सासूबाई, शेवटचा नमस्कार करतो! ‘गेली’ माझी सासू. बिनविषारी साप चावून गेली. ‘नाग चावला नाग. बापरे!’ असं मीच ओरडलो. सासू घाबरून खल्लास! चावली होती धामण. सासुरवास संपला. मी ‘मॅडी’. लाडाचं नाव. ‘हाऊस-हजबंड’ आहे मी. गर्लफ्रेंडने मला लग्नाच्या दिवशी डबलसीट पळवून आणलं. पप्पांनी माझ्यासाठी बनविलेले सगळे दागिने घेऊन मी पळालो. ‘पुरुष धन’ आहे ते. माझं माझ्याकडे नको?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बायको हातखर्चाला मला फक्त एक हजार रुपये देते. तेवढय़ावर भागेल का सांगा. ‘ओढाताण’ होते हो! तिच्या भावाची बनियन मी ‘ओढली, ताणली’ फाटली शेवटी! त्याला का नवी? मलाच हवी. मला लहानपणापासून ‘क्लेप्टोमॅनिया’ आहे म्हणून बरं. जिथे जाईन तिथं काहीतरी ‘ढापतो’ मी. अगदी नकळत चोऱ्या करतो म्हणून भागतंय माझं. या कोल्हापुरी चपला बघा. देवळातून आणल्या! काल फ्राय फिश बायकोला तळून दिलं. त्याचे पैसे नाही दिलेले. असंच! महागाईवर चांगला उपाय म्हणजे ढापाढापी!

मला जॉबची दगदाग नाही ते बरं आहे. परस्त्रियांच्या नजरा बऱ्या नसतात हो! अंग तरी किती चोरायचं? पटकन् धक्का मारला, तर सांगायचं कुणाला? बायकोच्या मैत्रिणी मात्र माझे लाड करतात. अगदी निर्मळ वात्सल्याचा वर्षांव करत असतात. मी आणि मिसेस, आम्ही ऑक्टोबर-पासिंगवाले! दहावी, बारावी ओन्ली ऑक्टोबर. नो मार्च! ऑक्टोबरचा पेपरसुद्धा मी कोरा टाकला होता. पर्यवेक्षक ओरडला. मी म्हटलं, ‘सर, ‘हाताने’ लिहिण्याचा जमाना गेला! मी डायरेक्ट ‘टाइप’ करतो.’ अशा टाइपचा विद्यार्थी त्यांनी कधीच पाहिला नव्हता. परीक्षा संपताना पर्यवेक्षकाचा स्मार्टफोन मी ढापलाच!

माझी बायको आहे तापट. चहा जरासा गार झाला की कप खाली फेकते. एकदा तिचेच डॅडी खालून येत होते. कप थेट त्यांच्या डोक्यावर पडला. फुटलाच तो. ‘दगडावर’ आपटला ना!

मेहुणीला माझं फार कौतुक. मी केलेली बासुंदी खारट झाली, तरी गोड मानून घेणार. पहाटे मला गुदगुल्या करून उठवणार! मी लाजलो की, गालगुच्चा घेणार. काही विचार करू नका. ती सायन्समधून बी.एस्सी. आहे.

लग्नापूर्वी मी अर्धवेळ, अर्धवट ‘वार्ताहर’ होतो. रात्री अंधार पडला की, हळूच, धावत पळत बातमी आणायचो आणि पटकन लपायचो. लोकांनी तीन-चारदा मला धोपटलं, तेव्हापासून हे असं. मंत्री हेलिकॉप्टरमधून आमच्या गावात उतरले, तेव्हा कॉप्टरच्या पंख्याच्या वाऱ्यामुळेच मी कुठल्या कुठे उडून गेलो. खूप मजा आहेत हो. निघतो आता. दळण टाकलंय गिरणीत. जायला हवं!

मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mady