At What Time Are Women Most Likely to Have a Heart Attack: महिलांनो, ही माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल. नवीन संशोधनांतून असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे की, महिलांना दिवसाच्या एका विशिष्ट वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका असतो. ही वेळ कोणती आहे, हे जाणून घेतल्यावर तुम्हीही चकित व्हाल; पण आधी समजून घ्या, महिलांचं हृदय या काळात का आणि कसं अधिक धोक्यात येतं.

महिलांच्या आरोग्यावर वाढता ताण

आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला घर, करिअर व जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग परिणामस्वरूप त्याचं रूपांतर हळूहळू हृदयाच्या आजारात होतं. तज्ज्ञ सांगतात की, महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल, झोपेतील अनियमितता व मानसिक ताण या सर्व बाबी हृदयाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होण्यास कारणीभूत ठरतात.

हैदराबादचे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष कुमार सांगतात, “लोकांमध्ये अशी धारणा आहे की, पुरुषांना हृदयविकाराचा अधिक धोका असतो; पण प्रत्यक्षात महिलादेखील तितक्याच किंबहुना अधिक धोक्यात असतात. अनेक महिला छातीत किरकोळ वेदना, थकवा किंवा मळमळ यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि मग अचानक घातक झटका येतो.”

महिलांमधील लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी

महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची लक्षणं अनेकदा गोंधळात टाकणारी असतात आणि त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक जण जीव गमावतात.

  • छातीत घट्टपणा किंवा जडपणा: छातीत जडपणा, वेदना होऊन, अनेकदा त्या वेदना जबडा, पाठ, हात किंवा पोटापर्यंत पसरतात.
  • श्वास घेण्यास त्रास: काम न करताही दम लागणे किंवा श्वास घ्यायला अडचण येणे.
  • अतिशय थकवा किंवा कमजोरी: शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं, अगदी विश्रांती घेतल्यानंतरही.
  • मळमळ, चक्कर येणं, उलटी: अनेक जणी याला ‘गॅस’ किंवा ‘कमकुवतपणा’ समजून टाळतात; पण हेही हृदयाशी संबंधित संकेत असतात.

जर ही लक्षणं वेळेत ओळखली गेली, तर महिलांचं आयुष्य वाचवता येऊ शकतं.

संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष

न्यूझीलंडमधील हार्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एनझेड (Heart Research Institute NZ) या संस्थेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या अहवालात महिलांच्या हृदयविकाराशी संबंधित गंभीर माहिती समोर आली आहे.
त्या अहवालानुसार, न्यूझीलंडमध्ये दर आठवड्याला ५५ हून अधिक महिलांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

हा डेटा केवळ आकडा नाही, तर तो महिलांच्या आरोग्याविषयी एक मोठा इशारा आहे. तज्ज्ञ सांगतात की, महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं अनेकदा अस्पष्ट असतातआणि त्यामुळे वेळेत उपचार मिळत नाहीत. याच कारणामुळे जागतिक स्तरावर महिलांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.

महिलांनी कसं राखावं हृदयाचं आरोग्य?

हृदय सुस्थितीत ठेवण्यासाठी महिलांनी आठवड्यातील बहुतांश दिवस किमान ३० मिनिटांचा व्यायाम करावा.
जलद चालणं, योगाभ्यास किंवा खोल श्वास घेण्याचे व्यायाम हृदय मजबूत ठेवतात. ताणतणाव हा या आजाराचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यामुळे ध्यान आणि मानसिक शांतता राखणं अत्यावश्यक आहे.

आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी तेलकट पदार्थ घ्यावेत. शुगर, कोलेस्ट्राॅल किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या महिलांनी नियमित तपासणी करावी. हैदराबादचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुमार म्हणतात, “शरीर दर वेळी आपल्याला इशारे देतं. फक्त ते ऐकायला शिका.”

‘ती’ वेळ कोणती?

अनेकांना वाटतं की, हृदयविकाराचा झटका दिवसाच्या वेळी येतो… पण सत्य मात्र अगदी उलट आहे.
संशोधनानुसार, महिलांना सर्वाधिक धोका पहाटेच्या वेळी म्हणजेच रात्री ३ ते ४ या दरम्यान असतो.
या वेळेत शरीर झोपेच्या खोल टप्प्यात असतं, श्वसन मंदावलेलं असतं आणि ‘स्लीप अॅप्निया’सारख्या स्थितीमुळे हृदयावर प्रचंड ताण येतो.

याच काळात रक्तदाब अचानक वाढतो, हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर सांगतात उशिरा झोपणं, ताणतणावात राहणं आणि अनियमित झोपेची सवय ठेवणं हे महिलांसाठी जीवावर बेतू शकतं.

शेवटचं लक्षात ठेवा

प्रत्येकाचं हृदय हा फक्त शरीराचा भाग नाही, तर ते संपूर्ण शरीराचं धडधडणारं केंद्रस्थान आहे. त्यात महिला या तर फक्त कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत, असं नाही, तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या केंद्रबिंदू असतात आणि म्हणून महिलांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये- कारण- वेळ निघून गेल्यावर पश्चात्तापाशिवाय काहीच हाती उरत नाही.