Common Tea Making Mistakes : अनेकांना सकाळी उठल्याबरोबर एक कप चहा घेतल्याशिवाय तरतरी जाणवत नाही, त्यांची सकाळची सुरुवातच चहाने होते; त्यामुळे फार पूर्वीपासून चहा आणि भारतीयांचे एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. काही जण तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहाचा आस्वाद घेण्यास मागेपुढे पाहात नाहीत. ऑफिसमध्ये तर किती वेळा चहा होत असेल याची काही गणती नसते. त्यामुळे आपल्याला गल्लीबोळात, कॉर्पोरेट ऑफिसबाहेर एकतरी चहाची टपरी दिसतेच. पण, तुम्हाला माहितीये का तुम्ही पित असलेल्या चहाने तुम्ही आजारी पडू शकता?
चहा बनवताना काही सवयींचा आरोग्यावर विषासारखा वाईट परिणाम होऊ शकतो. आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी यात योग्य पद्धतीने चहा बनवण्याची रेसिपीदेखील सांगितली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊ…
१) ‘या’ चुकीमुळे चहा बनू शकतो विष?
आहारतज्ज्ञ लिमा महाजन म्हणाल्या की, बरेच लोक एकदा चहा बनवल्यानंतर तो पुन्हा पुन्हा उकळून गरम करतात आणि पितात. या चुकीमुळे चहाचे एकप्रकारे विषात रुपांतर होते. कारण जेव्हा चहा आपण पुन्हा पुन्हा उकळतो, तेव्हा त्यामधून भरपूर टॅनिन बाहेर पडते. जरी टॅनिनचे काही आरोग्यदायी फायदे असले तरी त्याचे प्रमाण वाढले की त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
२) जाणवू शकतात ‘या’ समस्या
चहा पुन्हा पुन्हा उकळवून प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याचा यकृत, मूत्रपिंड आणि हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर तुम्हाला पोटफुगी किंवा गॅसची समस्यादेखील जाणवू शकते.
आहारतज्ज्ञांनी सांगितली चहा बनवण्याची ‘ही’ योग्य पद्धत
पोषणतज्ज्ञांनी सांगितले की, जर तुम्हाला चहा पिण्याची खूप आवड असेल तर तो योग्य पद्धतीने बनवला पाहिजे. यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी उकळवा. नंतर त्यात लवंग, दालचिनी, बडीशेप यांसारख्या आवडत्या औषधी वनस्पती टाका. यानंतर ते पाच मिनिटे उकळू द्या. आता एका कपामध्ये चहापत्ती टाका, त्यावर औषधी वनस्पतींचे उकळवलेले पाणी त्यात ओता. यानंतर कपावर झाकण ठेवून तो बाजूला ठेवा. नंतर औषधी वनस्पती ज्या भांड्यात उकळवल्या त्या भांड्यात थोडे दूध उकळवा. नंतर तुमच्या आवडीनुसार उकळवून घेतलेले दूध कपामध्ये मिक्स करा आणि पुन्हा दुसऱ्या कपात तो चहा गाळून घ्या आणि प्या.