High uric acid level: युरिक अ‍ॅसिडची पातळी म्हणजेच वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया ही एक सामान्य स्थिती असली तरी ती नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात युरिक अ‍ॅसिड तयार होते याचाच अर्थ तुमचे मूत्रपिंड पुरेशा प्रमाणात युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर टाकत नाही. ही स्थिती अत्यंत वेदनादायक ठरू शकते. शरीर प्युरिन ब्रेकडाउन प्रक्रियेद्वारे युरिक अ‍ॅसिड तयार करते. ते मानवी ऊतींमध्ये आणि विशिष्ट अन्नामध्ये नैसर्गिकरित्या होते. शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड यामुळे गाउट आणि किडनी स्टोनच्या समस्या उद्भवू शकतात. गाउट म्हणजे हा एक प्रकारचा संधिवाताचा प्रकार आहे. यामुळे सांध्यामध्ये अचानक तीव्र वेदना, सूज, लालसरपणा आणि उष्णता जाणवते. युरिक अ‍ॅसिड वाढण्यामागे कोणती कारणं आहेत हे माहीत असल्यास तुम्ही ते नियंत्रणात किंवा थांबवण्यासाठी योग्य पावलं उचलू शकता. त्याबाबातच जाणून घेऊ…

अति प्युरीनचे सेवन

युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्युरिन असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. शरीरात यकृत, मांस आणि सार्डिन अँकोव्ही तसंच शेलफिश यांसारखे विविध स्वरूपात प्युरीन असते. शरीरातील प्युरीनचे विघटन झाल्यामुळे युरिक अ‍ॅसिड तयार होते. या विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. सोडा आणि फ्रुक्टोज असलेले पेय घेतल्यानेही युरिक अ‍ॅसिड वाढते. कमी प्युरीन असलेले पदार्थ निवडून संतुलित खाण्याच्या सवयींद्वारे युरिक अ‍ॅसिडच्या पातळीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. योग्य आहार निवडल्यास आणि प्युरीन सेवनाचे प्रमाण कमी केल्यास शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते.

दारूचे सेवन

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. बिअर आणि इतर अल्कोहोलिक पेयांमध्ये असलेले प्युरीनचे प्रमाण शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढवते. अल्कोहोल सेवनानंतर चयापचय प्रक्रियेमुळे तुमचे मूत्रपिंड अल्कोहोल काढून टाकण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्याची कार्यक्षमता कमी होते. मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे नियमित सेवन केल्याने रक्तात युरिक अ‍ॅसिड जमा होते. त्यामुळे गाउट आणि इतर संबंधित आरोग्य समस्या होण्याची शक्यता वाढते. अल्कोहोलचे सेवन कमी करणे किंवा पूर्णपणे त्याग करणे, प्रभावी युरिक अ‍ॅसिड पातळी राखण्यासाठी गरजेचे आहे.

मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे आणि कमी उत्सर्जन

शरीरातील युरिक अ‍ॅसिड हे मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकले जाते हे तर सर्वांना माहीत आहेच. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यावर युरिक अ‍ॅसिड साचत जाते आणि शरीराचेही कार्य बिघडते. हे डाययुरेटिक्स आणि हायपोथायरॉईडीझममुळे होऊ शकते. युरिक अ‍ॅसिड तयार झाल्यानंतर ते योग्यरित्या मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकले जात नसल्याने ते शरीरात वाढत जाते. त्यामुळे मूत्रपिंडाचे योग्य काम महत्त्वाची भूमिका बजावते. कारण शरीरातून युरिक अ‍ॅसिड फिल्टर करून काढणे गरजेचे आहे.

अनुवांशिक घटक

कधीकधी युरिक अ‍ॅसिड वाढण्याची समस्या ही अनुवांशिक असते. शरीराची युरिक अ‍ॅसिड प्रक्रिया करण्याची किंवा काढून टाकण्याची क्षमता आनुवांशिक रचनेवर अवलंबून असते. अनुवांशिक चाचणी केल्यास यासंबंधित आरोग्य समस्या विकसित होण्याच्या घटकांना रोखण्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मदत होऊ शकते.

लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम

शरीराचे जास्त वजन रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवते. चरबीच्या पेशींद्वारे युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन स्नायूंच्या पेशींपेक्षा जास्त होते. त्यामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी होते. त्यामुळे शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्याची त्यांची क्षमता प्रभावित होते. उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी वाढणे, पोटातील चरबी आणि मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये असामान्य कोलेस्टेरॉल वाढ अशी स्थिती निर्माण होऊ शकते, ती वारंवार वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडच्या पातळीमुळे होते. वजन कमी करणे आणि या परिस्थितीचे योग्य व्यवस्थापन केल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल. योग्य पोषणासह नियमित व्यायाम केल्याने लोकांना त्यांच्या युरिक अ‍ॅसिडच्या पातळीवर चांगले नियंत्रण मिळवण्यास मदत होते.