‘‘येस ऑल सेट.. निघायचं का? मी तर रेडी आहे. बाप्पा अहो बाप्पा.. ऐकताय ना, चला आता. वाट बघताहेत सगळे तुमची. नाही..? का.. जायचं..?’’
काहीसं चाचरत उंदीरमामांनी बाप्पांना विचारलं.
‘‘मामा, गेल्या वर्षीपर्यंत मी सगळं सहन केलं निमूटपणे. पण नाही, आता नाही जमायचं. कहर झालाय आता. मला नाही जायचंय पृथ्वीवर..’’ वातावरण चांगलंच तापलंय पाहून उंदीरमामांनी हळूच विषय काढला. ‘‘हो बाप्पा. अं.. म्हणजे कळतंय मला. माणसं हल्ली वेगळंच रूप द्यायला लागली आहेत उत्सवांना. धांगडधिंगा काय, मद्य पिऊन नाचणं काय, सगळं अगदी चुकीच्या दिशेला वळणं घेतंय. पण बाप्पा त्यांची श्रद्धा..’’
‘‘मामा या गोष्टी तर मला आता सवय झाल्यासारख्या अंगवळणी पडायला लागल्या आहेत. आता तर त्यांचा वीट येण्यापेक्षा कीवच यायला लागलीय. या सगळ्या गोष्टींचा तर मला त्रास होतोच आहे, पण हल्ली अजून काही गोष्टींची यात भर पडलीए. त्या तर अजूनच भयानक आहेत. माणूस मला आवडेनासाच झालाय. सगळंच अगदी भंपक वाटायला लागलंय.’’
उंदीरमामा बाप्पांकडे पाहातच राहिले. बाप्पा चिडलेले नव्हते, रागावलेले नव्हते. पण अगदी हरल्यागत बसले होते.. हतबल झाल्यासारखे.
‘‘बाप्पा अशी एवढी कोणती मोठी गोष्ट घडलीये, ज्यामुळे तुम्हाला माणसांमध्ये जाणंही नकोसं वाटतंय..?’’
मामांनी काळजीने विचारलं. काहीसे खिन्न हसून बाप्पांनी प्रोजेक्टर सुरू केला.
‘‘हे पाहा, या सगळ्यामुळे जावंसं नाही वाटत मला.’’
अचानक समोर एक घर दिसायला लागलं. संध्याकाळची वेळ. आई-बाबा, मुलं कामावरून दमून घरी आलीएत आणि दिवाणखान्यात बसलीएत.
‘‘बाप्पा, हे का दाखवताय? हे तर घर आहे कोणाचं तरी़ यात काय नावडण्यासारखं?’’
‘‘थांबा मामा, बघा तर खरं. आणि हळूहळू मामांना त्यातली गोम कळली. हे चौघंही दिवाणखान्यात बसलेले तर आहेत पण कोणीही एकमेकांशी अवाक्षरही बोलत नाहीये. कारण सगळे गुंग आहेत त्यांच्या त्यांच्या हातातल्या मोबाइलमध्ये. मामांचा काहीसा प्रश्नांकित चेहरा पाहून बाप्पा बोलते झाले.
‘‘मामा अहो हेच तर अस्वस्थ करतंय मला. माणसाने जग जवळ आणलंय हे खरंय, पण ते इतकं छोटं केलं की त्याने त्याच्यापुरतंच मर्यादित झालंय. बोलणं वाढवलंय, पण संवाद हरवून. एकत्र राहूनसुद्धा एकटं असल्यासारखी वावरतात माणसं. मामा आज आपलं इतक्या वर्षांचं नातं आहे, पण मी तुमच्या पोस्टवर कमेंट केली नाही आणि तुम्ही माझं ट्विट फॉलो केलं नाही म्हणून आपली मैत्री संपली असं कधी झालंय का.. हल्ली नाती सोशल नेटवìकग अॅप्सच्या रेटिंगने मोजली जातात.’’
मामा काहीतरी बोलणार एवढय़ात बाप्पांनी त्यांच्यासमोर वर्तमानपत्राची कात्रणं धरली.
‘‘हे वाचा. आईने केला पोटच्या मुलीचा खून. आपल्याच मुलीवर वडील करत होते अनेक वर्षे बलात्कार. भावाने संपत्तीसाठी सख्ख्या भावाचा गळा चिरला. दोन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार.. शिसारी येतेय ना अंगावर.. मलाही येते जेव्हा हेच लोक माझ्या पाया पडतात. माझ्या डोळ्यांत पाहतात. प्रार्थनेसाठी हात जोडतात. हे असले लोक मला त्यांचे भक्त म्हणवतात. मग माझाच राग येतो मला. या असल्या लोकांना कसं काय भक्त म्हणून मी माझ्या आजूबाजूला यायला देतो? हल्ली लोक नाती तर विसरलीतच आहेत, पण नात्यातलं माणूसपणसुद्धा त्यांनी हरवलंय. तुम्हाला माहितेय, रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणूस प्रत्येकाकडे संशयित नजरेने पाहात असतो. स्त्रियांना तर हातातल्या खेळण्यासारखंच वागवलं जातं.. अजूनही.. हे लोक स्वत:ला आधुनिक मानव म्हणवतात. या आधुनिकतेपेक्षा अश्मयुग बरं. ती अंगावर कपडे नसलेली ‘माणसं’ होती आणि ही तर माणसाचा बुरखा पांघरलेली श्वापदं आहेत.’’
बाप्पांचा हा त्रागा मामा पहिल्यांदाच पाहात होते. सावरून घेण्यासाठी मामा म्हणाले,
‘‘मान्य आहे बाप्पा. खूप काही बिघडलंय, पण तरीही चांगलंसुद्धा घडतंच आहे ना. लोकांची तुमच्यावर अजूनही निस्सीम श्रद्धा आहेच ना. आजही तुमच्यासाठी का होईनात लोक एकत्र येतात. काही ठिकाणी अजूनही शिस्तबद्ध मिरवणुका होतात. ती श्रद्धा तो विश्वास अजूनही आहे लोकांमध्ये. बाप्पा..’’
‘‘मामा श्रद्धा, विश्वास त्यांनी माझ्यापेक्षा जास्त एकमेकांवर दाखवला तर मला अधिक आनंद होईल. लोकांचा स्वत:वरचाच विश्वास उडायला लागलाय. आणि याचाच फायदा हे भोंदू लोक घेताएत. कसं कळत नाही लोकांना.. पाऊस पैशांचा नसतो.. सुखाचा, समाधानाचा असतो. आणि हे सांगण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना संपवलं गेलं म्हणजे मला तुझं पटत नाही म्हणून मी तुला मारणार.. काय विकृत मानसिकता झालीये ही. समाजाला कीड नाही बुरशी लागलीये. या लोकांनी आनंदात राहण्यापेक्षा हव्यासात राहणं पसंत केलंय. माझ्याकडे येऊन ते त्यांची हाव मांडत असतात. त्यांच्या डोक्यात भक्ती नाही लालचीपणा दिसतो मला. उबग आलाय मला याचा. ही असली स्वार्थी श्रद्धा नकोय मला. यांच्यासाठी नातीसुद्धा गणेशोत्सवाप्रमाणे झाली आहेत. काही दिवस त्यांना डोक्यावर घेऊन नाचवायचं, मग विसर्जन करायचं. आणि मग उरतात ते नात्यांचे तोडकेमोडके इतस्तत: पसरलेले तुकडे.’’
‘‘बाप्पा अगदी सगळं खरंय तुमचं, पण नाही गेलं तर कसं चालणार.. जावं तर लागणारच ना.. आणि तुम्ही तर देव आहात तुम्ही का नाही बदलत हे सगळं..’’
‘‘हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. मी देव आहे. माणूस नाही. जोपर्यंत माणसाला माणसातलं माणूसपण गवसत नाही तोपर्यंत माझ्यातल्या देवपणाला काय अर्थ.. चला.. निघू या.. आशेला मरण नसतं म्हणतात.’’
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2015 रोजी प्रकाशित
बाप्पा म्हणे उंदीरमामांना…
माणसाने विज्ञानाच्या साहाय्याने जग जवळ आणलंय पण माणूसपणा हरवलाय...
Written by दीपक मराठे

First published on: 11-09-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh vishesh ganapati bappa and mice