सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे आत्मविश्वास वाढेल. कठीण परिस्थितीला तोंड देताना हितचिंतकांची मदत मिळेल. मानसिक दमणूक जाणवेल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांना आपली मते समजावून देताना जास्त ऊर्जा खर्ची पडेल. सहकारी वर्ग मदत करेल. जोडीदाराच्या कामाचा ताण वाढेल. त्याच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. मुलांच्या संबंधित निर्णय लाभदायक ठरतील. डोळे आणि छातीचे आरोग्य जपावे. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृषभ चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे परिस्थितीचे भान ठेवून वातावरण हलके करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाकडून कामात काहीशी दिरंगाई होईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अनेक बदल संभवतात. मुलांच्या प्रश्नांना समजूतदारपणे उत्तरे द्याल. मूत्रविकाराची शक्यता आहे. दाह होणे, जळजळ होणे संभवते. उष्णतेमुळे त्वचेला संसर्ग होईल. काळजी घ्यावी.

मिथुन चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या ऊर्जेची जोड मिळेल. तंत्रज्ञानात प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात संशोधन वृत्ती कामी येईल. आपले प्रगत आणि प्रगल्भ विचार सर्वापुढे मांडाल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. कुटुंबात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. मुलांच्या विचारांना योग्य दिशा द्यावी. परिस्थितीनुसार ताणतणाव वाढतील. डोकं शांत ठेवा.

कर्क मंगळ-हर्षलच्या लाभ योगामुळे हर्षलच्या नव्या व अद्ययावत तंत्रज्ञानाला मंगळाच्या धैर्याची साथ मिळेल. नव्या संशोधनासाठी हा योग लाभकारक ठरेल. परदेशासंबंधित कामांना चालना मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांचा वैचारिक गोंधळ दूर कराल. जोडीदाराची मेहनत फळास येईल. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. रक्तसंबंधित वा रक्तातील घटकासंबंधित समस्या निर्माण होतील.

सिंह गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन कामी येईल. नेहमीच्या कामात नव्या कल्पना अमलात आणाल. परिस्थितीपुढे रडत न बसता मार्ग काढत पुढे जाल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाचा आत्मविश्वास वाढवाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या जोडीदाराच्या साथीने पार पाडाल. मुलांच्या कलागुणांचे चीज होईल. त्यांच्या भावनिक गरजा जाणून घ्याल. सांधे, श्वसन आणि पोटसंबंधित तक्रारी सतावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कन्या चंद्र-गुरूच्या केंद्र  योगामुळे आर्थिक बाजू सावरून धराल. कौटुंबिक स्तरावरील निर्णय विचारपूर्वक घ्याल. नातेवाईकांच्या मदतीला धावावे लागेल. नोकरी-व्यवसायात धारिष्टय़ दाखवाल. आपले मत ठामपणे मांडाल. सहकारी वर्गाच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे द्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या समस्यांना तोंड देत राहील. मुलांना आपले विचार मांडता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ होईल. दात आणि कान यांच्या तक्रारी वाढतील. औषधे घ्यावीत.

तूळ शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे कामातील अडचणींना धीराने सामोरे जाल. तणावग्रस्त वातावरणातून मित्रमंडळींना बाहेर काढाल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय लांबणीवर पडतील. सहकारी वर्गाकडून अपेक्षित कामे चोखपणे करून घ्याल. जोडीदाराच्या कामाची जबाबदारी वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची विशेष देखभाल करावी लागेल. मुलांचे शैक्षणिक प्रश्न अनुत्तरित राहतील. पोटाचे विकार, अपचन यांचा त्रास होईल. वैचारिक दमणूक होईल. विश्रांतीची गरज भासेल.

वृश्चिक चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे भावना आणि विचारांमध्ये समतोल राखाल. खचून न जाता धीराने  खंबीरपणे  उभे राहाल. नोकरी-व्यवसायात नव्या करारातील खाचाखोचा जाणून घ्याल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाची कार्यक्षमता वाढवाल. त्यासाठी विशेष प्रयत्न घ्यावे लागतील. जोडीदाराचे कार्य उल्लेखनीय असेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा आधार वाटेल. उष्णतेमुळे पित्त प्रकोप होण्याची शक्यता आहे.

धनू चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे भावनांवर ताबा मिळवाल. राग आवरावा लागेल. नोकरी-व्यवसायात काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणेच इष्ट ठरेल. आर्थिक बाजू सुरक्षित राहील. सहकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. जोडीदार आपली मते ठामपणे मांडेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना भावंडांची मदत होईल. मुलांच्या हुशारीची खरी परीक्षा असेल. मान आणि डोळे यांचे दुखणे वाढल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे जिद्द, चिकाटी आणि योग्य मानसिकता यामुळे आपल्या कष्टाचे चीज होईल. कठीण परिस्थितीतून धीराने बाहेर पडाल. कामकाजातील बारकावे लिखित स्वरूपात नमूद करावेत. वरिष्ठांना आपले मुद्दे समजावून देताना अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. जोडीदाराचे कामकाज धिम्या गतीने पुढे सरकेल. मुलांचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. वात आणि पित्त विकार बळावतील. व्यायाम आणि औषधे अनिवार्य आहेत.

कुंभ गुरू-शुक्राच्या केंद्र योगामुळे गुरूचे ज्ञान आणि शुक्राची सादरीकरणाची कला यांचा सुरेख संगम होईल. आपल्यातील कलागुणांचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग समस्या सोडवण्यात अग्रेसर असेल. जोडीदाराच्या साथीने परिस्थितीतून पुढे जाण्याचा मार्ग सापडेल. मुलांना नवा दृष्टिकोन द्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवाल. धावपळीतही आपले पथ्य व्यवस्थित पाळा. व्यायाम आणि विश्रांती आवश्यक!

मीन मनाचा कारक चंद्र आणि प्रेमाचा कारक शुक्र यांच्या युतियोगामुळे आप्तेष्टांकडून आपुलकी आणि प्रेम मिळेल. परीक्षेचा काळ आपल्या माणसांमुळे सुस होईल. पूर्ण होत आलेली कामे लांबणीवर पडतील. नोकरी-व्यवसायात काही निर्णय निर्धाराने घ्यावे लागतील. सहकारी वर्ग आपली मदत करेल. जोडीदाराच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल. मुलांना आपल्या जबाबदारीचे भान राहील. डोकं आणि पाठ यासंदर्भात विशेष काळजी घ्यावी. आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे.