कोहोल व तंबाखूपासून दूर राहणे आणि वेळेवर तपासणी यांद्वारे आतड्याच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
उच्च फायबर आणि वनस्पती-आधारित आहार घ्या
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य व कडधान्ये यांसारखे फायबरयुक्त पदार्थ आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते आणि शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. गाजर, गोड बटाटे, हिरव्या पालेभाज्या व टोमॅटो यांसारखे कॅरोटीनॉइड्स असलेले पदार्थ या कर्करोगाचा धोका ४०% पर्यंत कमी करू शकतात. मात्र, बेकन, सॉसेज किंवा सलामी यांसारखे लाल आणि प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात सेवन केल्याने धोका वाढू शकतो.
वजन नियंत्रणात ठेवा
लठ्ठपणा हा आतड्याच्या कर्करोगासाठी एक प्रमुख जोखीम घटक मानला जातो. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे दीर्घकालीन दाह आणि हार्मोनल असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे वजन नियंत्रणात ठेवून हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
नियमित व्यायाम करा
संशोधनातून असे दिसून आले आहे की, आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम व्यायाम, जसे की वेगात चालणे, सायकलिंग किंवा योगा यांद्वारे आतड्यांचे कार्य सुधारते आणि वजन नियंत्रित राहते.
दारू आणि तंबाखू टाळा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो. दरम्यान, तंबाखू किंवा धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. धूम्रपान हळूहळू सोडल्याने हा धोका कमी होतो.
हायड्रेटेड राहा
पुरेसे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि साखरेची किंवा कॅफिनयुक्त पेये मर्यादित ठेवणे या बाबी आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.