Walking for heath: आरोग्यासाठी चालणं हे कायम फायदेशीरच ठरतं. म्हणूनच आरोग्यतज्ज्ञ सर्वच वयोगटातील लोकांना दररोज चालण्याचा सल्ला देतात. चालणं हा एक सोपा व्यायाम आहे, जो प्रत्येक जण अगदी सहज आपल्या दिनचर्येत समाविष्ट करून घेऊ शकतो. चालण्यामुळे केवळ ह्रदय आणि मनाला बळकटी मिळत नाही, तर शरीरात ऊर्जादेखील वाढते. तसंच रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते आणि दीर्घायुष्य लाभू शकते. असं असताना अनेकांना असा प्रश्न पडतो की नेमकं किती वेळ चालावं? तेव्हा जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

१० ते १५ मिनिटे चालण्याचे फायदे

दररोज १० ते ६० मिनिटे चालण्याचे आरोग्यावर आणि शरीरावर होणारे परिणाम न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले आहेत. चालण्याच्या पहिल्या १ ते २ मिनिटांत ह्रदयाची गती आणि रक्ताभिसरण वाढते. स्नायू उबदार होतात आणि शरीर हालचालीसाठी तयार होते. ५ ते १० मिनिटांत मूडही बदलतो आणि ताण कमी होतो. १० ते १५ मिनिटे चालल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते. जेवणानंतर चालल्यास त्याचे परिणामही चांगले होतात.

२० ते ३० मिनिटे चालण्याचे फायदे

दररोज २० ते ३० मिनिटे चालल्याने शरीराला जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रित होते आणि चरबी कमी होते. नियमित ३० मिनिटे चालल्याने पचनसंस्था सुधारते. दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर चालणे पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यावेळी चालल्याने चयापचय सक्रिय राहते आणि दिवसाचा थकवा कमी होण्यास मदत होते.

३० ते ४५ मिनिटे चालण्याचे फायदे

३० ते ४५ मिनिटे चालण्याचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. यावेळी शरीरात एंडोर्फिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. त्यामुळे ताण आणि चिंता कमी होते. यामुळे मानसिक स्पष्टता वाढते आणि मेंदूचे कार्य अधिक सक्रिय होते. तसंच झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.

४५ मिनिटे ते १ तास चालण्याचे फायदे

४५ मिनिटे ते एक तास चालण्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर खोलवर परिणा होतो. त्यामुळे शरीरात डोपामाइन आणि इतर चांगल्या रसायनांची पातळी वाढते. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि अधिक ऊर्जेने भरपूर असल्यासारखे वाटते. नियमित, दीर्घकाळ चालल्याने तुमचे ह्रदय आणि मन दोन्ही निरोगी राहू शकते आणि गंभीर आजाराचा धोका कमी होतो.

तज्ज्ञांच्या मते, अजिबात न चालण्यापेक्षा कितीही वेळ चालणे चांगले. तुम्ही १० मिनिटे चाललात किंवा ६० मिनिटे याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. जेवणानंतर हलके चालणे, सकाळी फिरणे आणि संध्याकाळी फिरणे हे सर्व तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.