रामिलग हे उस्मानाबादपासून २० किमी तर बीडपासून ९५ किमी अंतरावरचं ठिकाण. अतिशय सुंदर वन पर्यटन स्थळ. पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला. दरीत उतरुन गेल्यावर समोर येते ते नव्याने जीर्णोद्धार झालेले महादेव मंदिर. त्याचं कोरीव बांधकाम आणि िभतीवरील देवदेवतांच्या मूर्ती लक्ष वेधतात. महादेव मंदिराकडे तोंड करून एक पितळेचा सुंदर नक्षीकाम केलेला नंदी आहे. शांत वातावरणात महादेवाचं दर्शन घ्यायंच आणि पावलं पुन्हा हिरव्या वाटांकडे वळवायची. मंदिराला वळसा घालून धावणारी नदी  खूपच आवडून जाते. तिच्या पाण्यात पाय टाकून बसण्याचा आनंद काय सांगावा? छोटीशी नदी पण नितळ पाणी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीच्या पाठीमागे एक समाधी आहे. त्यावर एका पक्षाला दोन पुरुष हातात धरून उभे असल्याचं चित्र कोरलं आहे. रावण व जटायूच्या युद्धात जटायू जखमी झाला. रामाने  जटायूला पाणी पाजण्यासाठी इथे एक बाण मारला. त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली. इथेच जटायूचा मृत्यू झाला. ही समाधी जटायू पक्ष्याची आहे अशी आख्यायिका सांगतीली जाते.

उन्हाळ्यात या पाण्याची धार लहान होत जाते.  पण पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रपात कोसळत राहातो. हा धबधबा पाहण्यासाठी, येथील महादेवाचं आणि जटायूचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण मोठय़ा संख्येने येथे येतात. हा परिसर खूप हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने १९९७ मध्ये २२३७.४६ हेक्टर क्षेत्राला रामिलग घाट अभयारण्य म्हणून घोषित केले. उस्मानाबाद जिल्ह्यतलं हे स्थळ पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं स्थळ आहे.  येथे पक्ष्यांच्या १०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पाणगळीची वने व काटेरी वने या प्रकारात हे वन मोडतं.

वन विभागाने विविध योजनेअंतर्गत इथे मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. त्या झाडांबरोबर नसíगकरीत्या आढळून येणाऱ्या खैर, धावडा, सालई, बोर, बाभुळ, सीताफळ, धामण, आपटा, हिवर, अजंन, साग, चंदन, अर्जुन, सादडा, बेल, मेहसिंग, मोहा, बेहडा या वृक्षप्रजातीही येथे आढळतात. अभयारण्यात कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडे, मोर असे वन्यजीव पाहू शकतो.

उस्मानाबाद जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. मात्र पर्जन्यराजाची कृपा झाल्याक्षणी हा परिसर कात टाकतो. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिराला वळसा घालून वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागील बाजूस कोसळणारा धबधबा आणि डोंगराच्या अंगाखांद्यावर असलेल्या झाडीमध्ये इकडून तिकडे उडय़ा मारणारी माकडे असं सुंदर वातावरण अनुभवायला मिळतं.  येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह आहे. अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या दुर्गादेवी टेकडीवर रेल्वेचं विश्रामगृह आहे. अभयारण्य पाहण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते जून असा आहे.

drsurekha.mulay@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramling wildlife sanctuary in osmanabad district