नृत्य या विभागामध्ये परफॉर्मिग, टीचिंग आणि कोरिओग्राफी हे तीन महत्त्वाचे विभाग आहेत हे या आधीच्या लेखामध्ये आपण पाहिलेच आहे. नृत्याच्या क्षेत्रातील करिअरचा विचार करताना असे लक्षात आले की, वरील नमूद केलेल्या तीन शाखांना अनेक उपशाखा आहेत. म्हणूनच नृत्याचे क्षेत्र हे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. आज अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये नृत्यामध्ये पदवी तसेच पदव्युतर शिक्षण घेता येते. नृत्याचा हा पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रम नामवंत गुरूंनी एकत्रितरीत्या तयार केला आहे ही आणखी एक महत्त्वाची बाब आहे.
पदवी प्राप्त झाल्यानंतर कोणाला सादरीकरण करण्यात रस असतो, कोणाला कोरिओग्राफी करण्यात, तर कोणाला नृत्य शिकवण्यामध्ये. प्रत्येकाच्या आवडीनुसार विद्यार्थी त्या त्या क्षेत्रात काम करू लागतात. नृत्याच्या क्षेत्रात तुम्हाला कदाचित भक्कम पगाराची नोकरी मिळणार नाही, पण त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो खासगी कंपनीत मिळणाऱ्या पगारापेक्षा नक्कीच जास्त असेल. वर उल्लेख केलेल्या तीनही क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मानसिक आणि शारीरिक क्षमता लागते.
परफॉर्मन्सकडे कल असणाऱ्या कलाकारांना त्यासाठी विविध ठिकाणी जावे लागते, खूप प्रवास करावा लागतो. असंख्य प्रकारची आणि नानाविध प्रवृत्तीची माणसे भेटतात. त्यांना सांभाळून घ्यावे लागते. कलाकृती प्रत्यक्ष सादर करताना काही वेळा अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागते. समोरचे प्रेक्षक आणि त्यांची कुवत पाहून आयत्या वेळी बदल करावे लागतात. या आणि अशा असंख्य गोष्टींचे सदैव भान बाळगावे लागते.
कोरिओग्राफीत करियर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना दुहेरी कसरत करावी लागते. समोरील व्यक्ती अथवा संस्था यांची मागणी, कार्यक्रमाची कल्पना किंवा गरज आणि याबद्दलचा तुमचा विचार या सर्वाचे भान राखून कोरिओग्राफी करावी लागते. शिवाय दरवेळी तुमच्या हाताला गुणी कलाकार लागतीलच याची खात्री नसते. अशा वेळी जे आहे त्यातून सर्वोत्तम पेश करण्याची अवघड जबाबदारी असते.
नृत्यवर्ग व्यवसाय म्हणून स्वीकारणाऱ्या व्यक्तीला मुळात शिकवण्याची आवड असावी लागते. अगदी लहान मुलींपासून ते मोठय़ा व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला समजेल अशा भाषेत नृत्याची ओळख करून द्यावी लागते. आपल्या शिष्याचा वकूब जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याला शिकवावे लागते. शिष्य तयार करण्याचे फार मोठे सुख या व्यवसायात मिळते.
नृत्य क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या काही प्रसिद्ध कलाकारांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या सर्वानीच नृत्याच्या अनोख्या करिअरविषयी खूप अभ्यासपूर्ण विवेचन केले.
ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांना नृत्यातून १०००% (१००% नाही) समाधान मिळाले. त्यांच्या मते नृत्यसाधना हाच श्वास, हाच ध्यास ज्यातून खूप आनंद मिळतो.
पुण्याच्या प्रसिद्ध नृत्यांगना शीतल कोलवालकर यांचं म्हणणं असं की, नृत्यात करिअर जरूर करावं, पण त्यासाठी गुरूकडून चांगली तालीम घ्यावी. प्रचंड मेहनत आणि अखंड रियाझ अतिशय आवश्यक. तसेच विचारपूर्वक स्वत:ची काही तरी निर्मिती करणं गरजेचं आहे.
तर सुप्रसिद्ध भरतनाटय़म कलाकार पवित्र भट यांनी सांगितलं की, हे खूप सुंदर करिअर आहे. परंतु इतर क्षेत्रांप्रमाणे फक्त डिग्री मिळाली म्हणून करिअर झालं असं या क्षेत्रात होत नाही. तसेच या क्षेत्रात खूप चढ-उतार असतात. त्यामुळे कलाकारांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर झगडावे लागते. तसेच नृत्याशी संबंधित इतर गोष्टी शिकून घ्याव्यात हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.
सध्याचा मालिकेतील लोकप्रिय कलाकार नकुल घाणेकर याच्या मते तो स्वत: नर्तक असल्याने त्याच्या अभिनयाला एक वेगळे परिमाण लाभते. गुरुजनांचे आशीर्वाद आणि नृत्यसाधना यामुळे त्याला एक अद्भुत धन्यता मिळाली आहे. त्याच्या अभिनयातून उमटणाऱ्या नृत्य रेषाच त्याला या क्षेत्रात पुढे घेऊन जातील.
मालिका, चित्रपट, भव्य सोहळ्यातील निवेदन या व अशा अनेक क्षेत्रांत लीलया वावरणारी अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी अजून एक वेगळा विचार मांडला तो असा की या क्षेत्रात खूप आनंद, प्रचंड समाधान मिळतं, पण त्यासोबत चांगली अर्थप्राप्ती होईलच याची खात्री नसते आणि याची मनापासून तयारी नसेल तर निराशा पदरी पडू शकते. त्यामुळे नृत्याला इतर गोष्टींची जोड देणेही आवश्यक आहे.
डोंबिवली येथील ज्येष्ठ नृत्यांगना वैशाली दुधे यांनी नृत्यवर्गासोबतच सर्व प्रकारच्या नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी भाडय़ाने देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या स्वत: कलाकार असल्याने पोशाख कसे असावेत, त्यांची रंगसंगती कशी असावी हे डोक्यात होतंच. ज्या ठिकाणी हे उपलब्ध होतं ते पोशाख खूपच अस्वच्छ असत. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, गेली अनेक वर्षे तो सांभाळला आणि वाढवलाही.
थोडक्यात काय तर कोणतीही कला मनापासून आत्मसात केली आणि विचारपूर्वक त्यामध्ये करिअर करायचे ठरवले तर असंख्य दालने उघडी होऊ शकतात. फक्त आपली कष्ट करायची तयारी असली म्हणजे झाले.
शीतल कपोले
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
नृत्य : नृत्यातील अनोखे करिअर
‘लोकप्रभा’च्या करिअर विशेषांकात नृत्याच्या करिअरविषयी लिहिताना खूप आनंद होत आहे. आज नृत्याला इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले आहे. नृत्याच्या क्षेत्रामध्येसुद्धा अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. याचा ‘नृत्यातील अनोखे करिअर’ या लेखामध्ये आपण आज आढावा घेणार आहोत.

First published on: 08-05-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career special