लग्नसराई आली की शहरातील मंगल कार्यालयात गर्दी होऊ लागते. आता मात्र त्याचबरोबर काही खास पर्यटनस्थळांवरदेखील सनईचे सूर घुमू लागले आहेत. डेस्टिनेशन वेडिंग ते वेडिंग टुरिझम हा ट्रेण्ड आता चांगलाच रुळत असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.

‘‘आमच्या देशात या आणि लग्न करा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने, हव्या त्या ठिकाणी. पाण्याखाली, पाण्यावर, जमीनीखाली, डोंगरावर, हवेत, बीचवर, तुम्ही म्हणाल तेथे लग्न करता येईल. त्यासाठीच्या सर्व सुविधा आमच्या देशात उपलब्ध आहेत.’’ मॉरिशस पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत केलेले हे वक्तव्य मॉरिशसच्या पर्यटन विकासाची वेगळी दिशा दाखवणारे आहे.

खरं तर लग्न हा घरगुती पण सामाजिक सोहळा. पूर्वीची दारातल्या मांडवातली लगं्न शहरातल्या लग्नं मंगल कार्यालयात पोहोचली, तेव्हा दोन्हीकडच्या पैपाहुण्यांच्या सोयीने आणि उपलब्धतेच्या दृष्टीने याकडे पाहिले जायचे. लग्नकार्याचं शहर अथवा अन्य ठिकाणांची भटकंती हा त्यातला भाग नसायचा. तसा वेळदेखील नसायचा. पण आता हीच लग्नं थेट शहर, राज्य, देश ओलांडून थेट परदेशात होऊ लागली आणि त्यातूनच अनेक राज्यांच्या, देशांच्या पर्यटन व्यवसायातही महत्त्वाचा बदल दिसू लागला.

वधू आणि वर या दोन्ही घरांचा कसलाही संबंध नसलेल्या, पण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि विवाह सोहळा साकारण्याच्या सर्व सुविधा असलेल्या ठिकाणी जाऊन लग्न करण्याचा कल गेल्या काही वर्षांत जोर पकडू लागला. थोडक्यात काय तर लग्नाच्या निमित्ताने पर्यटनाचा नवा फंडा विकसित होऊ लागला.

तसं पाहिलं तर मॉरिशस, थायलंड, गोवा ही सार्वकालिक मौजमस्तीची ठिकाणं. पण गेल्या दोनएक वर्षांत डेस्टिनेशन वेडिंगच्या क्षेत्रात या राज्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. गोवा राज्याच्या पर्यटन मंडळाने डेस्टिनेशन वेडिंगसाठी खास वेबसाइटच तयार केली आहे. परिणामी गोवा राज्याला २०१५चे सवरेत्कृष्ट वेडिंग आणि हनीमून डेस्टिनेशन म्हणून आयटीबी बर्लिनमध्ये गौरविण्यात आलं आहे. अर्थातच गोव्यात सर्वाधिक पसंती आहे ती बीच वेडिंगला. तुलनेने चर्च अथवा मंदिरांना तशी मागणी कमीच.

थायलंडमधील अनेक हॉटेल्सना भारतीय लग्नातील साऱ्या प्रथा-परंपरांची चांगलीच ओळख झाली आहे. भल्या पहाटेपासून सुरू होणारा ते रात्री उशिरापर्यंत चालणारा सोहळा, फटाक्यांची आतषबाजी या भारतीय लग्नातील अपरिहार्य घटकांसाठी थायलंड प्रशासनाने नियमांचे बंध सैल केले आहेत. इतकेच नाही तर लग्न समारंभाच्या मिरवणुकीसाठी चक्क घोडा आणि हत्तीदेखील ठरावीक वेळेसाठी मोफत दिला जातो. तसेच व्हिसा व थायलंडमधील भटकंतीसाठी तेथील पर्यटन प्राधिकरण मदत करते. पंजाबी, मारवाडी समाजाचा थायलंडमध्ये लग्न करण्याकडे अधिक ओढा असल्याचे जाणवते.

बालीला जाऊन लग्न करण्याचा ट्रेण्ड भारतीयांमध्ये रुजला नाही, मात्र इतर देशांतून बालीमध्ये लग्नासाठी येणाऱ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. किंबहुना त्यामुळेच तेथील हॉटेलचालकांकडून लग्नासाठीच्या संपूर्ण सुविधा तसेच सर्व प्रकारच्या सरकारी परवानग्यांचे सोपस्कार पार पाडले जातात. इतकेच नाही तर थायलंड, बाली आणि मॉरिशसमध्ये तेथील पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम लग्नप्रसंगी मोफत सादर केला जातो.

राजस्थानातील वैभवशाली राजवाडे आणि किल्ले हे अशा प्रकारच्या लग्नांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. पण तेथेदेखील आता याकडे विशेष बाब म्हणून पाहिलं जात आहे. तुलनेने दक्षिणेकडील राज्ये यासाठी फारशी प्रसिद्ध नाहीत. भाषा आणि आहारातील बदल हे त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणावे लागेल.

अर्थातच अशा लग्नांसाठी प्रवास खर्च हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे राजस्थान जरी लोकप्रिय असले तरी त्यातदेखील उदयपूर, बिकानेर, जोधपूरपेक्षा जयपूरला मागणी अधिक आहे. उत्तरेतून गोव्यात येण्यापेक्षा राजस्थानात जाण्याला अधिक पसंती आहे.

लोणावळा, महाबळेश्वरसारख्या हिल स्टेशन्सना मागणी असली तरी त्या लग्नामध्ये प्रवासाची मज्जा, नवीन ठिकाणाचा अनुभव मिळत नाही. त्यामुळेच राज्याबाहेरील गोवा तसेच जयपूरच्या मागणीत वाढ होताना दिसते. हैद्राबाद येथील रामोजीराव फिल्मसिटी, लवासा, अ‍ॅम्बी व्हॅली अशा काही थीम बेस्ड हिल स्टेशन्स व पर्यटनस्थळांनादेखील बऱ्या प्रमाणात मागणी आहे. पण एखाद्या विवक्षित काळात भारतातच एखाद्या विवक्षित ठिकाणी जाऊन लग्न करण्यासाठी जो खर्च येऊ शकतो, तेवढाच खर्च थायलंडसाठी येत असल्यामुळे थायलंड आपल्याकडे डेस्टिनेनश वेडिंगसाठी प्रसिद्ध होऊ लागलं आहे. अशा प्रकारच्या लग्नांची मागणीही मुख्यत: उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांकडून मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या महानगरांतून सर्वाधिक आहे.

लग्नकार्यातली नारायणाची जागा जशी वेडिंग प्लॅनर नामक घटकाने घेतली तशी डेस्टिनेशन वेडिंगला चालना मिळाली. कारण डेस्टिनेशन वेडिंगमध्ये समारंभाची सारी जबाबदारी हा वेडिंग प्लॅनरच सांभाळत असतो. डेस्टिनेशन वेडिंग ते डेस्टिनेशन टुरिझम हा प्रवास होण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या पर्यटन विकास प्राधिकरणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या शासकीय धोरणात वेडिंग टुरिझमसाठी विशेष सुविधा निर्माण होऊ लागल्याचे गेल्या दोन वर्षांत दिसून येते.

थायलंडमध्ये वर्षांला साधारण एक दशलक्षच्या आसपास पर्यटक येतात. त्यापैकी डेस्टिनेशन वेडिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या साधारण पाच टक्के इतकी आहे. येथे २०१४ मध्ये ११० भारतीय विवाह सोहळे संपन्न झाले आहेत. २०१५मध्ये ही संख्या १५०च्या आसपास पोहोचली होती. गोव्यात २०१३-१४ मध्ये भव्यदिव्य असे ७२० विवाह सोहळे झाले होते. २०१५ च्या अखेरीस १२०० चा आकडा ओलांडल्याची शक्यता आहे. छोटेमोठे सोहळे तर अनेक होतच असतात.

आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी म्हणून असे सोहळे होत असले तरी या लग्नकार्यातील बहुतांश खर्च हा त्या पर्यटन स्थळावरच होत असल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ही बाब तेथील पर्यटन विकास मंडळांना नेमकी माहीत असल्यामुळे त्याकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले जाते.

या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र कोठे आहे हे पाहताना आपल्याला दूरदृष्टीच नसल्याचे दिसून येते. एकतर आपण मूलभूत सुविधांमध्येच मागे असतो आणि गप्पा मात्र दोन-तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यांवर लग्न करण्याच्या करतो. जेथे कसल्याच सुविधा नसतात. खरे तर आपल्याकडे काय आहे हेच आपल्याला कळले नाही. मॉरिशस जसे म्हणते की, आमच्याकडे या आणि हव्या त्या पद्धतीने हव्या त्या ठिकाणी लग्न करा, तसे महाराष्ट्रालादेखील करता येऊ शकते. पण ते करण्यासाठीची व्यावसायिकता आपल्याकडे नाही. असो, पण तोपर्यंत आपण बाहेर जायचे आणि लग्न करायचे आणि पर्यटनदेखील.

३० लाख ते कितीही..

हौसेला मोल नसते. त्यातही लग्नासारखा प्रसंग अविस्मरणीय करण्यासाठी भरपूर खर्च करणारे म्हणून आपल्या भारतीयांची ओळख आहे. साधारण २०० पाहुण्यांसाठी दोन दिवसांचा डेस्टिनेशन वेडींग सोहळा करायचं झाला तर गोवा अथवा जयपूर येथे २५-३० लाखांपर्यत खर्च येतो. अर्थात हा खर्च सर्वसाधारण आहे, पण एखाद्या शाही भव्य राजवाडय़ात लग्न करायचे तर अगदी एक-दीड कोटींपर्यंत खर्च करणारेदेखीलआहेत.

suhas.joshi@expressindia.com