X
X

राशिभविष्य : दि. २१ ते २७ फेब्रुवारी २०२०

READ IN APP

रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे वडीलधाऱ्यांकडून अचानक लाभ होतील

सोनल चितळे

मेष

रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे वडीलधाऱ्यांकडून अचानक लाभ होतील. इतरांपेक्षा आगळेवेगळे, पण समाजोपयोगी छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. रखडलेल्या कामांना गती द्याल. सरकारी कचेरीसंबंधित कामे हाती घ्याल. जोडीदारासह आनंदात वेळ घालवाल. एकमेकांच्या कष्टाची दखल घ्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. पचनाच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका. औषध व व्यायाम आवश्यक!

वृषभ

चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे इतरांच्या भावनांची कदर कराल. चिकित्सकपणा वाढेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नोकरी-व्यवसायातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. वरिष्ठांच्या मनाप्रमाणे कामातील उरक वाढेल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. मित्रमत्रिणी भेटतील. ओळखीतून कामे होतील. जोडीदाराचा मूड सांभाळा. कटू विषयांची उजळणी नको. कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीची बातमी समजेल. मानसिक आरोग्याचा समतोल राखाल.

मिथुन

चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे आपल्या हुशारीला वाव मिळेल. विरोधकांना बुद्धीच्या जोरावर नामोहरम कराल. हजरजबाबीपणा उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. कामाचा वेग वाढेल. यश मिळवाल. सहकारी वर्ग साथ देईल. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. त्याच्या कार्यक्षेत्रातील अडचणीतून तो सहीसलामत बाहेर पडेल. त्याला भावनिक आधार द्याल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पचनक्रिया सुधारा. औषधोपचार आवश्यक!

कर्क

चंद्र-गुरूच्या केंद्रयोगामुळे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न कराल. कष्टाचे चीज होईल. मान-सन्मान, कीर्ती मिळवाल. नोकरी-व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल. नावीन्यपूर्ण योजना राबवाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार कराल. जोडीदाराचा कष्टाळू स्वभाव व चिकाटी यांमुळे कौटुंबिक समस्या सुटतील. उष्णतेचे विकार सतावतील. आहाराकडे लक्ष द्यावे.

सिंह

मंगळ व हर्षल या दोन बलवान ग्रहांच्या नवपंचम योगामुळे नवे प्रकल्प, शोध, संशोधन यात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. योग्य विचारांतीच कृती करण्यास सुरुवात कराल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. जोडीदाराच्या लहान-मोठय़ा अडचणींवर योग्य मार्ग सुचवाल. एकमेकांवरील विश्वास दृढ होईल. कौटुंबिक समारंभात सामील व्हाल. मित्र, नातेवाईक याची मदत कराल. आरोग्य चांगले राहील.

कन्या

गुरू-शुक्राच्या केंद्रयोगामुळे आपल्या कलागुणांना वाव मिळेल. आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल. कौतुक होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या विषयाचे सादरीकरण प्रभावीपणे कराल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. हितशत्रूंचा रोष पत्करावा लागेल. अडचणींवर मात कराल. सहकारी वर्गाची कार्यपूर्तीसाठी विशेष मदत मिळेल. जोडीदारासह विचार जुळतील. बौद्धिक श्रमामुळे डोके जड होईल. विश्रांतीची आवश्यकता भासेल.

तूळ

चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे मन ताजेतवाने राहील. नव्या संकल्पना मांडाल. इतरांना प्रोत्साहित कराल. नोकरी-व्यवसायात उत्साहवर्धक योजना राबवाल. वरिष्ठांची व सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. त्यांच्या सहकार्यामुळे कामाला वेग येईल. विरोधकांकडे लक्ष न देता आपले काम सुरू ठेवाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नाव कमावेल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. रक्तातील साखरेवर  नियंत्रण आवश्यक! वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक

चंद्र व नेपच्यून या भावनाप्रधान ग्रहांच्या युतियोगामुळे जुन्या आठवणीत व भावविश्वात रममाण व्हाल. नोकरी-व्यवसायात कामाचा उत्साह वाढेल. आकलनशक्तीच्या साहाय्याने नवे तंत्रज्ञान आत्मसात कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारी वर्गाची मदत कराल. नातेवाईकांना आíथक साहाय्याची गरज भासेल. सर्व धावपळीत जोडीदाराचा भक्कम आधार मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. डोळे व घसा जपा. प्रदूषणाचा प्रादुर्भाव होईल.

धनू

रवी व मंगळ या ऊर्जादायी ग्रहांच्या लाभयोगामुळे हक्क व अधिकार गाजवाल. ज्येष्ठ मंडळींचा आधार मिळेल. त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. नोकरी-व्यवसायात नवे करार कराल. सहकारी वर्गाला आपल्या अनुभवातून धडे द्याल. स्वत:बरोबर इतरांचीही प्रगती साधाल. गटाचे नेतृत्व कराल. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. पाय मुरगाळणे, सूज येणे, शिरेवर शीर चढणे या त्रासांना सामोरे जावे लागेल.

मकर

गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे पारमाíथक प्रगती साधाल. सेवाभावाने गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात शिकावूंना योग्य मार्गदर्शन कराल. आपला सल्ला लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाकडून झालेली चूक महागात पडेल. परंतु संयम ठेवणे आवश्यक!  जोडीदार आपली परिस्थिती समजून घेईल. वैचारिक चर्चा कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. हाताचे, बोटाचे स्नायू ताणले जाणे, मुंग्या येणे असे त्रास होतील.

कुंभ

चंद्र-बुधाच्या युतियोगामुळे युक्तिवाद लढवून सरस ठराल. व्यवहारचातुर्य दाखवाल. बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. रेंगाळलेल्या गोष्टींना चालना द्याल. सहकारी वर्गात आपली पत वाढेल. आíथक गुंतवणूक कराल. फायदेशीर ठरेल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे उत्साह वाढेल. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढून सांधेदुखीची शक्यता! पथ्यपाणी सांभाळणे आवश्यक!

मीन

रवी-बुधाच्या युतियोगामुळे मोजके शब्द वापराल; परंतु मार्मिक बोलाल. वरिष्ठांचे वर्चस्व न जुमानता आपली मते स्पष्टपणे मांडाल. सहकारी वर्गाची योग्य साथ मिळेल. हितशत्रूंचा त्रास सहन करावा लागेल. कामासाठी मनापासून मेहनत घ्याल. हाती घेतलेले कार्य तडीस न्याल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अडचणी येतील. आपल्या आधाराची त्याला गरज भासेल. डोळे व पाठीचा मणका सांभाळावा.

response.lokprabha@expressindia.com

21

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: February 21, 2020 1:14 am
Just Now!
X