सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष : बुध-हर्षलचा युती योग उत्साहवर्धक आणि संशोधनास पूरक असा योग आहे. परंतु अतिउत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घाईने जाहीर करणे योग्य ठरणार नाही. नोकरी-व्यवसायात सत्याची कास सोडू नका. सहकारी वर्गाची मदत उल्लेखनीय ठरेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपले नैपुण्य दाखवेल. त्याचा करारीबाणा उपयोगी ठरेल. मुलांची जिद्द कौतुकास पात्र असेल. नातेवाईकांना मदत करण्याची तयारी दाखवाल. पित्तप्रकोप आणि अपचनाचा त्रास वाढेल. पथ्य पाळावे.
वृषभ : चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे ज्येष्ठ मंडळींचा आधार मिळेल. नोकरी-व्यवसायात कामातील प्रगती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. सहकारी वर्गाकडून काम पूर्ण करून घेताना ऊर्जा खर्ची पडेल. जोडीदाराच्या कष्टाला योग्य न्याय न मिळाल्याने त्याची नाराजी जाणवेल. चर्चा करून त्याचे मन हलके करावे. मुलांना मार्गदर्शनाची गरज भासेल. जुन्या ओळखी उपयोगी पडतील. परिस्थितीशी जुळवून घेताना मानसिक ताण घेऊ नका. विचारांती निर्णय घ्याल.
मिथुन : चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे आनंदी आणि उत्साही राहण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांसह आपल्या समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय योजाल. सहकारी वर्गाच्या मदतीने मोठी जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराच्या गुणांचे चीज होईल. नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांना त्यांच्या क्षेत्रात वाव मिळेल. आपल्या पाठिंब्यामुळे त्यांची प्रगती होईल. मूळव्याधीसारखे आजार उफाळून येण्याची शक्यता भासते. पथ्यपाणी सांभाळा. औषधोपचार घ्यावा.
कर्क : रवी-चंद्राच्या समसप्तम योगामुळे प्रगतीचा मार्ग सापडेल. रवी मानसन्मानाचा कारक असून चंद्र हा जनसंपर्काचा कारक ग्रह आहे. त्यामुळे अनेक मार्गानी मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात कामकाजाचे नवे गणित मांडावे लागेल. आर्थिक बाजू बळकट कराल. सहकारी वर्ग समयसूचकता दाखवेल. जोडीदाराच्या कष्टाचे कौतुक वाटेल. मुलांच्या स्वातंत्र्यावर अंकुश बसवावा. अतिविचाराने मानसिक आणि शारीरिक दमणूक होईल. लेखन, वाचन, कला यात रस घ्यावा.
सिंह : चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे सौंदर्यदृष्टी वाढेल. कामाव्यतिरिक्त छंदासाठीही वेळ राखून ठेवाल. तणाव कमी करण्याचे हे एक उत्तम साधन ठरेल. नोकरी-व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. रखडलेली कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. सहकारी वर्ग वादाचे मुद्दे उपस्थित करतील. जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे प्रसंग येतील. नाजूक परिस्थिती खंबीर मनाने हाताळावी लागेल. आरोग्य चांगले राहील.
कन्या : चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे मनोबल आणि बुद्धिचातुर्य यांचा मिलाफ होईल. रखडलेली कामे मार्गी लावून आपली हुशारी दाखवाल. नोकरी-व्यवसायात नव्या जोमाने कामे पूर्ण कराल. परिस्थितीला धीराने तोंड द्याल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. प्रवासावर र्निबध येतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अडचणी येतील. त्याची जास्त प्रमाणात दमणूक होईल. मुलांना योग्य मार्ग सापडेल. ओटीपोटाचे आणि आतडय़ांचे त्रास उद्भवतील. औषधोपचार घ्यावा.
तूळ : बुद्धीचा कारक बुध आणि कर्माचा कारक शनी यांच्या केंद्र योगामुळे स्वीकारलेल्या जबाबदारीचे उत्तम व्यवस्थापन कराल. नव्या-जुन्याचा संयोग जुळवून आणाल. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामे लांबणीवर पडतील. चिकाटीने सातत्य टिकवाल. जोडीदाराच्या मेहनतीचे आणि बुद्धिमत्तेचे श्रेय त्याला मिळेल. मान मिळेल. मुलांना त्यांच्या हिताच्या गोष्टी पटतील. तळपायाला फोड येणे, पाय वळणे, उष्णतेचा त्रास होणे अशा समस्या उद्भवतील. पथ्य पाळावे.
वृश्चिक : चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे नव्या पद्धतीचा अवलंब करताना ज्येष्ठांचा आधार मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या मताचा मान राखला जाईल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. आर्थिक बाजू सावरून धराल. जोडीदाराच्या कर्तबगारीचा अभिमान वाटेल. मुलांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याल. कौटुंबिक वातावरण समाधानी राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. बदलत्या परिस्थितीनुसार नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक! आरोग्य चांगले राहील.
धनू : चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावनांवर विचारांचा लगाम लावाल. भरकटणारे विचार ताब्यात ठेवाल. नोकरी-व्यवसायात कामावर लक्ष केंद्रित केल्याने कामाचे समाधान मिळेल. वरिष्ठ याची नोंद घेतील. सहकारी वर्गाच्या समस्या जाणून आणि समजून घ्याल. विचारांती निर्णय घ्याल. जोडीदाराच्या सोबतीने कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. डोळे आणि त्वचा यांची विशेष काळजी घ्यावी. जळजळ झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मकर : शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शनीच्या मेहनतीला चंद्राच्या कुतूहलाची जोड मिळेल. संशोधन कार्यात यश मिळेल. समस्यांवर उपाय शोधत आगेकूच कराल. सहकारी वर्गाच्या हेकेखोरपणावर वेळीच नियंत्रण ठेवा. नियमाने वागाल. जोडीदाराचे कामकाज अडथळे झेलत पुढे जाईल. त्याची अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. एकमेकांना सांभाळून घ्यावे. मुलांच्या प्रगतीचा आलेख वर चढेल. श्वसन विकारांसह उष्णतेने होणाऱ्या आजारांपासून सावधगिरी बाळगावी. वैद्यकीय उपचार घ्यावा.
कुंभ : चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे बाह्य़ परिस्थितीचा आपणावर प्रभाव पडेल. अधिक संवेदनशील व हळवे व्हाल. परंतु इतर ग्रहयोगांमुळे संतुलन सांभाळाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठिंब्याने कामे पुढे सरकतील. नव्या गोष्टी आत्मसात कराल. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहकारी वर्गाकडून चांगली कामगिरी पार पडेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. समाजकार्याची ओढ लागेल. उत्सर्जन संस्थेसंबंधित त्रास जाणवतील. मांडय़ा, पोटऱ्या भरून येतील.
मीन : चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. ध्येय निश्चित करून उत्तम कृतिशीलता दाखवाल. आत्मविश्वास वाढेल. आप्तेष्टांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मानणे हिताचे ठरेल. सहकारी वर्गाला शिस्तीचा बडगा दाखवाल. जोडीदाराची महत्त्वाची कामे लांबणीवर पडतील. मुलांचा वैचारीक गोंधळ चर्चेने दूर करावा. रक्ताभिसरणासंबंधित त्रास अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरेल. औषधोपचार घ्यावा.